Friday, February 24, 2012

स्वयंपूर्ण ग्राम : धोंडेवाडी

जेमतेम चारशे लोकसंख्या असलेल सातारा तालुक्यातील धोंडेवाडी गाव. परिसर बागायती असला तरी मुळचं गाव जिरायती क्षेत्रातच वसलेलं. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या या गावानं एकीच्या बळावर जिद्द आणि कष्टाने महात्मा गांधीजीच्या स्वप्नातील खेड घडविण्याचे क्रांतीकारी काम धोंडेवाडीच्या ग्रामस्थांनी करुन साऱ्या जिल्ह्यासमोर स्वयंमपूर्ण गावाचा आदर्श निर्माण केला आहे.

सातारा शहरापासून अवघ्या २०-२२ किलो मीटर अंतरावर लहानश्या टेकडीवर वसलेलं हे धोंडेवाडी गाव केवळ ७२ कुटुंबाचं असलेल्या गावात एकीचं मोठ बळ लाभल्याने गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा लाभली. गावाचे सरपंच अंकुश घाडगे, उपसरपंच दादा घाडगे यांना गावाच्या विकासासाठी सहाय्य आणि प्रोत्साहित केले ते शेजारच्या गावचे तरुण कार्यकर्ते माणिकराव शेडगे, यांनी स्वत:चं गाव समजून माणिकरावांनी धोंडेवाडीच्या गतीमान विकासाला खऱ्या अर्थाने साथ दिली. स्वत:चे घर, संसारात थोड लक्ष कमी करुन धोंडेवाडीच्या विकासासाठी त्यांनी सर्वस्व वाहिल. म्हणूनचं धोंडेवाडीच्या तरुण, अबालवृध्द मध्ये त्यांना आदराचं स्थान आहे.

१९९१ ला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा बहुमान धोंडेवाडीला लाभला. कोणतीही राजकीय परंपरा अथवा वारसा नसलेल्या धोंडेवाडीकरांनी एकोप्याने गावाचा विकास साधायचा संकल्प केला. त्यानुसार गावातल्या सर्वांनीच विशेष: महिला वर्गांनी ग्रामसभेच्या माध्यमातून एकीचं दर्शन घडविलं गावाचा कोणताही प्रश्न अथवा समस्या असो त्यावर तोडगा काढण्याचं काम धोंडेवाडीच्या ग्रामसभेने करुन दाखविले आहे. राज्य शासनाला अभिप्रेत असलेली बळकट ग्रामसभा निर्माण करण्याचं आदर्शवत काम धोंडेवाडीच्या ग्रामसभेनं केल आहे. गावाच्या विकासाचे सर्व अधिकार ग्रामसभेला देवून नवा इतिहास धोंडेवाडीने निर्माण केला आहे. त्यामुळेचं धोंडेवाडीमध्ये अलीकडील काही वर्षात सुमारे ७०-८० लाखाची कामे श्रमदान, लोकसहभाग आणि शासन योजनातून झाली आहेत.

धोंडेवाडी गावाने श्रमदान, लोकसहभाग आणि शासन योजनातून प्रामुख्याने गावातील अंतर्गत रस्ते, घर तेथे शौचालय गावातील मंदिरे, दत्त टेकडीचा विकास, पाणीपुरवठयाची व्यवस्था, शेतीसाठी पाणी पुरवठा, गोबरगॅस, बचतगटाची चळवळ, निर्मलग्राम, तंटामुक्त अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान, बचतगटाची दुध डेअरी, गांडूळ खत प्रकल्प, रेशिंग दुकान, सोया प्रॉक्ट अशा विविध उपक्रमातुन स्वालंबी धोंडेवाडी निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न गावकऱ्यांनी केला आहे.

धोंडेवाडी गाव तसं जिरायती पट्टयात मोडत पण या गावकऱ्यांनी अजिंक्य तारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गुरुनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था सुरु करुन गावाचं सुमारे ३५० एकर क्षेत्र ओलीता खाली आण्‌ून ऊस, ज्वारी, गहू , आलं, सोयाबीन आदी नगदी पिके घेवून आर्थिक बाजूने स्वावलंबी होण्यात यश मिळाविले आहे. येथिल बहादर शेतकऱ्यांनी कष्ट आणि जिद्दीने फुलविलेली शेती पाहताना आनंदाने आणि उत्साहाने एक पाऊल पुढचं पडतं याची जाणीव निर्माण होते. त्यामुळे छोटयाश्या टेकडीवर वसलेल्या धोंडेवाडी गावाला हिरव्यागार शिवारामुळे बेटाचं स्वरुप प्राप्त झालं आहे.

संपूर्ण शाकाहारी असणाऱ्या गावानं काही पंरपरा जोपासल्या असून ग्रामसभेच्या माध्यमातून गावाच्या परंपरेला कायदेशीर अधिकार मिळवून दिला आहे. यामध्ये दरवर्षी गोकुळष्टमिला गो महोत्सव हे एक अगळेवेगळे वैशिष्ट आहे. देशी खिलार गाईचे प्रदर्शन भरवून त्यातील तीन क्रमांक पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून निश्चित करुन त्यांना बक्षीसे दिली जातात. तसेच देशी गाईच्या संगोपन आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या शेतकऱ्यांनाही बक्षीसे दिली जात आहेत. गावाला अध्यामचा मोठा वारसा लागला असून भजनी मंडळ असून मुलींचेही स्वतंत्र भजनी मंडळ गावात आहे. यामुळे जनजागृतीचा आणि प्रबोधनाचं मोठ काम या गावात झालं आहे.

ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान, पर्यावरण संतुलित ग्रामयोजना यासारख्या शासन योजनातून भरीव निधी गावासाठी खेचून आणण्याचं काम धोंडेवाडीच्या ग्रामसभेनं केले आहे. ग्रामस्वच्छता अभियानात गौरवशाली काम करुन निर्मलग्राम घडविण्याचं कामही येथील ग्रामसभेनं केल आहे. घर तेथे शौचालय या मोहिमेतून साडेसहा लाखाचे कर्ज सोसायटीकडून गावकऱ्यांना उपलब्ध देण्याचा एकमुखी निर्णय घेणारी हीच ती धोंडेवाडीची ग्रामसभा गावातील मारुती मंदिरा समोर पारावर या गावाच्या विकासाचं रुप ठरवलं जात आहे. निर्मलग्राम पुरस्कार मिळवून गावकरी शांत बसले नाहीत. त्यांनी गावानजीकच्या दत्तमंदिराचा जीर्णोधार केला. आणि ही दत्तटेकडी वृक्षाछादीत करण्याच्या उद्देशाने या फोडांमाळरान असलेल्या टेकडीवर श्रमदान आणि लोकसहभागातून सुमारे ४००-५०० झाडे लावून सवंर्धन करण्याचे महत्वकांक्षी काम गावकऱ्यांनी केलं आहे. दत्तटेकडी नजीक ५०० मीटरचा रस्ता ही गावकऱ्यांनी पाणदं रस्ता म्हणुन एमआरएजीएस मधुन विकसित केला आहे. त्याबरोबरचं गाव आणि परिसरात वृक्षरोपणांचा आणि सवंर्धनाचं नवा उपक्रम राबविला आहे.

गावात महिला सबलीकरणाच्या दृष्टिने ग्रामसभेनं विशेष लक्ष केंद्रित केले असून गावात महिला बचत गटाची चळवळ एक लोकचळवळ म्हणून पुढे आली आहे. गावात महिलांचे १०-१५ बचत गट असून या बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी स्वतधान्य दुकान, केरोसिन विक्रिी, दुधडेअरी, सोया प्रॉक्ट, गांडुळ खत असे विविध अंगी उपक्रम हाती घेतले आहे. त्यामुळे धोंडेवाडीच्या महिलांनी स्वावलंबी आणि आत्मनिर्भयतेच्या दृष्टिने वाटचाल सुरु केली आहे. गावाचा विकास करताना भावी पिढीकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता ग्रामसभेने घेतली आणि शिवाजीराव यादव यांच्या नेतृत्वाखाली शाळासुधार समिती स्थापन करुन शिक्षणांवर लक्ष केंद्रित केले. दोन शिक्षिकी असणाऱ्या या शाळेने विद्यार्थी घडविण्याचं काम चोख बजावून चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये शिक्षिक प्रदिप यादव आणि भगवान चव्हाण यंानी अधिकाधिक विद्यार्थी आणण्याचं काम केल आहे.

गावाच्या विकासाचे सर्व निर्णय गावाच्या मारुती मंदिरा समोरी पारावरच ग्रामसभेच्या माध्यमातून घेवून गावाचा विकास एकाछताखाली करण्याचं काम धोंडेवाडीच्या ग्रामसभेनं केल असून एक छोटयागावाने श्रमदान, लोकसहभाग आण शासनयोजनातून आदर्श खेडे निर्माण करण्याचे काम करुन साऱ्या महाराष्ट्रासमोर नवा ग्रामविकास आदर्श निर्माण केला आहे.

No comments:

Post a Comment