Wednesday, February 15, 2012

नो....नाय...नेव्हर, डू नॉट शेअर !

सध्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे. त्यातीलच एक महत्त्वाची बाब म्हणून मुख्यालयातील संशोधन अधिकारी आणि माहिती व तंत्रज्ञान कक्षाची धुरा सांभाळणाऱ्या मयुरा देशपांडे - पाटोदकर मॅडम यांनी माहिती व तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल, महासंचालक प्रमोद नलावडे आणि संचालक प्रल्हाद जाधव यांच्याशी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने चर्चा करुन काही दिवसांपूर्वीच सर्व उपसंचालक आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांसाठी एक विशेष प्रशिक्षण आयोजित केले होते. 

प्रशिक्षणाचा विषय होता, आयटी ऑडिट अँन्ड सिक्युरिटी. प्रशिक्षणाबद्दल ऐकलं आणि मनातल्या मनात म्हटलं .... मेरा नंबर कब आऐगा? कारणं दोन होती, एक मी महान्यूज शाखेत काम करतो म्हणजे हा विषय नीट समजून घेणं मस्टचं आणि दुसरं कारण म्हणजे या विषयाबद्दलची असलेली आवड. नेटवरुन, पुस्तकांतून, मित्रांकडून माहिती मिळणं वेगळं आणि या विषयात प्रावीण्य मिळविलेल्या आनंद देशपांडेंसारख्या वक्त्याकडून एकमेकांशी इंटरॅक्ट होत विषय समजून घेणं वेगळं. म्हणूनच माझ्यासाठी १३ फेब्रुवारी हा दिवस खरं तर १४ फेब्रुवारी इतकाच स्पेशल होता. 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील माहिती अधिकाऱ्यांचे हे प्रशिक्षण सुरु होण्यापूर्वी सर्वांसाठी नेहमीप्रमाणं नाष्टा अन् चहाची व्यवस्था होतीच. चहा नाष्टा झाल्यावर सर्वजण परिषद सभागृहात स्थानापन्न झाले. आणि थोड्याच वेळात इंटलिजंट कोशन सिस्टम प्रा.लिमिटेड चे संचालक आनंद देशपांडे यांचं आगमन झालं. संचालक प्रल्हाद जाधव सरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. ज्यांचं स्वागत करण्यात येत होतं त्यांच्याकडे पाहिलं आणि पुढचा विचार सुरु होण्यापूर्वीच सहायक संचालक मनिषा पिंगळेंनी त्यांचा परिचय करून दिला. परिचय ऐकल्यावर आपण ज्या या छोट्याशा मुर्तीकडे पाहतोय ती व्यक्ती ज्ञानाने किती उंच आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि थोडंसं सावरुन बसलो. 

उंची ५ फूट ४ इंच, गोरा वर्ण, वयही तसं कमीच, अत्यंत हसतमुख चेहरा पाहून खात्री पटली की, आजचा दिवस नक्कीच सार्थकी लागणार. सेशन वन... स्टार्टेड विथ हिज क्यूट स्माईल... माहितीची गोपनीयता म्हणजेच कॉन्फडेंशिअलिटी, इंटिग्रिटी, वाय –फाय तंत्रज्ञान, की लॉगर, पासवर्ड इत्यादी शब्दांबद्दलची इत्यंभूत माहिती या आयटी सिक्युरिटी तज्ञाच्या मुखातून बाहेर पडू लागली. हे सांगत असताना डेटा आणि इन्फर्मेशन यातला फरक, पासवर्ड शेअर करण्यातला धोका, संगणकाचा, इंटरनेटचा वापर करताना आपण कसा निष्काळजीपणा करतो याची जाणीव देशपांडे सरांनी अगदी खुसखुशीतपणे कधी चेन्नई का रॉबिनहूड ची कथा तर कधी पुण्यातल्या पॅन कार्डच्या फ्रॉडची कथा सांगून करुन दिली. ही माहिती ऐकून थोडा वेळ सगळे प्रशिक्षणार्थी स्तब्धचं राहिले. 

अगदी सहज म्हणून आपण इंटरनेटसंबंधी कसे वागतो अन् तितक्याच सहजपणे काय होऊ शकते हे ऐकल्यावर जरा टेन्शनच आलं. पहिलं सेशन संपता संपताच दीड-पावणेदोन वाजत आले. प्रशिक्षणार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. मग काय मयुरा मॅडमचा सिग्नल…आय मीन… सूचना मिळाल्यावर निघाले सगळे समिती कक्षाकडे. अर्ध्या-पाऊण तासातच जेवण आटोपून सर्वजण पुन्हा परिषद सभागृहात जमले. 

पहिलं सेशन सुरु होण्यापूर्वी सगळेच जण अगदी तरतरीत होते. पण दुसऱ्या सेशन बाबत देशपांडे सर काहीसे साशंक होते. बहुधा त्यांचा अनुभव त्यांना तसा विचार करायला भाग पाडत होता. म्हणूनच दुसरे सेशन सुरु होण्यापूर्वीचं त्यांनी हसतमुखाने प्रेमळ सूचनावजा विनंती केली. ती विनंती होती अर्थातच... पहिल्या सेशनमध्ये जी तरतरी, उत्साह सर्वांमध्ये होता तो या सेशनमध्येही कायम राहावा यासाठी. 

मग काय झाली दुसऱ्या सेशनला सुरुवात .... आपण इंटरनेटच्या महाजालात कसे फसतो, व्हायरस, ट्रोजन, वर्मस् काय काय करु शकतात, फिशिंग म्हणजे काय, स्टेग्नोग्राफी, स्पूफिंग म्हणजे काय ? असे एकूणच सायबर क्राईम बद्दलचे हे सेशन चांगलेच प्रभावी ठरले. इतके की, जेवणातील गोड शिरा खाऊनसुद्धा या सेशनमध्ये कुणीचं पेंगलं नाही. कारण सायबर क्राईमबद्दलची ही माहिती सगळ्यांचीच झोप उडविणारी ठरली. 

झोप उडाली असली तरी साधारणत: चहाची वेळही झाली होतीचं. चहा अगदी योग्य वेळेवर आला. एकीकडे चहा आणि दुसरीकडे तिसऱ्या सेशनची सुरुवात.... सायबर लॉ विषयीची माहिती . आनंद देशपांडे सरांनी सायबर लॉ विषयात प्रावीण्य मिळविले असल्याकारणाने अगदी त्याच वकिली थाटात त्यांनी एक एक कलम व्यवस्थितपणे आम्हाला समजावून सांगितले. अगदी रिस्क, आयडेन्टीफिकेशन, ऑडिट, पॉलिसी, आयटी सिक्युरिटी, डिजिटल सिग्नेचर, बॅक अप याचबरोबर सायबर सिक्युरिटी अँक्ट २००० आणि अधिक सुधारणा करुन पुन्हा तयार करण्यात आलेला आयटी अँक्ट २००८, सिव्हील ऑफेन्स, क्रिमीनल ऑफेन्स अशा विविध संज्ञा आणि त्यांची निकड, त्यांचे बारकावे याविषयीचे हे सेशनही जबरदस्त माहिती देणारे ठरले. 

या कार्यशाळेचं वैशिष्ट्यं म्हणजे IT WAS TOTALLY A LIVE AND INTERACTIVE WORKSHOP. सध्याच्या संगणक युगातल्या दैनंदिन जीवनात सोशल कनेक्टिव्हीटी, सोशल कम्युनिटीच्या नावाखाली घडणाऱ्या सायबर क्राइमशी संबंधित घटना, अनुभव शेअर करताना आयटी सिक्युरिटीमधील देश विदेश पातळीवरील अनुभव असणाऱ्या आनंद देशपांडे सरांचा मोलाचा सल्ला मात्र आम्हा सर्वांनाच शहाणं करुन गेला, तो म्हणजे नो...नाय...नेव्हर, डू नॉट शेअर !

मनोज सानप 

No comments:

Post a Comment