Thursday, February 2, 2012

मुलगी वंशाची ज्योत


गेल्या आठवड्यात संपूर्ण देशभर राष्ट्रीय बालिका दिन साजरा झाला. परंतु हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश खरंच सफल होत आहे का ? ही विचार करण्यासारखी बाब आहे. आज देखिल मुलीला जन्माला येण्याचा हक्क हा समाज हिरावून घेताना दिसतो.

२४ जानेवारी, १९६६ साली इंदिरा गांधीनी पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि भारतीय महिलांच्या जीवनाला नवी दिशा मिळवून दिली. एका महिलेने भारताचे पंतप्रधान हे राजकीय क्षेत्रातील मानाचे पद भूषविणं हे त्याकाळात खरोखरच सर्व स्त्री जातीसाठी भूषणावह व अभिमानाची बाब होती आणि ती कायम स्वरूपी राहिली. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात सर्व क्षेत्रात महिला महत्वाची भूमिका उत्कृष्टपणे पार पाडत आहेत. तरी देखील समाजाने स्त्रीला दुय्यम दर्जा आणि बंधनांच्याच जाळ्यात अडकवून ठेवले आहे. परंतु स्त्रीने तिच्यावर असणाऱ्या बंधनांचा बाउ न करता ती तिचे सर्व कर्तव्य पार पाडत आहे.

निसर्गात जसे पुरूषाचे स्थान महत्वाचे आहे तसेच महिलेचे देखिल आहे. स्त्री पुरुष हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत, हे त्रिकालाबाधित सत्य कुणीही नाकारू शकत नाही. याच निसर्गाने प्रत्येक गोष्टींना काही मर्यादा घालून दिल्या आहेत. परंतु निसर्गाने घडविलेल्या या चक्रावर “स्त्रीभृण हत्या” करून मात करण्याचा प्रयत्न मनुष्य करु बघत आहे. अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या या स्त्रीभृण हत्यांमुळे स्त्री पुरूषांच्या प्रमाणातील वाढणारा असमतोल हा धोकादायक ठरणारा असुन गेल्या काही वर्षांतील मुलामुलींचे जन्मदर पाहता मुलींच्या बाबतीत परिस्थिती भयावह दिसून येते. याच परिस्थितीवर उपाय म्हणून व स्त्री भृण हत्या याबाबत जनजागृती व्हावी या विचाराने महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून २००९ सालापासून २४ जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय बालिका दिन” म्हणून साजरा केला जातो.
गेल्या वीस वर्षातील महाराष्ट्रातील दर हजारी मुलांमागील मुलींचे प्रमाण पाहिले तर १९९१ साली ९४६, २००१ मध्ये ९१३ आणि २०११ साली ८८३ इतके आहे. मुलींच्या जन्माचा घसरता आलेख पाहता तंत्रज्ञानाचा वाढता गैरवापर देखिल कारणीभूत आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ आले असले तरी चिमुकल्या कळ्यांना गर्भातच चिरडण्याचे प्रमाण वाढले आहे.

सोनोग्राफीसारख्या मशीन्समुळे आईच्या पोटातील बाळाचे आरोग्य समजण्यास मदत होते पण आता या सोनोग्राफी मशिनचा गर्भलिंग जाणून घेण्यासाठी सर्रास वापर होत आहे. या कृत्याला कोठे तरी आळा बसावा यासाठी शासनाकडून कायदे करण्यात आले. परंतु एक कायदा तयार झाला की त्यातून पळवाटा देखिल निघतात. त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी स्त्रीभृण हत्येचे गुन्हे घडत असले तरी कार्यवाही ही बोटावर मोजता येतील इतक्या व्यक्तीही आढळून येत नाही. मुलीच्या गर्भाचा आईच्या पोटातच जीव घेणाऱ्या डॉक्टरांवर दंडात्मक कार्यवाही करून त्यांना शिक्षादेखिल झाली परंतु त्यातून शिकवण न घेता सोनोग्राफी सेंटर्स सारखे कत्तलखान्यांचे कार्य छुप्या पध्दतीने सुरूच आहे.

वाढते स्त्रीभृण हत्या प्रमाण थांबविण्यासाठी १९९४ साली गर्भलिंग निदान कायदा केला पण या कायद्याने काहीही फरक पडला नाही. उलटपक्षी यात वाढच होत आहे. त्यामुळे २००३ मध्ये या कायद्यात काही बदल करून “पीसी ॲण्ड पीएनडीटी ॲक्ट” अस्तित्वात आला. या कायद्यान्वये डॉक्टरर्स जितके जबाबदार आहेत तितक्याच प्रमाणात गर्भवती स्त्रीवर दडपण आणणारी सासर किंवा माहेरची मंडळी देखिल दोषी मानण्यात आली आहेत. असे असूनही आज ८- ९ वर्षानंतरही चित्र बदलले नाही. समाजात मुलींना जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून मुली वाचवा, लेक लाडकी अशा अभियानांच्या मार्फत जनजागृती करण्यात येत आहे.

ही परिस्थिती बदलण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. मुलींच्या प्रमाणातील घट समाज व्यवस्थेवर विपरित परिणाम करीत आहे. त्यामुळेच लग्नासाठी मुलींची आयात करण्याचे प्रमाण वाढले तसेच काही ठिकाणी मुली मिळत नाही म्हणून आदिवासी भागातील मुलींना पळवून आणून त्यांना लग्नासाठी विकलं जाते, त्यांच्यावर बलात्कारासारखे अतिप्रसंग ओढावतात. यासर्व परिस्थितीचा सखोल विचार करता या तंत्रज्ञाना इतकीच सामाजिक मानसिकता व पूर्वापार चालत आलेली पुरूषप्रधान संस्कृतीदेखिल जबाबदार आहे.

पुरूषप्रधान संस्कृतीच्या अधिपत्याखाली जगणाऱ्या समाजाला जोपर्यंत स्त्रीभृण हत्येच्या वाढत्या परिणांमाचे गांर्भीय लक्षात येणार नाही तोपर्यंत केलेल्या कायद्यांचा काहीच परिणाम होणार नाही. यासाठी स्त्री जातीनेच तिच्या जातीसाठी लढणं आवश्यक आहे.

आजच्या आई ने कुठल्याही नात्यांच्या दबावाला बळी न पडता आईला जन्म देऊन तिचं रक्षण करणं, तिला उमलू देणं गरजेचे आहे. आजच्या समाजाने मुलीला जबाबदारी किंवा पाप समजण्यापेक्षा मुलीचे आई वडील म्हणून ताठ मानेने जगणे स्विकारले पाहिजे. एकीकडे स्त्रीभृण हत्या जरी वाढत असल्या तरी बोटांवर मोजण्या इतके सुजाण आई वडील देखिल आहेत की ते आपल्या मुलींसोबत आनंदाने आयुष्य जगताहेत.

मुलांना आयुष्याचा आधार समजणाऱ्या आई वडिलांना जेव्हा तीच मुले म्हातारपणी वृध्दाश्रमाचा रस्ता दाखवितात, त्यावेळी प्रेमाने आणि मान सन्मानाने आई वडिलांची सेवा करणाऱ्या मुली बघितल्या की, रणरणत्या उन्हात मायेची सावली मिळाल्याचा आनंद होतो. परंतु अशा घटना क्वचितच ऐकायला येतात. यासाठी मुलास वंशाचा दिवा समजणाऱ्या समाजाने आपल्या “वंशाच्या दिव्या” ला तेवत ठेवण्यासाठी मुलगी नावाची “वात” जपायलाच हवी. त्यामुळे स्त्री पुरूषांमधील असमतोल वाढू न देता, “मुलीला वाचवा – वंशाची ज्योत तेवत ठेवा !

No comments:

Post a Comment