Wednesday, February 22, 2012

करू या कुपोषणावर मात

अलिकडेच आपल्या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कुपोषणाविषयी जी चिंता व्यक्त केली ती सर्व भारतीयांना विचार करायला लावणारी आहे.कुपोषण निर्मूलनासाठी शासनाबरोबरच जनतेचा सहभागही अत्यंत महत्वाचा आहे.

कुपोषण कशामुळे होते व निर्मुलन कसे केले जात आहे,हे लोकप्रबोधनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.ज्यांना कुपोषण निर्मितीची व निर्मूलनाचे उपाय समजले त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना, कुटुंबांना सांगावे हाच या लेखाचा उद्देश आहे.

कुपोषणाची कारणे : 
कमी वयात मुलींचे लग्न होणे, गर्भधारणा झाल्यानंतर त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क न साधणे, मातेच्या प्रसुतीपूर्वी व प्रसुती पश्चात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे, जन्माला येणारे मूल अशक्त व कमी वजनाचे असणे, वारंवार होणारे बाळंतपण, मूल जन्मत: एक तासाच्या आत स्तनपान न करणे, स्तनपान न देणे किंवा अपुरे देणे, बाळाला सहा महिने झाल्यानंतर पुरक आहार न देणे अथवा खूप उशिरा देणे, आहार विषयक व मुलांच्या पोषणाविषयी माहिती नसणे, कुटुंबात अपुरा व कमी प्रतिचा आहार असणे, अस्वच्छता, गैरसमजूती उदा.अंधश्रद्धा, बुवा किंवा वैद्यांकडून उपचार करण्यावर विश्वास, संसर्गजन्य आजार उदा. अतिसार, गोवर इ. आजारामुळे बालकांचे वजन कमी होवून कुपोषणाच्या श्रेणीत जाणे, गरिबी, बेरोजगारी, साक्षरतेचा अभाव, अंगणवाडीतून मिळणाऱ्या पुरक पोषण आहाराव्यतिरिक्त लाभार्थ्यांना त्यांच्या घरातून आवश्यक पुरेसे अन्न न मिळणे आणि समाजाचा सहयोग नसणे इ.कारणांमुळे बालकांचे कुपोषण होते.

कुपोषण निर्मूलनासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरु आहेत. त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे :
६ महिने ते ६ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांना सुक्षपोषकत्व युक्त आहार (Take Home Ration) देण्यात येत असून ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना महिला बचत गट/महिला मंडळ यांच्यामार्फत सकाळचा नास्टा, गरम ताजा आहार पुरविला जात आहे. 

कुपोषित बालकांची दर पंधरवाड्याला नियमित आरोग्य तपासणी, वैद्यकीय उपचार, बालकांचे लसीकरण, स्तनपान व शिशु पोषणावर भर देण्याबाबत व समुदाय वृद्धीपत्रकाद्वारे पालकांमध्ये जाणीवजागृती निर्माण करणे यासाठी उपाय योजना पुढीलप्रमाणे केल्या जात आहेत.

• ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचे १०० टक्के सर्व्हेक्षण करण्यावर भर दिला जात आहे.
• तीव्र कमी वजनाच्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रामध्ये दाखल करुन त्यांना अतिरिक्त पोषण आहार व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविले जाते. जनजागृती करण्याकरिता अंगणवाडी स्तरावर दरमहा माता बैठकींचे आयोजन केले जाते.
• नवजात बालकाला अर्ध्या तासाचे आत स्तनपान देण्याकरीता जनजागृती केली जात आहे. 
• वयोगटानुसार लसीकरण करुन बालकांचे आजारापासून संरक्षण करणे.
• योग्य मात्रेनुसार जंतनाशक औषधीचे वाटप करणे.
• अंगणवाडीतील बालकांची दर तिमाही आरोग्य तपासणी करणे.
• तीव्र कमी वजनाच्या बालकांची तसेच वजनवाढ नसलेल्या बालकांची नियमित आरोग्य तपासणी करणे.
• बालरोग तज्ज्ञांमार्फत तीव्र कमी वजनाच्या बालकांची तपासणी करणे सुरु असून ग्राम बाल विकास केंद्र, बाल विकास केंद्र सुरु करण्यावरही भर देण्यात आलेले आहेत.
• तसेच उपरोक्त उपाययोजनांमुळे दिवसेंदिवस कुपोषणाचे प्रमाणे कमी होत आहे.

शासनाच्या प्रयत्नाबरोबरच समाजातील सर्व घटकांचे योगदान कुपोषण निर्मूलनाच्या कामी मिळाले तर या गंभीर समस्येचे पूर्णपणे निर्मूलन लवकरच शक्य होईल.

राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान शासनाने मागील वर्षी हाती घेतले आहे. त्यात जनतेचा व गावकऱ्यांचा सहभाग वाढावा म्हणून गावांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत. उद्देश हाच आहे की लोकांनीही या कामी पुढे यावे.

No comments:

Post a Comment