Wednesday, February 15, 2012

बचतीने बदललं आयुष्‍य!

वर्धा जिल्‍ह्यातील कारंजा तालुक्‍यात असणाऱ्या नारा गावातील ‘आशीर्वाद’ स्‍वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलांचे आयुष्‍यच आता बदलून गेले. पोटापाण्‍याची सोय व्‍हावी यासाठी सुरु केलेल्‍या उपक्रमातून मसाले उत्‍पादनात या गटाने आघाडी घेतली आहे. या गटाची कहाणी इतर महिलांना एक शिकवण ठरावी अशीच आहे.

गावातील गरीब महिलांना चांगले जीवन जगता यावे व त्यांना स्‍वयंप्रेरणेने आपल्‍या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा, म्‍हणून २००६ साली या बचतगटाची निर्मिती करण्‍यात आली. महिला सक्षम व्‍हाव्‍यात, त्‍यांनी पोटापाण्‍यापुरता एखादा छोटासा व्‍यवसाय करावा, यासाठी सुरूवातीला संघटक मंदा सूर्यभान वंजारी यांनी त्यांना मार्गदर्शन केले. गटाच्या प्रवासाबाबत अध्‍यक्ष बबिता बाबुलाल सोनटक्‍के यांनी माहिती दिली.

महिलांना प्रशिक्षण देऊन, व्‍यावसायिक पुस्‍तके देऊन व्यवसाय करण्यास प्रेरित करण्यात आले. त्‍यातूनच सर्व महिलांनी हळद, मिरची, मसाला दळण (कांडप) व्‍यवसाय सुरु करण्‍याचे ठरविले. आता तो व्‍यवसाय सुरळीत चालू आहे. त्‍या व्‍यवसायातून महिला दर महिन्‍याला मासिक बचत करतात.

बचत गटाला दहा हजार रुपये फिरता निधी देण्यात आला. गटाच्‍या महिला आपले रोजचे घरगुती काम, शेतीचे काम सांभाळून आळीपाळीने व्‍यवसाय सांभाळतात. बचत गटाची बैठक दर महिन्याच्या ५ तारखेला घेण्‍यात येते. त्‍या बैठकीत मात्र सर्व महिला हजर राहतात व गटातील कार्यात जातीने लक्ष देतात. बैठकीची वेळ रात्रीची ८ नंतरची ठेवण्‍यात आल्‍यामुळे सर्व महिला आपापली कामे संपवून बचत गटातील विषयांवर चर्चा करतात. बचत जमा करणे, कर्ज वाटप करणे, कर्ज परत करणे या विषयावर बैठकीत चर्चा केली जाते.

बैठकीच्या माध्यमातून सर्व महिलांच्‍या अडचणी सोडविणे शक्य होऊ लागल्यामुळे त्या महिला बचत गटामध्‍ये जोमाने कार्य करु लागल्‍या. बचत गटाला विकास विषयक प्रशिक्षण देण्‍यात आले. त्‍यामुळे गावातील महिलांचा आत्‍मविश्‍वास वाढला.

आज घडीला गटातील महिलांचा सर्व कार्यामध्‍ये सक्रीय सहभाग दिसतो. गटात सामील झाल्‍यापासून महिलांचा आत्‍मविश्‍वास वाढलेला आहे. आज गटातील महिला रोज कमी अधिक प्रमाणात व्‍यवसाय करताना दिसत आहेत. महिला गावातील प्रत्‍येक योजनेला प्रतिसाद देतात. त्‍यांच्यातील न्‍युनगंड कमी होऊन शिक्षणाविषयी आदर निर्माण झाला आहे. महिलाही आज लिहिताना, वाचताना, व्‍यवहार करताना दिसत आहेत.

ज्‍या महिला आधी नकारात्‍मक प्रवृत्तीच्‍या होत्‍या, त्‍या आज सकारात्‍मक झालेल्‍या दिसून येतात. त्‍यांच्‍या व्‍यवहार कुशलतेची पावती म्‍हणजे ४८ हजार रूपये खर्चून त्‍यांनी आपल्‍या व्‍यवसायासाठी मिरची, हळद, मसाला कांडप मशीन घेतली व तिच्‍या परतफेडीची पावले उचलणे सुरु आहे.

महिलांना उपजिविकेचे साधन उपलब्‍ध झाले आहे. त्‍यांना शिक्षणाचे, व्‍यवहाराचे, व्‍यवसायाचे महत्व कळले आहे. दारिद्र्य रेषेखालील महिला आपल्‍या पायावर उभे राहणे हे नक्कीच कौतुकास्‍पद आहे. महिला सक्षम झाल्‍याचेच हे उदाहरण आहे.

No comments:

Post a Comment