Wednesday, February 29, 2012

स्वप्न निर्मल जिल्हयाचे

शासनाची लोककल्याणकारी अभियाने आणि मोहिमा प्रभावीपणे राबविण्यात सातारा जिल्हा सदैव अग्रस्थानीच असतो. जिल्हयातील जनतेनं ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त अभियान, महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान, निर्मलग्राम अभियानात सर्वोत्कृष्ट काम करुन सातारा जिल्हयाचे कर्तृत्व राज्यातील जनतेला दाखवून दिले आहे. आज सातारा जिल्हयात निर्मल ग्रामसाठी १ हजार ४९६ गावांपैकी १ हजार ४३१ गावे निर्मल झाली असून केवळ ६५ गावे निर्मल व्हायची बाकी आहेत. नजीकच्या काळात ही ६५ गावे निर्मल करुन संपूर्ण सातारा जिल्हा निर्मल जिल्हा घडविण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाचे लोकशिक्षण आणि निर्मलग्रामचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. याकामी लोकप्रतिनिधीबरोबरच पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थही सक्रीय झाले आहेत.

संपूर्ण सातारा जिल्हा निर्मल जिल्हा घडविण्यासाठी ६५ गावे निर्मल व्हायची बाकी असल्याने जिल्ह्याचे निर्मलचे स्वप्न अपुरे राहिले आहे. तरीही निर्मलच्या बक्षिसापोटी जिल्ह्याला आजअखेर १४ कोटी ५६ लाख रुपये मिळाले असून, बक्षिसाच्या रकमेतून गावागावांत नवनवी विकासकामे राबविली जात आहेत. या भरीव बक्षिसामुळे गावांच्या सर्वांगीण विकास होण्यास मदत होत आहे. यापुढेही निर्मलग्राममध्ये भरीव काम करुन बक्षिसाची अधिकाधिक रक्कम मिळविण्याच्यादृष्टीने सर्वजण गतीने काम करीत आहेत. 

जिल्हयाच्या सर्वच गावात आता स्वच्छता अभियान आणि निर्मलग्रामचे सातत्य टिकविण्यासाठी गावागावात प्रबोधन आणि जनजागृतीचे काम प्रभावीपणे होत आहे. कोणीही उघडयावर शौचास बसणार नाही यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना आखल्या आहेत, घर तिथं शौचालय उपक्रम जिल्हयात प्रभावीपणे राबविला जात आहे. यासाठी गुडमॉर्निग पथके सातत्यपूर्वक कार्यरत ठेवण्यात आली आहेत, प्रसंगी गावाची स्वच्छता आणि शिस्त मोडणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. याबरोबरच वेयक्तिक शौचालय, ग्रामसभा, चित्ररथ, मशालफेरी, विविध स्तरावरील कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, गुडमॉर्निग पथके अशा विविध मार्गांनी निर्मलग्रामसाठी प्रबोधन आणि लोकशिक्षण केले जात आहे.

केंद्र शासनाने शंभर टक्के शौचालये असणाऱ्या गावांना २००४ मध्ये निर्मल ग्राम पुरस्कार देण्याचे धोरण जाहीर केले. निर्मलग्रामचा सातारा जिल्हयाचा इतिहास पाहता सन २००४-२००५ मध्ये पहिल्याच वर्षी जिल्ह्यातील सहा गावे निर्मल झाली. कोरेगाव तालुक्यातील धामणेर हे जिल्ह्यातील पहिले निर्मलग्राम ठरले. त्यानंतर निर्मलग्रामचा अश्वजिल्हाभर दौडू लागला. दुस-या वर्षी म्हणजे २००५-२००६ मध्ये १०९ ग्रामपंचायती निर्मलग्राम झाल्या. २००६-०७ मध्ये १८६ ग्रामपंचायती निर्मल झाल्या. २००७-०८ मध्ये ५०२ ग्रामपंचायती निर्मल झाल्या. २००८-०९ मध्ये ५२८ ग्रामपंचायती निर्मल झाल्या. २००९-२०१० मध्ये १०० ग्रामपंचायती निर्मल झाल्या. गेल्या ६ वर्षाची निर्मलग्रामची आकडेवारी पाहता फलटण, वाई, खंडाळा, जावळी, महाबळेश्वर हे पाच तालुके निर्मल तालुके बनले असून उर्वरित सहा तालुक्यातील केवळ ६५ गावे निर्मलग्राम व्हायची बाकी असून यासाठी जिल्हापरिषद प्रशासनाने आतापासून निर्मलग्रामची विशेष मोहिमच हाती घेतली आहे. विशेष म्हणजे निर्मलग्राममध्ये सातारा जिल्हयातील महाबळेश्वर हा तालुका राज्यातील पहिला निर्मल तालुका ठरला. सातारा जिल्हा निर्मलग्रामच्या उंबरठयावर असून ६५गावे लवकरच निर्मल करुन संपूर्ण सातारा जिल्हा निर्मलजिल्हा करण्याच्या संकल्पाने सर्वजण गतीन काम करीत आहेत.

  • एस. आर. माने
  • No comments:

    Post a Comment