Tuesday, February 7, 2012

मराठी भाषेच्या कालिक विकासाचे टप्पे

मराठीची उत्पत्ती केव्हा झाली याबद्दल डॉ. चिं.बि.वैद्य यांनी इ.स. आठवे शतक आहे असे मत मांडले आहे. कोणतीही नवीन भाषा अस्तित्वात येण्याचे कारण एखादी क्रान्तिसदृश उलथापालथ घडवणारी घटना असते असे मत मांडून त्यांनी मराठीच्या उत्पतीचे कारण म्हणून शंकराचार्यांची मोहीम ही घटनाच असल्याचे ते सांगतात. याउलट डॉ. पां.ना.गुणे यांनी त्यांच्या मतांचे खंडन करुन स्वत:चे मत मांडले आहे. त्यांच्या मते नवीन भाषेची निर्मिती दोन भिन्न भाषा संस्कृतींच्या सरमिसळीतून होते. मुसलमानी आक्रमणामुळे असा संस्कृतीसंगम झाला. ही आक्रमणे अकराव्या शतकात सुरु झाली. डॉ. गुणे यांच्या मते मराठीची उत्पत्ती या संस्कृतीसंगमामुळे अकराव्या शतकात झाली. या दोन विद्वानांच्या खंडन-प्रतिखंडन इ.च्या आवर्तनांमुळे १९२४ ते २६ या काळात हा वाद खूप रंगला. त्याला वैद्य-गुणे वाद असे म्हणतात. या वादाचा निर्णय करायचा झाल्यास वैद्यांनी सांगितलेला काळ आणि डॉ. गुणे यांनी सांगितलेले कारणही बरोबर आहे असा समन्वय साधून करावा लागेल.
मराठीचा कालिक विकास

मराठीच्या उत्पत्तीसंबंधीची ही चर्चा इथेच थांबवून आता तिच्या पुढील काळातील विकासाचा आता मागोवा घ्यावयाचा आहे. या विकासाचा आढावा घेताना शतकनिष्ठ, राज्यकर्तृनिष्ठ, साहित्यिकनिष्ठ, संप्रदायनिष्ठ टप्पे करुन निरनिराळ्या प्रकारांनी आढावे घेता येतो. पण कोणत्याही प्रकारने आढावा घेतला तरी त्यात काही ना काही त्रुटी राहतातच. तेव्हा यापैकी कशाचाच मार्ग न स्वीकारता मराठीच्या उगमापासून ते आजतागायतच्या काळाचे आदि, मध्य आणि अर्वाचीन असे खंड पाडून आढावा घेणे सोयीचे जाते, त्यानुसार आरंभापासून ते १३५० हा मराठीचा आदिकाल मानला जातो. १३५० ते १८५० हा मध्यकाल असून १९५० ते आजतागायत हा अर्वाचीन काळ मानला जातो.

आदिकाल

आदिकालातील मराठीचे स्वरुप आपल्याला शिलालेख, ताम्रपट यांतील गद्य मजकूर लीळाचरित्र स्मृतिस्थळ इ. महानुभवीय गद्य ग्रंथ, महानुभावीय पद्यमय ग्रंथ, ज्ञानेश्वर नामदेवादिकांच्या अभंगात्मक स्फुट रचना आणि ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी हे ज्ञानेश्वरांचे ओवीबद्ध ग्रंथ यांतून पहायला मिळते. कोरीव लेखांची गद्य भाषा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांचे विषय स्मारकस्तंभ, मंदिरांची उभारणी, देणगीदारांची नावे, वास्तूच्या संरक्षणासाठी शपथा, इत्यादीपुरते मर्यादित आहेत. कोरीव लेख महाराष्ट्राच्या निरनिराळ्या प्रदेशात विखुरलेले असल्याने त्यांच्या भाषेत त्या त्या प्रदेशांची वैशिष्ट्ये उमटलेली आहेत. शिलालेख दगडावर कोरलेले असल्यामुळे त्यांच्या मजकुरात कुणी फेरफार करु शकत नाही. त्यामुळे ते तत्कालीन भाषेचे यथार्थ दर्शन घडवणारे असतात. त्यापैकी एका शिलालेखाच नमुना पुढीलप्रमाणे

... तस्मिन काले वर्तमाने त्रेता-युगी रामु: वनवासप्रसंगी सरभंगाच आ आश्रमा आले. सर भंग प्रीत्यर्थ हे उंद दक उष्ल केले: तदा काल्ये स्सि देवरचित तीर्थ हे हरीहरा प्रसादे मातापुर निवासी क-सी-ष्य: कौंडण्य गोत्र: सरणु ना एक: रुतेमेर्वृते: सकल प्रासादारंतु केले: तो राम प्रासादु संपूर्ण जाला: तेयाचा नमस्कारु: हरी हरा...देवता सकलांसि नमस्कारु त्रिकाल: वाचिता विजेया...
(उनकेश्वराचा शिलालेख शके १२११ (१२८९)

शिलालेखांच्या मानाने ताम्रपट भाषेच्या दृष्टीने कमी विश्वासार्ह आहेत. ते आकाराने लहान असतात. खाजगी मालकीचे असतात. आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात. त्यामुळे त्यांच्यात फेरफार होण्याची शक्यता असते. ग्रंथगत साहित्यामध्ये या काळातील महानुभावांचे गद्य ग्रंथ भाषेच्या दृष्टीने महत्त्वाचा पुरावा ठरतात. त्यांचे नंतरच्या काळात सांकेतिक लिपीत लेखन झाल्याने बाहेरचा माणूस त्यात बदल करु शकत नाही. त्यामुळे समकालीन भाषेचे यथार्थ स्वरुप जाणण्याचे हे ग्रंथ अत्युत्तम साधन ठरतात. त्यातील गद्याची भाषा एकरुप आहे तिचा साधेपणा, तिच्यातील छोटी छोटी वाक्ये, वैविध्यपूर्ण वाक्प्रचार आणि म्हणी सुभाषित वजा वाक्ये, मार्मिक विधाने, सुंदर दृष्टांत रेखीव वर्णने या गुणांमुळे ती चटकन मनाच वेध घेते. त्यामुळे हे गद्य ग्रंथ आदिकालापुरतेच नव्हे तर पुढच्या सर्व कालखंडासाठी अजोड ठरलेले आहेत. नमुन्यादाखल पुढील वेचा पहा :

``कल्हणी एकि अहार देशाची म्हातारी असे ने लेकुरवाचेनि दुखे महाराष्टरास ये: ब्राह्मणा एकाचीए वोसरीए राहे: भीक्षा मागे: पुराण आइके: मागिला लेंकरु वाचेनि दुखें तयाचेया लेकुरवांसि वोसरीए टेको नेदी: तयांची वास न पाहे: ऐसें असत असतां तया लेंकरुवांची माए सरली: मग तो ब्राम्हणु म्हणे: `आइ: मी जोडेन: तुं उकडौनि घाली:` `हो का: काई वडपींपळ लावीजेति ना:` ऐसें म्हणौनि करी: ऐसें असत असतां तोही सरे: मग तीएं तीएसीचि पोसावीं लागली: कांडा:दळा: तया करांडा करौनि तयाते पोसी: ऐसें असत असतां ती एंही सरजी: मग तीएचेया दुखासिं काही पारावारु नाहीं:
(दृष्टान्नपाठ: आहीर देशीचीए म्हातारीएचा दृष्टान्न, क्रमांक ९१)``

या काळात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी यांसारखे महत्त्वाचे काव्यपूर्ण तात्त्विक ग्रंथ निर्माण झाले. ज्ञानदेव, नामदेव, इ.चे अभंग निर्माण झाले. चौपद्या, धवळे हे महानुभावांचे ग्रंथ वगळता बाकीचे बहुतेक पद्य ग्रंथ ओवी आणि अभंग या खास मराठी छंदांत रचले गेले आहेत. मोठे प्रकरण ग्रंथ ओवीत लिहिले गेले तर अभंग हा स्फुट रचनांसाठी वापरण्यात आला. हे सर्वंच काव्य उत्कृष्ट दर्जाचे असले तरी भाषाभ्यासाच्या दृष्टीने कमी विश्वासार्ह आहेत. याचे कारण उत्तर कालात या वाङ्मयाच्या अनेक प्रती झाल्या. त्यावेळी त्यांमध्ये भरपूर प्रमाणात परिवर्तन झाले आहे. अभंगाची भाषा पुढे इतकी रुढ झाली की आधुनिक काळातील केशवसुत गोविंदग्रज,बा.भ.बोरकर, इ.कवींनी सुद्धा त्याच प्रकारच्या भाषेत अभंगरचना केल्या. त्यामुळे जवळजवळ सातशे वर्षे बहुतेक सर्व अभंग एकाच स्थिर भाषेत लिहिल्यासारखे वाटतात म्हणजे अभगांच्या भाषेत काही बदलच झालेला नाही. त्यामुळे त्यांच्यी भाषा शिलास्थिरुप झाल्यासारखी वाटते. ज्ञानेश्वर एकनाथांचे प्रकरणग्रंथ अनेकांनी हाताळल्यामुळे त्यांच्यावरही आधुनिकीकरणाचे संस्कार झालेले आहेत. थोडक्यात सांगायचे म्हटले तर सर्व वाङमयच ते पद्बद्ध असल्याने शिलास्थिरुप भाषेतच लिहिले गेले आहे. म्हणून भाषाभ्यासाच्या दृष्टीनेच लिहिले गेंले आहे. म्हणून भाषाभ्यासाच्या दृष्टीने त्याचा फारसा विचार करता येत नाही. शब्दसंग्रहाच्या दृष्टीने मात्र ते महत्त्वाचे आहे.

एक गोष्ट मात्र नोंदवली पाहिजे की आदिकालातील सर्व वाड्रमयाचा एकत्रित विचार केल्यास असे दिसते की त्या भाषेवर फारसी भाषेचा अजिबात प्रभाव नाही. आदिकालातील भाषेवर कन्नडचा प्रभाव मात्र भरपूर दिसतो. राष्ट्रकूटांच्या काळापासून महाराष्ट्र कन्नड भाषेच्या प्रभावात आला. नंतरची दोन्ही चालुक्य घटाणी कन्नड भाषकच होती. फक्त यादववंशी राजे मात्र मराठी होते. त्यामुळे आद्य मराठीवर कन्नडचा विशेष प्रभाव दिसून येतो. ज्ञानेश्वरीच्या भाषेवर तो विशेष दिसून येतो.

मध्ययुग

मध्ययुगातील भाषेवर फारसीचा फार मोठा प्रभाव दिसून येतो संतवाङ्मय त्या प्रभावापासून मुक्त राहिले आहे. पण सर्व गद्यवाङ्मय त्या प्रभावाखाली होते. विशेषत: राजकीय पत्रव्यवहाराच्या भाषेवर फारसीने जोरदार आक्रमण केले होते. शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वीच्या राजकीय पत्रव्यवहाराच्या आधारे कै. वि.का.राजवाडे यांनी त्या काळातील मरणासन्न मराठीचे स्वरुप स्पष्ट केले आहे. शिवकालामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रयत्नाने मराठीची फारसीच्या विळख्यातून बरीचशी सुटका झाल्याचे दिसते.

आदिकालात कोरीव लेख आणि महानुभावीय चरित्र वाङमय गद्यात लिहिलेले होते. मध्यकालात मात्र राजकीय पत्रव्यवहार बखरी, आत्मचरित्रे इत्यादी वाङ्मय गद्यात लिहिले होते. नमुन्यादाखल बखरीतील एक आज्ञा पत्रातील एक असे दोन उतारे पुढे दिले आहेत.

``तो मारेकरी लष्करात पोहचले तों च्यार घटका दिवस आला. पागेचे डेरियापुढे स्नानास जयाजी सिंदे गेले. तों नजीक घोड्याची पागा होती. मारेकरी केवल कंगाल, भिकारियाचा वेष घेऊन आंगावर जीर्ण वस्त्रे व गुप्त सुऱ्या असे घोडियापुढे दाणे वेचीत होते. तो जयाजी सिंदे यांनी स्नान करुन चौरंगावर उभे राहिले खिसमतगार हांडाबासन सांभालावयास गुंतले. अबदागिऱ्या मात्र डोईवर छाव धरुन उभा होता. जयाजी सिंदे यास संवय आसी होती कीं स्नानांनंतर मुखावर धोतर घेऊन, क्षणभर डोळे चोळीत राहावें तों जसा राजा नलाचे द्वारीं कली वृषभरुप धरुन तिष्ठत होता. तैसेच मारेकरी जपून होते. इतक्यात संधि सांपडतांच मारेकरी यांणी उठोन येकायेकीच दोन्हीकडून कुशीस सुऱ्यांचा मार केला. काम करेगार होतांच जयाजी सिंदे चौरंगावरुन खाले जमिनीस आले. (भाऊसाहेबांची बखर-छेदक १८)

२. संपूर्ण राज्याचे सार तें दुर्ग दुर्ग नसतां मोकळा देश, परचक्र येतांच निराश्रय प्रजा भग्न होऊन देश उध्वंस होतो. देश उध्वंस झाल्यावर राज्य असें कोणास म्हणावे? याकरिता पूर्वी जे जे राजे झाले त्यांणी आधी देशामध्ये दुर्गे बांधून तो तो देश शाश्वत करुन घेतला आणि आलें परचक्रसंकट दुर्गाश्रयींपरिहार केलें हें राज्य तर तीर्थरुप थारले कैलासवासी स्वामींनी गडावरुनच निर्माण केले.जो जो देश स्वशासन वश न होय त्या देशीं स्थळविशेष पाहून गड बांधिले, तसेच जलदुर्ग बांधिले त्यावरुन आक्रम करीत करीत सोलेरी अहिवंतापासून कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले.
(आज्ञापत्र प्रकरण: ८)

या काळातील महत्त्वाचे वाङ्मय म्हणजे संतवाङ्मय बखर वाङ्मय आणि शाहिरी वाङय्म होते. राजकाय पत्रव्यवहारही ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा होता. या काळातील एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संतांचे आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य महत्त्वाचे आहे.

अर्वाचीन काल

इंग्रजी राजवटीपासून अर्वाचीन कालखंडाला सुरुवात होते. या काळात भारतात छापखाने आले. त्यामुळे वर्तमानपत्रे, नियतकालिके, पाठ्यपुस्तके व इतर ग्रंथांचे मुद्रण होऊ लागले. त्याचबरोबर शासकीय स्तरावर सार्वजनिक शिक्षण देण्यात येऊ लागले. शाळा कॉलेजे निघाली. त्यामुळे लिखित भाषेच्या एकात्मतेतून प्रमाण भाषा आस्तित्वात आली. तिच्या लेखनाची एक शिस्त मेजर कँडीसारख्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून अस्तित्वात आली. लेखनात विराम चिन्हांचे बारकावे आले. विद्यापीठांच्या स्थापनेमुळे सर्व देशभर पाश्चात्य विद्यांच्या अभ्यासास सुरुवात झाली. नवे दृष्टिकोण, नवे विचार यांचा प्रचार झाला. त्याचबरोबर देशभक्ती, राष्ट्रीयत्वाची जाणीव, स्वातंत्रपीती या मूल्यांचाही प्रचार झाला. संबध देशभर एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. अनेक विचारवंत स्वमतप्रचारार्थ लेखनाच्या क्षेत्रात उतरले. साहजिकच मराठी भाषेनेही आपली मध्ययुगीन कात टाकून दिली. तिला नवीन ज्ञानाची झळाली आली. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकहिवादी म.फुले, लो. टिळक, आगरकर यांच्या शैलीदार लेखनातून तिचे स्वरुप पालटले. कथा, कादंबरी नाटक, काव्य इ. नवे नवे वाङ्मयप्रकार अस्तित्वात आले.

आतापर्यंमत मराठी फारसीच्या प्रभावाखाली वावरत होती. या नव्या राजवटीत फारसीचे स्थान इंग्रजीने घेतले. इंग्रजी पाश गळ्याभोवती आवळला जातोय याची जाणीव विचारवंतांना होऊ लागली. त्यातून मराठी भाषा मरणपंथाला लागली असे भीषण चित्र राजवाडे, सावरकर इ. विद्वानांनी रंगवायला सुरुवात केली. त्यातून भाषाशुद्धीची चळवळ सुरु झाली. तिचा परिणाम म्हणून म्हणा किंवा सुशिक्षितांना आलेल्या भानामुळे म्हणा, मराठीवरचे ते संकट टळले आहे. असे दिसते. पण कॉम्प्युटर, मोबाईल, टेलीव्हिजन इ. प्रसार माध्यमे तिला परत इंग्रजीकडे खेचत राहिली आहेत. पण याही संकटातून ती सहिसलामत पार पडेल आणि पुन्हा नव्या तेजाने तळपू लागेल अशी अशा आजवरच्या तिच्या बिकट परिस्थितीतून वाट काढण्याच्या स्वभावधर्मानुसार आपण करायला हरकत नाही.

No comments:

Post a Comment