Thursday, July 12, 2012

शेतीतून आर्थिक उन्नती


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाधवडे येथील प्रगतीशील शेतकरी रमेश चव्हाण यांनी शेतीतून आर्थिक समृद्धीचा मार्ग निर्माण केला आहे. नारळ, केळी व आवळा शेतीची आधुनिक पद्धतीने लागवड करून त्यांनी शेतीतून दर्जेदार उत्पादन मिळविले. मिळालेल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी कोणत्याही बाजारपेठ अथवा व्यापाऱ्यांची वाट न बघता चव्हाण यांनी स्थानिक व्यावसायिकांना हक्काचा माल उपलब्ध करून दिला आहे. यामुळे ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिश्रमातून उभारलेल्या त्यांच्या शेतीने युवा पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.

सन १९८० ते १९९६ दरम्यान रमेश चव्हाण यांनी शासकीय ठेकेदार म्हणून तालुक्यात उल्लेखनीय काम केलेले आहे. रस्ता डांबरीकरण, साकव बांधकाम आदी कामे दर्जेदार करण्यात त्यांचा हातखंडा होता. नाधवडे व्हेळेवाडी दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांकडून त्यांनी २४ एकर जमीन खरेदी केली. शेती करण्यासाठी विहीर व ओढ्याचे मुबलक पाणी उपलब्ध करून सुरूवातीला त्यांनी नारळ, केळी, अननस व आवळ्याची लागवड केली. शेतीमध्ये ३५० नारळाचे उत्पादन देणारे माड आहेत.

येथे प्रताप, बानवली व टीडी जातीच्या नारळांची लागवड करण्यात आलेली आहे. बसराई, ग्रॅननाईन व श्रीमंती जातीच्या पाच हजार केळींची लागवड करण्यात आली आहे. कृष्णा, नरेंद्र, कांचन जातीच्या आवळा तर राजा जातीच्या अननसाची लागवड त्यांनी केली आहे. चव्हाण यांच्या बागेतील नारळ प्रतीनग १० ते १५ रूपयांना विकले जातात. व्यापारी व दलालांची वाट न बघता चव्हाण हे शेतीतील उत्पादन स्थानिक लोकांना माफक दरात देणे पसंत करतात. वैभववाडी व फोंडा बाजारपेठेतील व्यापारी केळी तर कोल्हापूर, देवगड व शिरगाव येथील व्यापारी आवळा ३० ते ३२ रूपयांनी खरेदी करतात. या प्रमुख पिकांबरोबर वाल, मोहरी, भेंडी, वरणा, वांगी यासारख्या आंतरपिकाच्या माध्यमातून घेतलेल्या भाजीपाल्यातूनही चव्हाण यांनी चांगले उत्पन्न घेतले आहे.

रमेश चव्हाण यांनी केवळ योजनांच्या फायद्यासाठी शेतीकडे न बघता शेती क्षेत्रात प्रामाणिकपणाला अधिक महत्व दिले आहे. तालुका कृषी विभागाकडून त्यांना चांगले सहकार्य मिळाले आहे. शेतीमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यपद्धतीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती शेती विभागामार्फत वेळोवेळी सहकार्य करण्यात आलेले आहे. शेतीच्या कामात दिरंगाई न करता जिद्द, तळमळ व चिकाटीच्या जोरावर ज्या त्या वेळी काम पूर्ण करणे यावर चव्हाण यांचा अधिक भर राहिला आहे.

आधुनिक पद्धतीने शेती करताना त्यांनी दहा ते बारा मजुरांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मजुरांना कुटुंबातील एक घटक मानून त्यांच्या सुख-दु:खात चव्हाण सातत्याने सावली बनून राहिले आहेत. अनेक गरजू मजुरांना त्यांनी हक्काचा आसरा उपलब्ध करून दिला आहे. शेती व्यवसायात स्वतःला झोकून देत चव्हाण यांनी कोल्हापूर, पुणे, कर्नाटक, केरळ, पंजाब, हरयाणा व बारामती याठिकाणी शेतीतील प्रात्यक्षिके पाहून शेतीविषयक माहितीचा मोठा खजिना जमविला आहे. राज्य शासनामार्फत आयोजित कृषी पर्यटन महोत्सवांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. रमेश चव्हाण यांच्या प्रयोगशील शेतीची दखल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने घेतली असून त्यांना सन २००९-१० मध्ये जिल्हास्तरीय सिंधू शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

No comments:

Post a Comment