Tuesday, February 7, 2012

आशेचे पाऊल

महान व्यक्तिमत्वांचा पदस्पर्श एखाद्या ठिकाणाला पावन करीत असतो. त्यांच्या स्पर्शाने कदाचित त्या भूमीतील कणाकणात चैतन्य जागृत होत असावे. म्हणूनच ही भूमी इतरांच्या कार्याची प्रेरणा ठरते. लोकमान्य टिळकांचे मूळगाव असलेल्या चिखलगाव येथे डॉ.राजा आणि रेणू दांडेकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात उभे केलेले कार्य बघून याचीच प्रचिती येते.

चिखलगावात प्रवेश करताच क्षणी डाव्या बाजूला उभ्या असलेल्या जांभ्या दगडातील इमारती आपलं लक्ष वेधून घेतात. शाळेची टुमदार इमारत, परिसरात विविध खेळात रममाण असलेले विद्यार्थी, बाजूलाच असलेल्या वसतीगृहातील इमारतीत विद्यार्थी अभ्यासमग्न झालेले... हे चित्र पाहिल्यावर या गावात तीसेक वर्षापूर्वी शाळा नव्हती हे मनाला पटत नाही. मात्र शिक्षणाविषयी असलेल्या अनास्थेच्या अंध:कारातून गावाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याची किमया एका तरुण डॉक्टराने साधली. या ज्ञान यज्ञात शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक पदाच्या नोकरीची समीधा अर्पण करून त्याच्या पत्नीने तेवढीच तोलामोलाची साथ दिली. आणि त्यातूनच पुण्यात नामांकित शिक्षणसंस्थांच्या पाया रचणा-यां लोकमान्य टिळकांच्या या मूळगावी त्यांच्याच प्रेरणेतून 'लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट' ही संस्था उभी राहिली.

...डॉ.दांडेकर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८२ मध्ये चिखलगावात आले. १२ गायी, एक तट्टू आणि कर्जाने घेतलेली बाईक सोबत ५०० रुपये हेच त्यांचे भांडवल. रस्त्याच्या बाजूला पाल टाकून त्यांनी आपल्या कार्याला सुरूवात केली. याचवेळी गावात गॅस्ट्रोची साथ आली. दिवसरात्र गावक-यांच्या सेवेत राहून डॉक्टरांनी आपल्या सेवाकार्याचा श्रीगणेशा केला. स्वत: वयाच्या सहाव्या वर्षी शिक्षणासाठी बाहेर पडलेले आणि २४ ठिकाणी शिक्षण घ्यावे लागले असल्याने इतरांच्या शिक्षणाबाबत त्यांच्या मनात नेहमी प्रश्नांचे कल्लोळ उभे रहात. उच्च शिक्षणासाठी वडिल केवळ २०० रुपये देऊ शकले. अत्यंत कष्टाने शिक्षण पूर्ण केले असल्याने गावात शिक्षणाची सोय व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. गावापासून ४० किलोमीटर पर्यंत शाळा नव्हती. म्हणून १९८४ मध्ये आपल्या गोठ्यातच ६ विद्यार्थी एकत्र करून त्यांनी शाळा सुरू केली. या इवल्याशा रोपाचा वेलू गगनाकडे झेपावतो आहे.

या कार्यात अनंत अडचणी होत्या. गावक-यांचा शिक्षणाला विरोध होता. त्यामुळे मुले पळवणारी बाई गावात आली आहे, मुलगी शाळेत गेली नाही तर नवस फेडीन अशा प्रतिक्रिया गावातून आल्या. मात्र

'तेजाळलेल्या रविबिंबाचे ,स्वप्न सोनेरी दिसावे
काजळ दगडी माळावरती, तृणपाते हलके झुलावे
जगावेगळ्या वाटेवरती, पाऊल आशेचे पडावे
पाषाणाच्या काळजातून पालव हसरे उमलत यावेll'

ही भावना मनाशी बाळगून ज्ञानदानाच्या कार्यावरची श्रद्धा जराही ढळू न देता या दाम्पत्याने आपले कार्य पुढे सुरूच ठेवले. गावक-यांना शिक्षणाचे महत्व उमगू लागले. शिक्षणापेक्षा या दाम्पत्याची गावाविषयीची ओढ आणि शिक्षणाविषयीची तळमळ त्यांच्या हृदयापर्यंत पोहचली. भावनेतील शुद्धतेचा किरण इतरांच्या मनातील काळोख दूर करून प्रेमाच्या प्रकाशाचं निर्मळ नातं निर्माण करतो, याचा प्रत्यय गावात आला. गावकऱ्यांची साथ मिळू लागली आणि गावालाच नव्हे संपूर्ण परिसराला अभिमान वाटावा असं कार्य उभं राहिलं...

...आज या शाळेत पहिली ते दहावीच्या शिक्षणाची सोय आहे. पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी इथे शिक्षण घेतात. शिक्षणाबरोबर स्वावलंबन आणि संस्काराचे धडे शाळेत दिले जात असल्याने इथले विद्यार्थी आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती मनात बाळगूनच बाहेर पडतात. केवळ पुस्तकी शिक्षण न देता भविष्यातील रोजगाराची संधी विद्यार्थ्याला ग्रामस्तरावरच प्राप्त व्हावी यासाठी 'डिप्लोमा इन बेसीक रुरल टेक्नोलॉजी' हा अभ्यासक्रम येथे चालविला जातो. त्या अंतर्गत इलेक्ट्रीक कामे, वेल्डींग, मोटर मॅकेनिक, शेती, आदी विविध व्यवसायांचे शिक्षण दिले जाते.

दहावीचा निकाल १९९१ मध्ये १० टक्के होता. हाच निकाल आता ९५ टक्क्यापर्यंत पोहचला आहे. शाळेत १५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मल्लखांबाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. क्रीडा, कला, नवे तंत्र आदी विविध क्षेत्रातील सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देताना त्यांच्या पालकांकडून अत्यल्प प्रवेश शुल्क घेतले जाते. वसतीगृहात विद्यार्थ्यांना मोफत भोजनाची सोय उपलब्ध करून दिली जाते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचे रेक्टरचे काम वरच्या वर्गातील विद्यार्थीच करतात. प्रसंगी पडेल ते काम करण्याची स्वावलंबी वृत्ती विद्यार्थ्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांना या शैक्षणिक परिसरात शिक्षणाबरोबरच जीवनाचे धडे दिले जातात. म्हणूनच त्यांच्यात निर्माण होणारा आत्मविश्वास त्यांना यशाच्या वाटेकडे नेणारा ठरतो. शिक्षणाबरोबरच परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कार्यही संस्थेमार्फत केले जाते. ग्रामीण विकासाच्या नव्या संकल्पना रुजविण्यात दांडेकर दांम्पत्याचा सतत पुढाकार असतो.

डॉ.दांडेकर यांच्याशी चर्चा करताना विद्यार्थ्यांच्या अनेक यशकथा ते कौतुकाने सांगत होते. त्यांच्या बोलण्यात अभिमान होता तेवढीच मायेची भावना होती. असं 'आईचं' प्रेम विद्यार्थ्यांना इथे मिळत असल्याने ही शाळा खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडविण्याची कार्यशाळा ठरली आहे. चिखलगावपासून तीन किलोमीटर अंतरावर असेलेल्या मळेगाव येथील दिनेश आडवीलकर यांने स्वत:चा वर्कशॉप सुरू केला असून त्याची वार्षिक उलाढाल ३५ लाखाची आहे. पोलिओग्रस्त असलेल्या कुंदा बसेकरचे शिक्षण तिच्या पालकांचा विरोध असतांना डॉक्टरांनी आग्रहाने करून घेतले. तिने पुढे वसतीगृहाची रेक्टर म्हणून काम पाहतांना शिवणकाम शिकले. तिला डॉक्टरांनी शिलाई मशीन घेऊन दिले. फॅशन डिझाईनींगच्या प्रशिक्षणासाठी दापोलीला स्वत:च्या घरी ठेवले. नंतर पालकत्वाची जबाबदारी पूर्ण करतांना तिचे लग्न लावून दिले. अशा अनेक यशकथा ऐकताना शिक्षणाची व्याख्याही मनात स्पष्ट होत होती.

शिक्षण आणि संस्काराचा हाच धागा इथल्या विद्यार्थ्यांशी दांडेकर दाम्पत्याचे जगावेगळे नाते निर्माण करणार आहे. गुरू, आई-बाबा, भाऊ-बहीण अशी सर्व नाती विद्यार्थ्यांना इथे अनुभवायला मिळतात. त्यामुळेच सांगलीचा विनोद सोळवंडे गावापासून दूर शिक्षण घेत असूनही त्याच्या चेह-याचा उत्साह पहिल्याच भेटीत जाणवतो. क्षमता असूनही शिक्षणाची संधी केवळ परिस्थितीमुळे न मिळालेली मुलं इथे शिक्षण घेण्यासाठी येतात. रेणूताईंच्या शब्दातच सांगायचं तर, प्रत्येक माणसातल्या चार वर्तुळापैकी चौथे वर्तुळ एका ठिणगीचं असतं. ती प्रज्वलित केली की त्याची प्रगती आपोआपच होते. अशी मनात ठिणगी घेऊन आलेली मुले ज्ञानाचं स्फुल्लिंग प्रज्वलित करून कर्मयोग्यांच्या या भूमीतून नवी प्रेरणा घेऊन बाहेर पडतात. त्यांच्यासोबत असतात डॉक्टर आणि रेणूताईंच्या शुभेच्छा आणि मनापासून दिलेले आशिर्वाद. त्याच्याच बळावर ही मुले जीवनात यशस्वी होतात. हे यश पदरात असतांनाही ती पुढे जात असताना सारखी मागे वळून पाहतात. या शाळेला, परिसराला विसरत नाही. कारण शाळेने त्यांच्या मनात रुजविलेले संस्काराचे बीज अंकुरित झालेले असते. शिक्षणातील हाच संस्कार उद्याची आशा आहे.

या ज्ञानयज्ञा विषयी बरेच जाणून घ्यावेसे वाटत होते. मात्र संध्याकाळ झाली होती. दाभोळच्या खाडीमार्गे गुहागर गाठायचे होते. डॉक्टरसाहेब उत्साहाने बोलतच होते. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सरबताची चवही निराळीच वाटली. डॉक्टरांच्या बोलण्यातील आत्मियता आणि सरबतातील गोडवा काहीच निराळा नव्हता. 'पोषक वातावरण मिळाल्यावर काजवे चमकतात. माझ्याकडे ही ५०० काजवे आहेत. ती चमकणारच.' बोलण्यात हा विश्वास यायला तेवढे श्रम आणि त्यागाची आवश्यकता असते. स्वत:चा पुरस्कार संस्थेच्या नावाने द्या, असे म्हणण्याइतपत नम्रता आणि संस्थेवरची श्रद्धा लागते. तेव्हाच शिक्षणाचा हा निर्मळ प्रवाह अधिक व्यापक होत वेगाने प्रवाहमान होतो, अनेकांना चिंब करतो आणि ज्ञानाच्या विस्तारलेल्या सागराची भेट घेत स्वत: ते व्यापकत्व प्राप्त करतो. लोकमान्य टिळकांच्या नावाने सुरू झालेल्या या संस्थेची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे.

...निरोप घेतांना पाय निघत नव्हता मात्र पुढील कर्तव्याची जाणीव ठेऊन मार्गाला लागलो. मन नकळत आपण समाजाला काय देतो याचाच विचार करत होतं आणि ओठावर लहानपणी शाळेच्या गानवृंदात म्हटली जाणारी 'नमस्कार माझ्या या ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम् सुंदरा' ही प्रार्थना होती. शिक्षणातलं सत्य, शिव आणि सुंदराचं दर्शन घडल्यावर हृदयानं असा प्रतिसाद देणंही तेवढंच स्वाभाविक होतं. संध्यासमयी सूर्याची किरणं क्षितीजावर फाकली होती. उद्याचा सूर्योदय अधिक तेजामय रुपात होणार होता. अंधारणा-या क्षितीजाकडे जाताना ते सूर्योदयाचे चित्र कसे असेल याचे विचार सुरू झाले.
'आजचे इवले स्वप्न, उद्या क्षितिजा पार असेल
चिरा चिरा पालवेल, उद्या सारे हिरवेगार असेल'

पुढचा प्रवास सुरू असतांना मागून हेच शब्द ऐकू येत होते.


  • डॉ.किरण मोघे

  • No comments:

    Post a Comment