Tuesday, February 28, 2012

स्वयंसिद्धा पौर्णिमाताई सवई

पौर्णिमाताई विजयराव सवई हे नाव राज्य शासनाचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वपरिचित आहे. टाकरखेडा शंभू सारख्या छोट्याशा गावात महिला जागृतीसोबतच महिलांनी शेती क्षेत्रात वळावे याकरिता तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात सुरू केलेल्या प्रबोधनात्मक कार्यक्रमामुळे पौर्णिमाताई सवई ह्या विदर्भातील शेतकऱ्याच्या घरातील रोल मॉडेल ठरल्या आहेत. मिल्क ते सिल्क या त्यांच्या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी सकाळीच टाकरखेडा शंभू या छोट्याश्या गावाला आम्ही पोहोचलो. 

अमरावती जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यात येणारे हे छोटेसे गाव. गावात प्रवेश करताच प्रथमदर्शनी वाडा वजा टुमदार सुंदर घर नजरेत भरते. स्वच्छ व सुंदर परिसर समोर कडूनिंबाचे डेरेदार झाड. अशा या आल्हाददायक वातावरणात सहज पोर्णिमाताई सवई यांच्या घराची चौकशी केली आणि वाड्याच्या समोरच उभ्या असलेल्या पौर्णिमाताईंनी आमचे स्वागत केले. वाड्यातील बैठकीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मोठे तैलचित्र आणि त्यासमोर प्रार्थनेसाठी असलेली बैठक व्यवस्था लक्ष वेधून घेत होती. अर्थशास्त्रात एम.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या पौर्णिमाताईंसोबत, त्या राबवित असलेल्या शेती आणि शेतीला पूरक उद्योग आणि अशा उद्योगात महिलांचा सहभाग कसा वाढेल याविषयावर संवाद साधत असताना त्यांनी सुरू केलेल्या प्रत्येक उपक्रमाबद्दल त्या अभिमानाने सांगायला सुरूवात करतात. 

एक सधन शेतकरी म्हणून या कुटुंबाची ओळख असली तरी सासऱ्यांसोबत शेतीचे प्राथमिक धडे त्यांनी गिरविले. संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांनुसार त्यांनी आपल्या आयुष्याची दिशा ठरविली आहे. राष्ट्रसंतांची प्रार्थना त्या नियमितपणे घेतात. यावेळी गावातील सर्वच नागरिक उपस्थित राहतात. प्रार्थनेनंतर सुरु होतो गावकऱ्यांशी संवाद. शेतीच्या अडचणींसोबतच शेतीतील नवीन प्रयोगांविषयी यावेळी गावकऱ्यांना त्या माहिती देतात. 

सुरुवातीपासूनच काही वेगळे करण्याची जिद्द बाळगलेल्या पौर्णिमाताई यांचे १९८५ मध्ये सवई कुटुंबात लग्न झाले. १९८७ पासून शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. ३४ एकर शेती असली तरी खारपाण पट्ट्यामुळे ओलीत करणे शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर निर्सगावर विसंबून शेती करण्यापेक्षा रेशीम शेतीचा पर्याय त्यांनी निवडला. सोयाबीन, तूर, सूर्यफूल आदी पारंपरिक पिकासोबत अडीच एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली आणि त्यासाठी कृषी विभागाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन रेशीम शेतीची संपूर्ण माहिती घेतली.

महिलांच्या पुढाकारासंदर्भात बोलताना त्यांनी आपली दिनचर्या सांगितली. सकाळी एक तास ध्यान केल्यानंतर ६ वाजता शेतीचा फेरफटका मारुन रेशीम किड्यांच्या संवर्धनासाठी तुतीचा पाला नियमितपणे आणत असल्याचे त्यांनी सांगितले. राहत्या घरातच ३०X३० आकाराचे शेड उभारुन दोनशे अंडीपूंजाचे पालन करण्यात येते. रेशीम कोषापासून महिन्याला सरासरी १७ हजार रुपयांचे उत्पादन होते. रेशीम किड्यांपासून निर्माण होणारे खत व पालापाचोळा तसेच गाईंच्या शेणापासून गांडूळ खत तयार करण्यात येते. यासाठी आधुनिक पद्धतीने १८ बेड तयार करण्यात आले आहेत. एका बेडमध्ये सरासरी १० क्विंटल गांडूळ खत तयार होते. सहाशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे खताची विक्रीसुद्धा घरूनच होते. शेतीला पूरक असणारा दुग्धव्यवसाय, शेतीत गांडूळ खताच्या माध्यमातून तुतीच्या झाडाची लागवड व या झाडाच्या पाल्यापासून रेशीम उत्पादन. म्हणजेच थोडक्यात मिल्क ते सिल्कचा प्रवास पूर्ण होतो. हा प्रवास पूर्ण करताना केवळ एकाच मदतनिसाच्या साहाय्याने आर्थिक उत्पादनात मोठी भर पडू शकते आणि हे सर्व काम महिला म्हणून मी स्वत: करते. याबद्दल निश्चितच महिलांमध्ये उत्सुकता असल्यामुळे हा प्रकल्प बघण्यासाठी अनेक महिला भेट देतात. त्यावेळी आपण करीत असलेल्या कामाचे कौतुक झाल्याचा निश्चितच आनंद मिळतो.

विदर्भात नैराश्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असताना अशा कुटुंबांना मार्गदर्शन करण्यासाठी सुरु असलेल्या उपक्रमाबाबत माहिती देताना पौर्णिमाताई म्हणाल्या की, घरची महिला घर वाचवू शकते. तसेच ती कुटुंबाला आत्मविश्वास मिळवून देऊ शकते. त्यामुळे विविध गावात जाऊन महिलांसाठी प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. कुटुंबाशी संवाद साधणाऱ्या ह्या कार्यक्रमात तीन पात्र असून सखाराम हा घरचा कर्ता पुरुष, लक्ष्मी ही त्याची पत्नी आणि वच्छला ही तिची मैत्रीण. नाट्यरुपाने सादर होणाऱ्या ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन व संचालन मी स्वत: करते. शेतकरी कुटुंबांना आत्मविश्वास व उर्जा देणाऱ्या या कार्यक्रमाचे विदर्भात २५० ते ३०० प्रयोग पूर्ण झाले आहेत. या संवादातून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी स्वत:चे बियाणे स्वत: तयार करावे याबाबतची तसेच गांडूळ खत, दुग्ध पालन, रेशीम शेतीची माहिती देण्याचा यामधून प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 

अंजनगाव तालुक्यातील सातेगांवच्या मेळाव्यासंबंधी बोलताना पौर्णिमाताई म्हणाल्या की, एक हजार शेतकरी कुटुंब यावेळी उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. महिला आता शेती व्यवसायाकडे झेप घेत आहेत ही निश्चितच आनंद देणारी घटना आहे. शेती पिकत नाही म्हणून आत्महत्या हाच पर्याय असू शकतो काय? हा प्रश्न उपस्थित करुन आत्मविश्वास जागृत करण्यासाठी राष्ट्रसंतांचा उपदेश त्या येथे सांगतात. आध्यात्म्याने भावना जागृत करताना जीवनात सकारात्मक विचार निर्माण व्हावेत यासाठी ध्यान करा व ईश्वरचरणी विलिन होत आपले कर्तव्यही समर्थपणे सांभाळा, असा उपदेश त्या करतात. दोन ते अडीच तासाच्या त्यांच्या या कार्यक्रमास शेतकऱ्यांकडून मिळत असलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाच्या साहाय्याने संपूर्ण जिल्ह्यात जागृती मेळावे आयोजित केले आहेत. 

प्रबोधनासोबतच संसारही नीटनेटका असावा याकडे त्यांचा कटाक्ष आहे. त्यांनी शेतीत पारंपरिक बियाण्यांच्या वापरासोबत मिश्र पीक पद्धतीचा अवलंब, गांडूळ खताचा वापर, सेंद्रीय शेतीला प्राधान्य व रेशीम उद्योग प्रसार व प्रचाराच्या कामासोबतच शेतीवर आधारित गांडूळ खत निर्मिती, गांडूळ पाणी निर्मिती, दशपर्णी अर्क, गोपालन व रेशीम शेतीवरील उद्योग त्या यशस्वीपणे राबवित आहेत.

सिल्क ते मिल्क या उपक्रमासोबत त्यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन आर्थिक संपन्नता मिळविल्याबद्दल राज्य शासनाने त्यांचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यांच्या उपक्रमासाठी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारासोबतच असंख्य पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. शेतीच्या अर्थशास्त्रात आता त्या पारंगत झाल्या आहेत. त्यांचा अनुभव व जिद्द शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करणारी तर ठरणार आहेच, त्याचबरोबर महिलांनाही निश्चितच प्रेरणा देणारी आहे.

  • अनिल गडेकर
  • No comments:

    Post a Comment