Monday, July 16, 2012

संगीताला गवसला लाख मोलाचा सूर…

मेंढपाळ म्हटले की रानावनात भटकणारा असे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. इतकेच नाही तर शेळी-मेंढी पालन ही पुरुषांचीच मक्तेदारी आहे, असेही समजले जाते. या मक्तेदारीला अमरावती जिल्ह्यातील संगीता ढोके या विद्यार्थिनीने छेद दिलाय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय करुन अर्धवट सुटलेले शिक्षण तर तिने पूर्ण केलेच, शिवाय या व्यवसायातून वर्षाकाठी ६० लाख रुपयांची उलाढाल करून अनेक महिलांना रोजगारही दिला आहे.

शेतीला पूरकन व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, गाई-म्हशी पाळणे, भाजीपाला लागवड याकडे पाहिले जाते. अलीकडे यात शेळी-मेंढी पालनाची भर पडली आहे. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील लाडकी (बु.) या गावाच्या ढोके परिवाराचा शेळी-मेंढी पालन हा पारंपरिक व्यवसाय परंतु जगन्नाथराव ढोके यांनी शेळी-मेंढी पालन बाजूला सारुन पत्रकारिता, एक छोटे किराणा दुकान व घर बांधकामासाठी लागणाऱ्या बांबूफळ्यांचा व्यवसाय सुरु केला. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर कुटुंबाचा गाडा कसाबसा चालला होता. तथापि ढोके यांचे अकाली निधन झाले. परिणामी येणारा पैशाचा ओघही थांबला.

संगीता ही भावंडापैकी थोरली असल्यामुळे वडिलांच्या निधनानंतर कुटुंबप्रमुखाची जबाबदारी संगीतावर आली. एकीकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह तर दुसरीकडे बहीण-भाऊ व स्वत:च्या शिक्षणाचा खर्च या वैचारिक, मानसिक संघर्षातून ती जाऊ लागली. या अवघड परिस्थितीत तिने कुक्कुटपालनाचा व्यवसाय करण्याचा निर्धार केला. त्या व्यवसायातही तिला अपयश आले, ते अपयश पचवून परिस्थितीपुढे हतबल न होता तिने शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय करण्याचे ठरविले. सुरुवातीला थोडेफार पैसे जुळवून पाच शेळ्या विकत घेतल्या. रानावनात न भटकता तिने घरच्या घरीच शेळ्यांची देखभाल केली. तीन वर्षातच २० शेळ्या झाल्या. त्यानंतर मात्र पुरेशा भांडवलाअभावी शेळ्यांकरिता निवारा बांधणे तिला शक्य नव्हते. त्यातूनही मार्ग काढत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी-मेंढी विकास महामंडळाकडून तिने तीन लाखांचे अर्थसहाय्य घेतले. त्यातून शेळ्यांकरिता उत्तम निवारा उभा केला. शेळ्यांना गोठ्यात वावरताना नैसर्गिक वाटावे म्हणून तिने गोठ्यातले बांधकाम दगड, झाडे, लोखंडी बार यांच्या साहाय्याने केले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनंतर केंद्राच्या पॅकेजअंतर्गत तालुक्यातील काही बचतगटांना शेळ्या विकत घेण्याकरिता अनुदान देण्यात आले. त्या बचतगटांना संगीताने काही शेळ्यांची विक्री केली, तर स्वत:करिता काही छोटी पिल्ले विकत घेतली. ती पिल्ले मोठी झाल्यावर त्यांचीही विक्री केली. छोटी पिल्ले विकत घ्यायची व ती मोठी झाल्यावर विकायची. यातून संगीताकडे भांडवल खेळत राहू लागले. एकीकडे आर्थिक भरभराट होत असतांना दुसरीकडे तिने पाच एकर बागायती शेती खरेदी केली. शेतीत स्वत: राबून जमीनही कसून घेतली. संगीताची जिद्द व कामावरची निष्ठा बघून शेळी-मेंढी महामंडळाने व्यापारी कार्यक्रमांतर्गत शेळ्यांचे पुरवठादार म्हणून तिला कंत्राट दिले. विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, भंडारा, नागपूर व वर्धा या सहा जिल्ह्यांत शेळी-मेंढी पुरवठा करण्याचे संगीताचे काम आता नियमित चालू आहे. यातून ती वर्षाकाठी तब्बल ६० लाख रुपयांची उलाढाल करतेय, शिवाय याद्वारे तिने अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.

शेळीपालनाचे कोणतेही शास्त्रोक्त शिक्षण संगीताने घेतले नसले तरी, शेळ्यांचे आजार, औषधोपचार, चारा, गाभण शेळ्या व दुभत्या शेळ्यांची विशेष काळजी याविषयीची सर्व माहिती तिने आत्मसात करुन घेतली. शेळी वर्षातून तीन वेळा पिलांना जन्म देते. पिल्लू १५ महिन्याचे होताच ते त्याच्या पिलांना जन्म द्यायला सक्षम होते. त्यामुळे शेळ्यांचे उत्पादन सतत सुरुच असते. शेळीची कातडी, हाडे, यांना चांगली बाजारपेठ असल्यामुळे या व्यवसायात कोणताच तोटा होत नाही. शिवाय शेळ्यांपासून मुबलक प्रमाणात मिळणारे सेंद्रीय खत शेतीला पोषक ठरते, याचीसुद्धा संगीताला कल्पना आहे. मुत्राचा निचरा व्यवस्थित केल्यास आजूबाजूचा परिसर कोरडा राहण्यास मदत होते. त्यामुळे जनावरांचे आजारही बहुतांश दूर होत असल्याचे संगीता सांगते. बाजारात शेळीच्या कातडीला चांगली मागणी आहे. वाद्य साहित्य व चामड्याच्या महागड्या पर्स बनविण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. रक्त शुद्धीकरणासाठी शेळीचे दूध उपयुक्त आहे. अशा विविध उपयोगांमुळे शेळी उपयुक्त आहे.

ग्रामीण भागातील तरुणांनी नोकरीसाठी शहराकडे जाण्यापेक्षा गावात थांबून शेतीच्या जोडीला शेळीपालन व्यवसाय केल्यास त्यांना पगाराइतकेच किंबहुना त्याहून अधिक उत्पन्न मिळू शकते, असे संगीताचे अनुभवातून तयार झालेले मत आहे. भविष्यात उस्मानाबादी, बोअरक्रॉस, शिरोही (राजस्थानी) अशा प्रजातीच्या ५०० ते १००० शेळ्या व बोकडांचे संगोपन करण्याचा तिचा मानस आहे. शेळीपालनाचा व्यवसाय करुन संगीता एवढ्यावरच थांबली नाही, तर ग्रामीण भागातील शेतीवर चालणारे उद्योग शासनाच्या योजनांची माहिती व बचतगटांच्या महिलांकरिता त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी तिने झरा या सामाजिक संघटनेची स्थापना केलीय. या संघटनेअंतर्गत भटके विमुक्तांसाठी लढा, भटक्यांना खुले चराईक्षेत्र, निसर्ग संसाधनात वाटा, हक्काचा विकास निधी, गुराख्यांना गुरे चारण्याचे अधिकार, पशूंकरिता मुबलक पाण्याचा साठा, शासनाच्या पशुविषयक यादीमध्ये मेंढ्या-बकऱ्यांचा समावेश तसेच वित्तीय सहायता, पशुविमा, त्यांचे प्रजनन, फिरती पशुचिकित्सा सेवा, औषधी व पशू उत्पादनाची वितरण व्यवस्था सशक्त करण्यासाठी संगीता प्रयत्न करतेय.

संगीताने शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळवून कुटुंबाला आधार दिलाय. कधीकाळी विस्कटलेल्या आर्थिक घडीमुळे अर्ध्यावर सोडावे लागलेले स्वत:चे शिक्षण पूर्ण करायला मात्र ती विसरली नाही. संगीताने मुक्त विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या या पदवी शिक्षणक्रमाला प्रवेश घेतला. समाजाभिमुख पत्रकारितेचे व्रत स्वीकारुन तिने आपल्या धारदार लेखणीतून अनेकांना न्याय दिला आहे. त्यासोबतच रुढी-परंपरेने जखडून ठेवलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी अनेक आंदोलने, उपोषणे करुन सामाजिक चळवळीमध्ये प्रत्यक्ष सहभागही नोंदविला आहे.

No comments:

Post a Comment