Thursday, July 19, 2012

श्रावण सरी

सृष्टीने रानफुलांची कोवळ्या किरणांनी विणलेली सुंदर भरजरी किनार असलेला हिरवा शालू नेसताच श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागते. विशेषत: महिलांना आणि तरुणाईलाही हा महिना मनापासून आवडतो. लहानपणी मात्र आम्हाला ओढ असायची ती विविध व्रतांच्या वेळी देवाला दिल्या जाणाऱ्या नैवेद्याची, त्या व्रतांच्या गोष्टी आईच्या मांडीवर बसून ऐकण्याची, उनपावसाच्या खेळात सामील होण्याची आणि घरात पंचमीला होणारे उकडीचे कान्नोले तसेच पोळ्याच्या दिवशी होणाऱ्या पुरणपोळीची... एकूणच काय तर 'आनंद' आणि 'उत्साह' हे दोन शब्द जणू या महिन्याशीच जोडले गेले आहेत.

कोकणातील श्रावणाची मजाच काही वेगळी असते. हिरव्या डोंगररांगा...मधूनच कोसळणारा शुभ्र धबधबा...चकाकणाऱ्या पानांवर नृत्य करणारी कोवळी सोनेरी किरणे...प्राणी आणि पक्षांचा मुक्त विहार...ग्रामदैवताच्या मंदिरातून निघणारी पालखी...शिवमंदिरातील अभिषेक...आणि स्वर्गलोकातून घेऊन जाणारी कोकणकन्या अर्थात कोकण रेल्वेतील प्रवास...वेड्यावाकड्या रस्त्यावरून मनसोक्त भटकंती करायची आणि कडेला डोंगरावरून खाली कोसळणाऱ्या प्रवाहात चिंब होत पुढे जायचे...धमाल असते. ठिकठिकाणी दिसणारे विविधरंगी पक्षी या उत्साहात भर घालतात.

श्रावण सुरू होताच स्वयंपाक घरातील मेनूदेखील बदलतो. या ऋतूत आरोग्याच्या दृष्टीने कांदा, लसूण किंवा अधिक मसालेदार पदार्थ वर्ज असतात. म्हणूनच चार्तुमास सुरू झाला की स्वयंपाक घरातून या पदार्थांच्या अधिकृत 'बंदिची' घोषणा आई परंपरेने करते. शुद्ध शाकाहारी भोजनासोबत पुरणपोळी, खानदेशात मांडे, उकडीचे दिवे किंवा कान्नोले, मंगळागौरीला करंज्या आणि मुगाच्या डाळीची अळणी खिचडी, नागपंचमीची गव्हाची खीर, शिळ सप्तमीच्या पुऱ्या किंवा बुंदी घातलेले ताक, पोळ्याच्या दिवशी वाणाच्या पुऱ्या अशा पदार्थांमुळे बालगोपाळांची मात्र चंगळ असते.

संपूर्ण महिना आनंदात कधी सरतो हे कळत नाही. श्रावणातील सौंदर्य आणि वातावरणाशी समरस होणाऱ्या भावना कवितेतून तसेच गीतातून प्रकट झाल्या आहेत. मराठीतील बालकवी यांची 'श्रावणमासी हर्ष मानसी' ही कविता, गंगाधर महांबरे यांचे 'वायुसंगे येई श्रावणा, जलधारांची छेडीत वीणा', मंगेश पाडगावकर यांचे 'श्रावणात घननिळा बरसला', ग.दि.माडगुळकर यांचे 'श्रावण आला गं वनी श्रावण आला' किंवा 'घनघन माला नभी दाटल्या..'अशी अजरामर गीते ओठावर अलगद येतात. हिंदी चित्रपट सृष्टीतील 'सावन के झुले पडे..', 'सावन का महिना पवन करे सोर..', 'रिमझीम गिरे सावन', 'आया सावन झुमके' आदी गितांनी अनेकांना आपल्या प्रेमात पाडलंय. अशा कविता आणि गीतांचे स्वर कानावर पडताच चैतन्याच्या या बहराला सुंदर सोनेरी किनार मिळते.

भारतीय शास्त्रीय संगीतातही श्रावणातले हे स्वर टिपलेले आहेत. या ऋतुतील खास रचना प्रकृतीशी समरस होण्याला पूरक ठरतात. मल्हार रागातील विविध प्रकार, मधमात सारंग, देस यासारख्या शास्त्रीय आणि सावनी, कजरी, झुला अशा उपशास्त्रीय प्रकारातील सुरावटी वातावरणातला उत्साह वाढवितात. 'कैसे भाए सखी ऋत सावनकी, पिया भेजी न पतीया आवनकी' ही मिया मल्हारमधील चीज किंवा 'सावनकी ऋत आए री सजनी प्रितम घर नही आए' ही कजरी प्रकारातील रचना मैफीलीची रंगत वाढवितात. उत्तर भारतात 'झुलना झुलाओरी अंबुआ के डाल पर कोयल बोले रामा, कुंवर कन्हैय्या संग छबेली राधा रंग भरो है न्यारो रामा' असा 'झुला' गायला जातो. बरसत्या पावसात भिजण्याएवढाच आनंद या सुरांमध्ये चिंब होताना मिळतो.

श्रावणात दिसणारी इंद्रधनुष्य जणू या महिन्यातील सृष्टीची विविध रुपे आणि माणसाच्या मनातील आनंदाच्या तरंगांना प्रकट करणारा असतो. एखाद्या छायाचित्रकारासाठी निसर्गाचे ते रुप आकर्षण असते तर निसर्गप्रेमींसाठी पावसाळ्यातील भटकंतीची मजा महत्वाची. श्रावण एकीकडे सर्वांना ऐक्याच्या सुत्रात बांधतो. तर एकटेपणाचा अनुभव घेणाऱ्याच्या मनात प्रेमाची आशाही जागवतो. प्रत्येकासाठी या महिन्यात काहीतरी विशेष आहे. निसर्गाने दोन्ही हात मोकळे करून केलेली सौंदर्याची ही उधळण मनसोक्त अनुभवतांना श्रावणाकडून आनंद घ्यावा, उत्साह घ्यावा, वेगवेगळे रंग घ्यावे, ताजेपणा घ्यावा...आणि हो, स्वत:जवळ आहे ते इतरांना देतांना मुक्तपणे देण्याची वृत्ती तसेच निराशेच्या अंध:काराला मागे सारत नव्या दिवसाला सामोरे जाणाऱ्या किरणांचं तेजही जरूर घ्यावं...अगदी मोकळ्या मनाने घ्यावं...मनाची सर्व कवाडे बाजूला सारावी आणि पाहावं या श्रावणाने आपल्यासाठी काय आणलं ते?

  • डॉ.किरण मोघे 
  • No comments:

    Post a Comment