Saturday, February 18, 2012

अमिट जिद्दीची अजोड कहाणी : ‘फिटे अंधाराचे जाळे’


शारीरिक व्यंगावर मात करून आनंदाने जगणारी माणसं आपल्या जीवनातल्या अंधाराला नकार देत प्रकाशाच्या दिशेने जात असतात. अशीच एक मुलगी भेटते ‘फिटे अंधाराचे जाळे’ या पुस्तकातून. तिचं नाव वल्लरी करमरकर. पुस्तकाचे लेखक भालचंद्र करमरकर, म्हणजे वल्लरीचे वडील. वल्लरीला जन्माच्या वेळीच लहान मेंदूला इजा पोचल्यामुळे शारीरिक अपंगत्व आलं. वाचा, अवयवांची हालचाल, बसणं-उठणं सगळंच जखडून गेलेलं...

मुळात तिचा जन्मच अनेक उपचार घेतल्यानंतर झालेला. पण आपलं मूल असं जन्मलं, याचं दुःख उगाच उगाळत न बसता तिच्या आई-वडिलांनी वल्लरीचं आयुष्य सुकर कसं होईल याचा सतत विचार केला. सर्वात उत्तम सहकार्य मिळालं ते वल्लरीकडून. तिची जिद्द आणि इच्छाशक्ती दांडगी नसती तर हे शक्यच झालं नसतं. 

वल्लरी आज चाळिशीच्या उंबरठ्यावर पोचली असेल. बालपणी दूध ओढणंही जिला जमत नव्हतं, ती वल्लरी एका बोटाने कॉम्प्युटर चालवू लागली. थोडं थोडं लिहू लागली. पुस्तक विशिष्ट पद्धतीने वाचायला शिकली. आणि संगीताच्या विश्वात मनापासून रमणं हा तिचा छंद बनला. संस्कृत विषयात तिने एम. ए. केलं आणि अत्यंत जिद्दीने आपलं जगणं तिने आत्मसात केलं. वल्लरीची कहाणी अनेक बाजूंनी अचंबित करणारी आहे. ती सोशीक, जिद्दी पहिल्यापासून होतीच, पण तिच्या आयुष्याचे शिल्पकार असलेले तिचे आई-वडीलही या श्रेयाचे वाटेकरी आहेत. ‘फिटे अंधाराचे जाळे’ या मेहता प्रकाशनाच्या पुस्तकातून त्याच्या धडपडीचा दमछाक करणारा प्रवास शब्दबद्ध झाला आहे.

वल्लरीला वाढवताना या दांपत्याने घेतलेले कष्ट, तिच्या एका एका कणाच्या प्रगतीसाठी केलेलं जिवाचं रान हे सारं त्यांच्याबद्दल मनात आदर निर्माण करतं. आपल्या मुलीला शास्त्रशुद्ध, वैद्यकीय आणि मानसिक धीर देणाऱ्या उपचारांनीच बरं करण्याचा दुर्दम्य हट्ट त्यांनी बाळगला. बुवाबाजी, अंगारे-धुपारे यांना ते शरण गेले नाहीत ही विशेष बाब आहे. आपल्या मुलीच्या रूपाने आयुष्यात उभं राहिलेलं आव्हान त्यांनी पेललं. 

वल्लरीला शक्य तितकं सर्वसामान्य जीवन जगता यावं यासाठी धडपड केली. परिस्थिती मोठी संपन्न नसली तरी मनातील उभारी आणि समर्पित भावना यांच्या बळावर त्यांनी ही सर्व वाटचाल केली. वल्लरी इतर मुलांसारखी बनली नाही आणि ती तशी कधीच बनणार नाही. पण त्या दिशेने तिचा प्रवास होत राहावा ही इच्छा तिच्यात रुजवण्यात ते यशस्वी ठरले. या वाटचालीत हर तऱ्हेची औषधं, उपचार झाले. मोठी ऑपरेशन्स झाली. तिला हाताची मूठ उघडता यावी, हाताने काम करता यावं यासाठी केलेल्या बारीकसारीक व्यायाम प्रकारांपासून ते तिच्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात परीक्षांच वेळी आलेल्या अडचणींपर्यंत अनेक गोष्टींबद्दल तिच्या वडिलांनी लिहिलं आहे. 

वल्लरीला लाभलेले सुधीर फडके, आशा भोसले यांच्यासारखे चाहते, तिची अद्‍भुत स्मरणशक्ती, बोलण्यासाठी तिने घेतलेले कष्ट, एस. एस. सी. च्या परीक्षेचा फॉर्म भरतेवेळी तिला लिहिता येत नसल्याने अंगठा उठवावा लागल्यानंतर तिची झालेली घालमेल हे सर्व वाचताना मन भारावून जातं. लहानपणी तिचाकी सायकल चालवण्यासाठी कष्ट घेणारी वल्लरी पुढे हाताला सराव राहावा म्हणून रोज एखादं पान तरी जिद्दीने लिहू लागली. बी. ए. आणि एम. ए. मध्ये तिने मिळवलेला प्रथम वर्ग हे कौतुकास्पद यश होतंच, पण तिची चिकाटी, लेखनिकाला उत्तर सांगताना होणारा त्रास सोसण्यासाठीची तयारीही चकित करणारी होती.

या पुस्तकातून पुढे येणा-या काही गोष्टी प्रेरक तर काही चिंताजनक आहेत. वल्लरीसाठी परीक्षेच्या वेळी लेखनिकाची परवानगी घेताना, अर्धा तास जादा वेळ मागताना तिच्या वडिलांना जो त्रास, मनस्ताप दरवेळी झाला, त्यावरून आपल्याकडील प्रशासकीय व्यवहारांमधल्या त्रुटी स्पष्ट होतात. विकलांग, अपंग किंवा अशाच त-हेच्या आव्हानांना सामोरं जाणा-यांबद्दलच्या सहानुभूतीचा अभाव किंवा या संदर्भातील घोर अज्ञान, उपेक्षेची भावना याबद्दलचे अनुभव वाचताना आपला समाज माणुसकीचीही बूज कशी ठेवत नाही हे विदारक वास्तव समोर येतं. 

विकलांग मुलांना त्यांचे पालक अनेकदा अधिकच अपंग कसे करून ठेवतात, याचीही काही उदाहरणं लिहिण्याच्या ओघात लेखकाने दिली आहेत. हे पुस्तक लिहिताना वल्लरीच्या वडिलांनी कोणताही कडवटपणा येऊ न देता, त्रागा न करता आपले अनुभव शब्दबद्ध केल्याचं जाणवतं. वल्लरीवर आई-वडिलांनी केलेलं प्रेम, तिच्या प्रगतीचा त्यांनी केलेला विचार, त्यांच्या प्रयत्नांमधलं सातत्य हे सारं वल्लरीच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरलं. वल्लरीची ही कहाणी आश्वासक आहे. तिच्या जिद्दीची ही कहाणी सर्वांनाच प्रेरक ठरेल.

  • नंदिनी आत्मसिध्द
  • No comments:

    Post a Comment