Saturday, February 18, 2012

कथा कृतार्थ सहजीवनाची : ‘मी भरून पावले आहे’.....

सामाजिक कार्य करणाऱ्या, समाजसुधारणेचा ध्यास घेणाऱ्या आणि धर्माच्या अन्यायकारक बाजूंविरुद्ध संघर्ष करणाऱ्या हमीद दलवाईंच्या पत्नी एवढीच मेहरुन्निसा दलवाई यांची ओळख नाही. त्या स्वतःही समाज बदलाचं सूत्र घेऊन आज कार्यरत आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या आयुष्यातील ठळक घटना आणि आठवणी चित्रित करणारं आत्मचरित्र लिहिलं. ‘मी भरून पावले आहे’ या नावाने ते पुण्याच्या साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे.

उर्दू माध्यमातून शिकलेल्या मेहरुन्निसा यांना आपण अशुद्ध मराठीत लिहावं तरी कसं असा प्रश्न पडला पण त्यातून मार्ग काढला गेला, तो कॅसेटवर बोलणं टेप करण्याचा. सरिता पदकी, विलास चाफेकर यांच्यासह अनेकांच्या मदतीने हे पुस्तक सिद्ध झालं. आपल्या या पुस्तकात त्यांनी बालपणातील आठवणीपासून अनेक कौटुंबिक घटनांची नोंद केली आहे. त्यातून मुस्लिम समाजाचं, त्यातील बदलांचं चित्र उभं राहतं. त्यांच्या घरचं वातावरण फार धार्मिक नव्हतं. शुक्रवारी तेवढा नमाज पढण्याचा रिवाज पाळला जात असे. शिक्षणाबाबतही व्यापक दृष्टी असणारं हे कुटुंब होतं. त्यांची आत्या बी. ए. बी. टी. झालेली होती. त्याकाळी खान-पाणंदीकर विवाह गाजला होता, त्या मालिनी पाणंदीकर मेहरुन्निसा यांच्या काकी होत्या. धर्म बदल न करता हा विवाह झाला होता हे विशेष. हिंदू-मुसलमान ऐक्याचं, देवघेवीचं आणि सलोख्याचं वातावरण अवती भवती होतं. या लहानपणीच्या आठवणी लेखिकेने रंगून जाऊन लिहिल्या आहेत. 

इंटरपर्यंत शिकल्यानंतर पुढचं शिक्षण त्यांना जड जात होतं, कारण शिक्षणाचं माध्यम. इंग्रजी माध्यमाने तडाखा दिला. मग १९५८ मध्ये त्या मुंबईला आल्या. १९५४ मध्ये खादी ग्रामोद्योग कमिशनमध्ये त्यांना नोकरी मिळाली. याच सुमारास दलवाईंशी परिचय झाला. दलवाईंसारखा भला माणूस आपल्याला कधीच धोका देणार नाही, या विश्वासाने विवाहाचा निर्णय मेहरुन्निसा यांनी घेतला. एका मैत्रिणीच्या मध्यस्थीने भेटीगीठी झाल्या होत्या. मेहरुन्निसाच्या आईला हे लग्न तेवढं पसंत नव्हतं, पण निर्णयावर मेहरुन्निसा ठाम राहिल्या. १९५८ मध्ये दोघं नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाले. लग्नानंतरही काही दिवस मेहरुन्निसा आजीजवळच राहिल्या. सासरच्या घरी, कोकणातील गावाला भेट दिली, त्यावेळी मेहरुन्निसा यांना दलवाई तिथे घेऊन गेले. तिथे त्यांचं स्वागतच झालं. तिथली राहणी, भाषा, रिवाज याबद्दलचं बारकाईने केलेलं निरीक्षण या लेखनात टिपलं गेलंय.

दलवाईंचं सामाजिक काम आणि सुधारणावादी विचार, त्यांचे लिखाण ही बाजू विवाहानंतर मेहरुन्निसाला अधिकाधिक समजत गेली. स्त्रीबद्दलचा पतीचा उदार दृष्टिकोन त्यांनी जाणला होताच. एकपत्नीत्व, तोंडी तलाकाला बंदी, समान नागरी कायदा या संदर्भात सामूहिक मागण्या करण्याची चळवळ सुरू करण्याचं पाऊल दलवाईंनी उचललं. त्यासाठी मुस्लिम स्त्रियांचा मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. दलवाईंनी या मोर्चात सामील व्हायला सांगितलं तेव्हा मेहरुन्निसाही त्यात सहभागी झाल्या. पण या कामाचं महत्त्व त्यांनाही पटलं आणि त्या त्यात कधी बुडाल्या, त्यांचं त्यांनाच कळलं नाही. १९७० मध्ये मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि या आंदोलनाला एक घर मिळालं, दिशा लाभली. याच धामधुमीमुळे, अनियमितपणामुळे दलवाईंना आजारपण आलं. किडनी खराब होऊन डायलिसिस करावं लागलं. काही काळाने दुखणं उलटलं आणि दलवाईंचं निधन झालं. 

कोणतेही धार्मिक अंत्यविधी न करता आपलं दहन केलं जावं अशी दलवाईंची अंतिम इच्छा होती. त्यावेळी यामुळे दंगे होण्याची भीती होती, पण त्यांच्या इच्छेचा मान राखायला हवा, असा ठाम निर्णय मेहरुन्निसा यांनी घेतला. दलवाईंच्या मागे त्यांचं काम चालू ठेवलं. मुस्लिम महिलांसाठी काम करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. मेहरुन्निसा दलवाई या सर्व चळवळीत एक भूमिका घेऊन लढल्या आहेत. त्यांच्या या आठवणींमधून त्यांची वाटचाल, जडणघडण उमगते. एका समाजाच्या प्रश्नांचं दर्शन घडतं आणि व्यापक दृष्टी ठेवून काम करणाऱ्या हमीद दलवाईंच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. एका कृतार्थ कार्यकर्तीची ही आत्मकहाणी हे सामाजिक संघर्ष प्रतिबिंबित करणारं एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे.

  • नंदिनी आत्मसिध्द
  • No comments:

    Post a Comment