Sunday, February 5, 2012

बहू व्‍यवसायी उपक्रम शिलता!

सावकाराच्‍या जाचातून सुटका व्‍हावी, महिलांच्‍या गरजा महिलांनाच भागविता याव्‍यात आणि बचतगटातून जमा झालेला पैसा महिलांच्‍याच पर्यायाने कुटुंबासाठी उपयोगी ठरावा या उद्देशाने वर्धा जिल्‍ह्यातील देवळी पासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंजखेडा गावात १६ महिलांनी एकत्र येऊन २००३ मध्ये रमाबाई बचतगट स्‍थापन केला.

सुरुवातीला त्‍यांनी स्वत:च थोडे थोडे पैसे जमा करुन अंतर्गत व्‍यवहार सुरु केला. त्‍यानंतर काही दिवसांनी त्‍यांना खेळते भांडवल मिळाले. त्‍यामधून त्‍यांनी अंतर्गत कर्ज वाटप करून स्वत:च्‍या गरजा भागविण्यास सुरूवात केली. बचत आणि त्याबरोबर स्वत:च्या गरजा भागविता आल्याने महिलांचा उत्‍साह वाढला. त्यांची काम करण्याची क्षमता पाहून त्‍यांना कपडा व्‍यवसायासाठी २ लक्ष २० हजार रुपये मंजूर झाले. कपडा व्‍यवसायामधून हळूहळू महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली.
कपडा व्यवसाय जरी गटाचा असला तरीही प्रत्यक्ष सर्वच महिला सदस्य त्यासाठी वेळ देऊ शकत नव्हत्या. काही शेतीच्या कामावर जात होत्या. त्यामुळे या महिलांनी मिटींग घेऊन त्यात या विषयावर चर्चा केली. त्या चर्चेतून सर्व महिलांनी वैयक्तिक व्‍यवसाय सुरु करायचा आणि कर्ज बचत गटामधून घ्‍यायचे, असा प्रयोग करण्याचे ठरले. हा विचार सुरुवातीला नवीन होता. बचतगट हा सुद्धा बहुव्‍यवसायी होऊ शकतो का? परंतु मनात आणले तर काहीही शक्य होऊ शकते, हा विचार पक्का करून त्‍या महिलांनी लागलीच तो विचार कृतीमध्‍ये आणला. महिलांनी शेती, किराणा, हॉटेल, स्‍टेशनरी, शिलाई मशीन, पापड इत्‍यादी व्‍यवसायासाठी कर्ज घेतले आणि काय आश्‍चर्य ! अल्पावधीतच हा गट बहुव्‍यवसायी म्‍हणून नावारुपास आला.
वैयक्तिक व्‍यवसाय असल्‍यामुळे महिला जीव ओतून काम करु लागल्‍या आणि त्‍यांना चांगला नफा मिळू लागला. त्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारुन त्‍या सक्षम बनल्‍या. कर्ज व्‍याजासहित गटामध्‍ये परत करु लागल्‍या.

एका गटामधील हॉटेल चालविणाऱ्या महिलेचे साधारण कुडाकाटीचे घर होते. परंतु या व्‍यवसायामुळे आर्थिक स्थिती सुधारून आज त्‍या महिलेचे दुमजली घर आहे. हे सर्व गटामधील कर्ज मिळाल्‍यामुळे झाले. हे ती महिला अभिमानाने सांगते. त्‍याचप्रमाणे एका महिलेची शेती खूप दिवसापासून पडीक होती, त्‍या महिलेने गटामधून कर्ज घेऊन शेती केली त्यातून त्‍या महिलेलाही चांगले उत्‍पन्‍न मिळाले आहे.
महिलांना कर्ज घेणे आणि परत करणे हे आपले कर्तव्‍य वाटू लागले. त्‍यामुळे पैसा खेळता राहिला. त्‍याचप्रमाणे त्‍यांच्‍या गटाचे यशस्वी होण्याचे रहस्‍य म्‍हणजे त्‍यांच्‍या मासिक बैठका नियमित होतात. तसेच मासिक बचतीसोबतच महिला आपल्‍या गटातील अडीअडचणी भागविण्‍यासही नेहमी तत्‍पर असतात.

गटाच्‍या रहस्‍याबाबत विचारले असता महिलांनी सांगितले की, गटाबद्दल आम्‍हाला खूप विश्‍वास निर्माण झाला आहे. आपली स्‍वतःची बचत आपल्‍या गरजा भागविण्‍याच्‍या कामी येत आहे. त्‍याचप्रमाणे गटामध्‍ये महिलांच्‍या गरजा भागणे महत्‍वाचे असल्‍यामुळे महिलांनी वेगवेगळ्या व्‍यवसायासाठी पैसे घेतले तरी गटप्रमुखांनी किंवा कोणत्‍याही सदस्‍यांनी आडकाठी आणली नाही.
गटामध्‍ये फक्‍त आर्थिक देवाण-घेवाण होत नाही तर महिलांच्‍या सुखदुःखावर चर्चाही होते. त्‍यासोबत त्‍यापैकी काही सदस्‍य आशा वर्कर असल्‍यामुळे आरोग्‍यविषयक शिबीर घेण्‍यात येते. प्रत्‍येकीच्‍या घरी शौचालय असल्‍यामुळे स्‍वच्‍छता विषयक बाबींबद्दल त्या जागरुक आहेत हे ही दिसून येते. त्‍याचप्रमाणे अंगणवाडीला देण्‍यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराची जबाबदारी रमाबाई महिला बचत गटाकडे आहे. गावातील विविध अभियानांमध्ये सुद्धा या गटामधील सदस्यांचा सहभाग आहे.

रमाबाई महिला बचतगट हा फक्‍त बहुव्‍यवसायी गट नसून बहू सामाजिक उपक्रम गटही आहे. त्‍यावरुन असे लक्षात येते की, या गटाच्या महिला धनव्‍यवहारासोबतच मनव्‍यवहार सुद्धा सांभाळतात. त्यामुळेच हा गट यशस्वितेच्‍या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

No comments:

Post a Comment