Wednesday, July 25, 2012

अवैद्य बांधकामाना आळा घालण्याकरीता तीन महिन्यात धोरणात्मक निर्णय

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात अवैघ बांधकामाच्या विषयावर गंभीर चर्चा झाली. सर्व शिक्षा अभियाना बाबतही चर्चा झाली. शिक्षण आणि आरोग्य या विषयावरील चर्चेला शासनाने दिलेले सविस्तर उत्तर हेच कामकाजाचे वैशिष्ट्य होते.

विधानसभेचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासाने सकाळी अकरा वाजता सुरु झाले. १३ जुलै रोजी प्रश्नोत्तराच्या तासात राखून ठेवलेल्या सर्व शिक्षा अभियानातील पुस्तक खरेही प्रकरणी घोटाळा झाल्याच्या विषयावर विरोधी पक्षांचा आक्षेप होता. या विषयावर चौकशी करण्याची तयारी राज्यमंत्री फौजीया खान यांनी दर्शवली पण विरोधी पक्ष फौजदारी चौकशी हवी असा आग्रह करत होते. त्यावेळी नेमकी कोणती चौकशी करणार याचा निर्णय विभागाने घेवून सदनाला अवगत करावे असा निर्देश अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

वाशिम जिल्ह्यात वडगाव ते धावंडा या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. याबाबत कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. ठाणे जिल्ह्यातील अर्नाळा येथे शासकीय जागेवर रिसॉर्ट चे काम झाले नाही असा निर्वाळा महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी दिला. विवेक पंडित यांचा तारांकित प्रश्न होता. या प्रकरणी सदस्यांच्या माहितीवर तपासणी करण्याची सूचना अध्यक्षांनी केली. चिमूर तालुक्यात गरडापार या गावात आदिवासींच्या शेतजमीनी शेतकरी नसलेल्या व्यक्तींनी खरेदी केल्या प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचा प्रश्न होता. या विषयावर सुनावणी प्रलंबित असल्याचे राज्यमंत्री सोळंके यांनी सांगितले, मात्र सकृतदर्शनी जी माहिती हाती आली आहे ती तपासून मूळ मालकाना जमिनी परत दिली जाईल असे ते म्हणाले. राज्यातील अवैध बांधकामे रोखण्याकरीता धोरणात्मक निर्णय येत्या तीन महिन्यात घेण्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. या विषयावर अशोक पवार यांचा प्रश्न होता. हा विषय अत्यंत चिंतेचा असल्याने कालबध्दपणे यावर निर्णय घेतला पाहिजे या करीता सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक आपण दालनात घेवू अशी सूचना अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली. राजुरा पंचायत समिती हद्दीत कलापथकाने कार्यक्रम न करताच निधी चा अपहार केला नाही अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली, या प्रकरणी अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्या मार्फत एका महिन्यात चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कागदपत्र पटलावर ठेवण्याचे कामकाज त्यानंतर घेण्यात आले. लोकलेखा समितीचा नववा अहवाल सदनात सादर करताना काही अधिकारी खोटी कारणे देवून समिती समोर हजर राहणे टाळतात अशी नोंद समिती प्रमुख गिरीश बापट यांनी केली. सरकारकडून देखील विधीमंडळ समित्यांच्या कामकाजाला महत्त्व दिले जात नाही असा आक्षेप त्यांनी घेतला. हे निरीक्षण गंभीर असल्याची टिपणी करत अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहाइतकेच समित्यांचेही महत्त्व असल्याचे स्पष्ट केले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी नियम ४७ अन्वये खुलासा केला. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप फेटाळून याविषयावर चर्चा करायला तसेच फाईल्स दाखवायला आपण तयार आहोत असे ते म्हणाले. या विष्यावर विरोधक आक्रमक झाले तेव्हा गदारोळामुळे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले. अखेर येत्या दोन दिवसात चर्चा करण्याचे मान्य केल्यावर गोंधळ निवळला. परभणीचे पालकमंत्री प्रकाश सोळंके यांच्या विरुद्ध रामप्रसाद बोर्डीकर यांनी विशेषाधिकार हक्कभंगाची सूचना दिली.

नियम २९३ अन्वये शिक्षण आणि आरोग्य या विषयावरील चर्चेला आज राज्य सरकारच्या वतीने उत्तर देण्यात आले. सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यानी या प्रदिर्घ चर्चेला उत्तर देताना धर्मादाय कायद्यानुसार स्थापन केलेल्या रुग्णालयात १० टक्के खाटा गरीब गरजू रुग्णांना उपलब्ध करुन देणे अनिवार्य करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय खात्याकडे प्रलंबित आहे असे ते म्हणाले येत्या वर्षअखेर राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यभर लागू करण्याची योजना असल्याची माहितीही शेट्टी यांनी दिली.

शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी येत्या एप्रिल (२०१३) पर्यंत सर्व शाळांना स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल अशी घोषण केली. दर्जेदार शिक्षणाकरीता दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमात बदल केले जात आहेत. टप्याटप्याने १ ते १० चा अभ्यासक्रम देखील बदलण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाईल असे त्या म्हणाल्या. ३४ हजार शिक्षकांची पदे निर्माण केली जात असून प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक या संकल्पनेनुसार ती लवकरच भरण्यात येतील असे फौजीया खान यांनी स्पष्ट केले. सर्वकष मुल्यमापन पद्धती लागू करण्यात आल्याने दर्जेदार शिक्षण परिक्षा पद्धती घालून देण्याचा प्रयत्न शासन करत आहे असे त्यांनी सांगितले.

हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना या विषयावर राज्यमंत्र्यांचे उत्तर सुरु होते.

किशोर आपटे
(मो.९८६९३९७२५५)

No comments:

Post a Comment