Wednesday, February 15, 2012

बचतगटांनी दिला स्त्रियांना सन्‍मान

एकविसाव्‍या शतकाच्‍या सुरुवातीला महिलांचा सहभाग सर्वच क्षेत्रात दिसू लागला आहे. ग्रामीण भागातील महिला स्‍वतःला मर्यादित न ठेवता पुरुषांच्‍या बरोबरीने काम करू लागल्या आहेत. महिलांना सन्मानाने जगण्यासाठी बचतगट हे उत्कृष्ट माध्यम ठरू लागले आहे.

वर्धा जिल्‍ह्यातील आष्‍टी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या माणिकवाडा येथील अन्‍नपूर्णा स्‍वयंसहायता महिला बचत गटाच्‍या सदस्‍यांची कामगिरी अशाच प्रकारचे महिलांचे यश अधोरेखित करणारी आहे.

एकूण १२ सदस्य असलेल्या या बचत गटाची स्‍थापना ३ ऑगस्‍ट २००५ रोजी झाली. सर्वानुमते पुष्‍पा दशरथ घागरे यांना अध्‍यक्ष आणि बेबी रामराल गंधळे यांना सचिव बनविण्यात आले. त्‍यानंतर महिलांना शिक्षित व प्रोत्‍साहित करण्‍याचे कार्य संघटिका महानंदा राऊत यांनी उत्तमरित्‍या बजाविले.

बँक ऑफ इंडिया, साहुर शाखेकडून गटाची प्रथम प्रतवारी ८ नोव्‍हेंबर २००७ ला झाल्यानंतर अंतर्गत कर्ज वाटपाकरिता गटाला २५ हजार रुपयांचा फिरता निधी उपलब्‍ध झाला तर, अनुदान म्हणून १० हजार रूपये मिळाले. या रकमेचा योग्य उपयोग करून गटातील महिलांनी स्वत:च्या संसाराला हातभार लावला. कालांतराने महिलांना गटाच्या कर्जातून प्रगती साधता येईल हे लक्षात आल्यानंतर त्‍यांनी दुग्‍धव्‍यवसाय करण्‍याचे ठरविले. दुग्‍धव्‍यवसायाकरिता २० संकरित गायी खरेदी करण्‍याकरिता बँक ऑफ इंडिया, साहुर शाखेला प्रस्ताव सादर केल्यानंतर बँकेने ९ सप्‍टेंबर २०१० रोजी द्वितीय प्रतवारी करुन गटाला २ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. कर्जाचा पहिला हप्‍ता ४ फेब्रुवारी २०१० ला मिळाल्यानंतर त्यातून १० गायी खरेदी करण्‍यात आल्‍या.

गाईंच्या उत्तम संगोपनानंतर दररोज दुधाच्या विक्रीतून पैशाची आवक सुरु झाली. शिक्षण जास्त नसले तरी स्‍वतःच्‍या पायावर उभे राहून आपल्‍या संसारासाठी हातभार लावण्‍याची धडपड या बचतगटाच्‍या सदस्यांमध्‍ये दिसून येऊ लागली. व्‍यवसायात मिळणारा नफा तोटा यांचा हिशेब ठेवणे, खरेदी-विक्री, उत्‍पादन ही सर्व कामे महिला चोखपणे पार पाडतात. गटातील सर्व महिला सण समारंभ साजरा करण्यासाठी न चुकता एकत्र येतात. यामुळे त्यांच्यातील एकोपाही टिकून आहे.
गटाच्‍या माध्‍यमातून स्त्रियांचा व त्‍यांच्‍या कुटुंबाचा संसार फुलू लागल्‍याचे निदर्शनास आल्‍याशिवाय राहत नाही. बचतगटांमुळे स्त्रियांना बँकेचे व्‍यवहार कळू लागले आहेत. तसेच स्त्रियांना समाजात मानाचे स्‍थानही मिळत आहे. या गटाची आदर्श कार्यप्रणाली व भरभराट पाहून इतर गावातील महिला सुद्धा प्रेरीत होत आहेत.

No comments:

Post a Comment