Wednesday, February 1, 2012

गुरूमंत्र सुरक्षेचा


क्रेडिट कार्डचे क्रमांक चोरीला जाणे, काही हॅकर्सनी महत्त्वाच्या वेबसाइट्स हॅक करून बंद पाडणे, डिजिटल माहिती चोरणे, बँकांतील डिपॉझिटची ऑनलाइन चोरी होणे, ई-मेलद्वारे व्हायरस पसरवणे अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. एखादी व्यक्ती आपल्या प्रणालीमध्ये घुसून त्यातील महत्त्वाची माहिती, फाइल्स उडवू शकते. डिजिटल विश्वामध्ये वावरणाऱ्‍या मोठमोठ्या संस्थांसमोर ही समस्या नेहमीच असते या समस्येला सामोरे जाताना घ्यावयाची काळजी आणि खबरदारी याचा गुरूमंत्र सोमवारी सर्वांनी घेतला अन् मनाशी खूणगाठ बांधली पासवर्ड शेअर न करण्याची.

संगणक आणि इंटरनेट हे आजच्या आधुनिक आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत आणि त्यांच्यासोबतच बग, व्हायरस, मालवेअर, स्पायवेअर हेदेखील आपल्या आयुष्याचाच एक भाग बनले आहेत. या नव्या शत्रुचा सामना करण्यासाठी आय टी सिक्युरिटी’ खूप महत्वाची आहे. हे लक्षात घेवून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व माहिती तंत्रज्ञान संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आय टी सिक्युरिटी आणि ऑडीट या विषयावर प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी आणि माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते या सत्राचे उद्घाटन झाले.

यावेळी माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सातत्याने बदल होत असतात. या बदलांना सामोरे जाताना सुरक्षिततेची बाब ध्यानात घेतली पाहिजे. तसेच ही खबरदारी घेवूनच तंत्रज्ञानाचा वापर करून आपले काम अधिक प्रभावी करावे, असे सांगितले.

सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आनंद देशपांडे या सत्राचे मार्गदर्शक होते. . त्यांचा सायबर सिक्युरिटी या क्षेत्रातील अभ्यास प्रचंड आहे. या दिवसभराच्या सत्रात त्यांनी अनेक उदाहरणे देत आय टी सिक्युरिटीचे महत्त्व विषद केले.

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याचे काम सायबर सिक्युरिटीमार्फत केले जाते. म्हणजे सायबर हल्ल्यांचा शोध घेऊन, त्यांचे विश्लेषण करून आणि त्यांना ब्लॉक करून माहिती सुरक्षित ठेवणे. सायबर सिक्युरिटी ही केवळ खासगी संस्थांनाच भेडसावणारी समस्या नाही. सरकारच्याही अनेक वेबसाइटवर हॅकर्सचे हल्ले होण्याच्या घटना अनेकदा घडतात.

आपण जेव्हा एखादा ई-मेल उघडतो तेव्हा त्याच्यातील मालवेअर आपल्या संगणकामध्ये घुसून त्याची प्रणाली नादुरुस्त करू शकते. एखादे स्पायवेअर आपल्या नकळत आपल्या संगणकातील माहिती इंटरनेटद्वारे दुसऱ्‍या संगणकाला पाठवू शकते. अशा माहितीमध्ये आपल्या विविध वेबसाइटवरील युजरनेम, पासवर्ड अशा संवेदनशील आणि महत्त्वाच्या माहितीचा समावेश असू शकतो. ही माहिती वापरून हॅकर आपले अकाउंट हॅक करू शकतो आणि त्याचा दुरुपयोगदेखील करू शकतो. एखाद्या संस्थेच्या नेटवर्कमध्ये अशा मालवेअर किंवा स्पायवेअरनी शिरकाव केल्यास त्याचा संस्थेच्या कामकाजावर, प्रतिष्ठेवर, विश्वासार्हतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. या सगळ्या परिणामांची माहिती व त्यापासून बचाव कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती या प्रशिक्षणामुळे मिळाली. संगणक युगात असे प्रशिक्षण हा एक अनमोल ठेवाच मिळाला, असे म्हटल्यास वावगे नाही.

श्री. देशपांडे यांनी सायबर लॉ, इथिकल हॅकिंग, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी या विविध संकल्पनांची ओळख करून दिली व घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती दिली. इंटरनेट आणि इतर नेटवर्कवरून केल्या जाणाऱ्या व्यवहारांशी निगडित कायद्यांची माहिती दिली. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी या विषयाबाबत मार्गदर्शन करताना संगणक आणि सर्व्हरमधील महत्त्वाची माहिती चोरी होण्यापासून रोखण्यासाठी काय काय काळजी घ्यावी याची ही माहिती दिली. तसेच ही माहिती नष्ट होण्यापासून सांभाळण्याचे प्रशिक्षणही दिले .

संगणकाचे सर्व भाग, त्याची सर्व प्रणाली सुरक्षित ठेवणे, त्यातील माहितीचे अनधिकृत प्रकाशन रोखणे, ती माहिती अनधिकृत व्यक्तींच्या हाती लागू न देणे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये माहिती सुरक्षित ठेवणे आदी बाबींची माहिती या निमित्ताने सर्वाना झाली. आजवर आपण याबाबत किती बेफिकीर होतो याची सर्वांना जाणीव झाली. या सर्व बाबींची सुरक्षितता राखण्याबरोबरच आपला पासवर्ड शेअर न करण्याची प्रत्येकाने मनाशी खूणगाठ पक्की केली.

No comments:

Post a Comment