Saturday, July 14, 2012

कर्जतच्या बळीराजाने फुलविले शिवार

रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोषाणे येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतावर विविध पिकांचे प्रयोग करीत कर्जतच्या जमिनीत सर्व प्रकारची पिके काढता येतात हे सिद्ध केले आहे. यामुळे खुद्द कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंना त्याच्या प्रक्षेत्रावर जाऊन भेट देण्याचा मोह आवरला नाही.

कोषाणे येथील हरिश्चंद्र ठोंबरे या शेतकऱ्याचा दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय आहे. त्यांच्या या उद्योगाला त्यांच्या कुटुंबियांची नेहमीच साथ मिळाली. ठोंबरेची शेती गावानजिकच आहे. कधी मका तर कधी ज्वारी, बाजरीचे उत्पन्न त्यांनी काढले. पाच-सहा वर्षापूर्वी त्यांनी मुळ्याचे विक्रमी उत्पन्न काढले होते. त्यातील एका-एका मुळ्याचे वजन तीन ते पाच किलोपर्यंत भरले होते.

वेगवेगळे प्रयोग करणे हा ठोंबरे यांचा छंद. कधी ग्रामस्थांच्या शेतावर, तर कधी स्वत:च्या शेतावर त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. त्यासाठी त्यांनी उल्हास नदीतील पाणी लिफ्ट करुन वापरले. पण पीक तयार होण्यास आले की नदीतील पाणी आटत असे. त्यामुळे काही वेळा हातीतोंडी आलेले पीक गुरांसमोर टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली. अखेर त्यांनी आपल्या शेतावर बोअरवेल घेण्याचा निर्णय घेतला. या प्रयत्नाला कमालीचे यश आले. संपूर्ण शेती सिंचनाखाली येईल इतके पाणी या बोअरवेलला लागले. त्यावेळी ठोंबरे यांना आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटले. त्यांनी शेतावरच घर बांधले. शेतीला गुरांपासून वाचविण्यासाठी कुंपण घातले. यंदा त्यांनी कांदा, बटाटा, वांगी, मिरचीबरोबरच दुधी भोपळा व कलिंगडाचे पीक घेतले आहे. केवळ पाचच कांद्यांचे वजन दीड किलोपर्यंत होऊ लागले आहे. ठिबक सिंचन पद्धतीने कलिंगडाचे पीक घेतले. कर्जत-नेरळ रस्त्यावरच त्यांचे शिवार असल्याने येणारे-जाणारे प्रवासी व ग्रामस्थांमध्ये दररोज दोन ते तीन हजार रुपयांच्या कलिंगडांची विक्री होत आहे.

डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.किसन लवांडे व कृषी विस्तार अधिकारी डॉ.रवींद्र मर्दाने यांनी त्यांच्या शेतीवर भेट देऊन त्यांना शाबासकी दिली. त्याचबरोबर योग्य सूचना देऊन अधिक चांगले पीक कसे काढता येईल, याबाबत सल्लाही दिला.

No comments:

Post a Comment