Wednesday, February 1, 2012

बचतगटामुळे शैक्षणिक समृध्दीचे स्वप्न...!


बचतीचे महत्त्व लक्षात आल्यामुळे रहिवाशांच्या विशेषत: ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्यास सुरूवात झाली. ज्यांना बचतगट म्हणजे काय किंवा त्याचा नेमका फायदा काय याबद्दल काहीही माहिती नव्हती अशा महिला देखील आज यशाची पायरी चढू लागल्या आहेत.

वर्धा ‍जिल्ह्यातील गवंडी गावात असाच एक स्वयंसहाय्यता महिला बचत गट निर्माण झाला. ज्यामधील महिलांना बचत गटाची संकल्पना लक्षात आल्याने आणि त्यांना गटाचे महत्व पटल्याने आज हा गट देखील यशाची पायरी चढत आहे.

गवंडी गावातील महिलांनी बचतीचे महत्त्व लक्षात आल्यानंतर १ जुलै २००४ रोजी जय दुर्गा माता महिला बचत गटाची स्थापना केली. या गटाच्या स्थापने आधी गावामध्ये केवळ एकच बचत गट स्थापन झाला होता. जय दुर्गा माता बचत गटामध्ये प्रथम ८ दारिद्र्य रेषेखालील महिलांना स्थान देण्यात आले. त्यानंतर ५ दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच ए.पी.एल. महिलांचाही समावेश करण्यात आला. गट स्थापन झाल्यानंतर गटाचे खाते भारतीय स्टेट बँक, कारंजा येथे उघडण्यात आले. या बचत गटाबद्दल अध्यक्षा योगिता ताराचंद ढोले अभिमानाने माहिती देतात.

गटाच्या व्यवस्थित व सुरळीत कारभारासाठी एक नियमावली बनवण्यात आली. ज्यात मासिक सभा, उपस्थिती, दंड, रेकॉर्ड भरणे आदी नियमांचा समावेश करण्यात आला. काही दिवसांतच बचत गटाचे व्यवहार सुरळीत सुरु झाले. पहिल्या सहा महिन्यातच बचत गटाचे पहिले ग्रेडेशन (मूल्यमापन) झाले. महिलांनी ५० रूपये मासिक बचत भरण्याचे ठरविले ज्यामधून महिलांची आर्थिक बचत होऊ लागली.

बँकेने उचल कर्ज म्हणून गटाला २५ हजार रूपये कर्ज दिले. महिलांनी एक बैठक घेऊन या रकमेतून काय व्यवसाय सुरु करता येईल याबाबत विचार विनिमय केला. त्यानंतर मंडप डेकोरेशन हा व्यवसाय करण्याचे सर्वानुमते ठरवून त्यावर अंमलबजावणी करण्याचे ठरले.

व्यवसाय सुरळीतपणे चालायला सुरुवात झाल्यानंतर बचत गटाने मिळालेल्या कर्जाची रक्कम थोडी-थोडी परत करण्यास सुरुवात केली. पूर्ण कर्ज व्याजासहित परतफेड केल्यानंतर महिलांचा उत्साह अधिकच वाढला. या यशानंतर दारिद्र्य काही दिवसांतच आणखी दोन बचत गट स्थापन झाले. सर्वांनी मंडप डेकोरेशन या व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव बँकेत सादर केला व कर्जाचे प्रकरण मंजूर झाले. बचत गटाला १,३०,००० रू. कर्ज म्हणून मिळाले. त्यासोबत ७०,००० रूपयांचे अनुदान असे या कर्जाचे स्वरुप होते.

गटाला कर्जाचा पहिला टप्पा म्हणून एक लाख रुपये तर दुसरा टप्पा म्हणून ३० हजार रूपये मिळाले. त्यातून गटाच्या नावाचे बॅनर, व्यवसायासाठी लागणाऱ्या काही गोष्टी बचत गटातील महिलांनी आपल्या मेहनतीने व कल्पनेने तयार केल्या. गटातील काही महिला अशिक्षित व काही अल्पशिक्षित असूनही त्या आपल्या जबाबदाऱ्या समजून व्यवस्थित हाताळताना दिसतात, हे या गटाचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल.

गावात व्यवसायाच्या प्रचार व प्रसारासाठी महिलांनी कंबर कसली व अडचणींवर मात करुन महिला गावकऱ्यांना मार्गदर्शन करु लागल्या. आता त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पुरुषांनीही महिलांना मदत करण्यासाठी बऱ्याच योजनांमध्ये सहभाग घेतला असल्याने त्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. बचत गटातील महिलांनी कर्जाचे ५९,००० रूपये परतफेड केले आहेत. उर्वरित रक्कम लवकरात लवकर परत करून स्वावलंबी होण्यासाठी महिला प्रयत्नशील आहेत. या कामी बचतगटाचे प्रेरक आणि संघटक यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे.

बचत गटातील महिलांच्या अंगी आत्मविश्वास, चिकाटी व जबाबदारी हे गुण दिसू लागले आहेत. आत्मविश्वासाच्या जोरावर अल्पशिक्षित महिला देखील आपल्या मुला-मुलींना सी.ए., एम.बी.ए., डॉक्टर, इंजिनियर, वकील बनविण्याचे धाडस करु पाहत आहे.

No comments:

Post a Comment