Tuesday, February 28, 2012

पाऊल पडते पुढे

वर्धा जिल्‍ह्यातील समुद्रपूर तालुक्‍यातील २४९ लोकसंख्‍या असलेले खैरगाव. आपापले नित्य व्यवहार पार पाडण्यापलिकडे येथे फारसे काही घडत नव्हते. परंतु बचतगटाची चळवळ सुरू झाली आणि या गावाची पावलेही पुढे पडायला लागली. 

या गावात महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍या मार्गदर्शनाखाली सुजाता स्‍वयंसहाय्यता महिला बचतगटाची स्‍थापना करण्‍यात आली. गटाच्‍या संघटिका म्‍हणून श्रीमती शोभा झिबलजी गायधने यांची निवड करण्यात आली. शोभा अशिक्षित असल्‍या तरी त्यांच्याकडे जिद्द आणि चिकाटी होती. त्यामुळे त्यांनी रात्रीच्‍या शाळेत जाऊन शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. घरातील कामे, शेतीची कामे, गटाची कामे करुन शोभाताईंनी ४५ व्‍या वर्षी चौथीची परीक्षा पास केली. इच्छा असेल तर शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते हे त्‍यांनी समाजाला दाखवून दिले. 
शोभाताईंनी गटातून कर्ज घेऊन स्‍वतःच्‍या १२ एकर शेतीमध्‍ये सेंद्रीय शेतीचा प्रयोग केला. त्‍यासाठी त्‍यांनी स्‍वतः व गटातील महिलांनी शेतीशाळेत प्रशिक्षण घेतले. सेंद्रीय शेतीमुळे किटकनाशके, रासायनिक खते इत्‍यादीचा खर्च वाचला. शोभाताईंनी स्‍वतः गांडूळ खत, जिवामृत तयार करुन शेतीमध्‍ये त्‍याचा वापर केला. शेतीमधून निघालेल्‍या उत्‍पादनातून त्‍यांनी कृषी प्रदर्शनामध्‍ये विषमुक्‍त अंबाडी शरबत तसेच झुणका भाकरचा स्‍टॉल लावून सक्रीय सहभाग घेतला.

गटातील महिलांच्‍या सहकार्याने व स्‍वतः पुढाकार घेऊन त्यांनी गावातील तलावावर बंधारा बांधला. गटाचा वाढदिवस, सावित्रीबाई फुले जयंती, महिला मेळावे इत्‍यादी विविध कार्यक्रम गावामध्‍ये पुढाकार घेऊन साजरे केले जाऊ लागले. सुजाता स्‍वयंसहाय्यता बचतगटाच्‍या नावाने शेतकरी वाचनालय स्‍थापन करण्यात आले. आता गावातील शेतकरी देखील येथे जाऊन वाचन करतात. शोभाताईंनी शासनाच्या शेततळे, गोबरगॅस, वृक्षारोपण आदी योजनांचा लाभ घेतला आहे. 
गटामध्‍ये सहभागी झाल्‍यामुळे माझा आत्‍मविश्‍वास वाढला. मी जे काही करते आहे ते गटाकडून मिळत असलेल्‍या बळामुळे. गटातील सर्व सभासद सुखी समाधानी जीवन जगावेत यासाठी भविष्‍यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगला व्‍यवसाय उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. गटाच्‍या सभासदांना प्रशिक्षण देऊन आणि त्यांच्या साथीने हे स्वप्नही साकार होईल आणि आणखी एक पाऊल नक्कीच पुढे पडेल, असे त्या विश्वासाने सांगतात. 

No comments:

Post a Comment