Thursday, June 7, 2012

आदिवासी संस्कृतीचे दर्शन : कोया पुनेमता अद्दम

आदिवासीची परंपरा दिवसेंदिवस लोप पावत आहे. अशी सगळीकडे ओरड होत असली तरी त्यांच्यात रुजलेली कला, संस्कृती आणि कौशल्य् आजही आपल्याला पाहायला मिळते. निर्भिड जंगल दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या माडिया, गोंड आणि परधान जमातीची काही पारंपारिक खास वैशिष्टये आहेत. हा समाज सद्यपरिस्थितीत आपले अस्तित्व टिकवून आहे. त्याची एक वेगळी ओळख आहे. या समाजातील संस्कृती जोपासून येणाऱ्या पिढीला जाणिव करुन देण्याच्या दृष्टीने त्याचे जतन केले पाहिजे.

आदिवासी बहूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्हयाच्या ग्रामीण आणि जंगल दऱ्याखोऱ्यात आदिवासी संस्कृतीचे जतन आजही केले जाते. एकेकाळी वैभवसंपन्न् असलेला समाजाच्या संस्कृतीचे समृध्द दर्शन घडविण्यासाठी भामरागड वनविभागाच्या वतीने कोया पुनेमता अद्दम या नावाचे खास संग्रहालय सुरु करण्यात आले आहे.

हा समाज दऱ्याखोऱ्यात वास्तव्याला असूनही त्यांची संस्कृती ही उच्च् कोटीची आहे. हा समाज निसर्ग पूजक आहे. आधुनिक काळात मात्र, आदिवासी संस्कृतीची अनेक वैशिष्टे लोप पावत आहेत. त्यामुळेच या संग्रहालयाची निर्मिती करुन जतन करण्यात आली आहे. आदिवासी समाज रुढी परंपरेनुसार नागरिक सण, उत्सव या समुदायाचे दैनंदिन कार्य, शेती, शिकार, चालीरिती, कला, पोषाख, शस्त्रे आदींची ओळख नागरी समाजाला करुन देण्यासाठी व आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विशेष संग्रहालय उभारण्यात आले आहे.

आदिवासी समाजातील अशा अनेक बाबी आहेत की, ज्या इतर नागरिक व प्रगत समजल्या जाणाऱ्या समाजाला मार्गदर्शक व शिकण्या योग्य् आहे. आदिवासी संस्कृतीचे वैभव कथन करणाऱ्या एकेक वस्तुंचा संदर्भ मनोरंजक पध्दतीने उलगडण्यात आला आहे. त्यामुळे या संग्रहालयातून फिरतांना वेळ कसा निघून जातो हे कळत नाही.

यामध्ये आदिवासीचे लग्न् प्रसंगी लावण्यात येणारे (मुंडा) कोरीव काम केलेले खांब, शिकारीसाठी वापरण्यात येत असलेले शस्त्र आणि जाळे, तंबाखु ठेवण्यासाठी लाकडापासून कोरीव काम केलेला डब्बा (गोट्टा) कासा व पितळ यापासून बनविलेले दागिने व देवघरात ठेवण्यासाठी व पुजनासाठी बनविलेले (हाकूमी) शंख, शिकारीसाठी तयार केलेला तीर कामठा (धनुष्य बाण) दरोरोज दैनंदिन जीवनात वापरात येत असलेले टोपल्या, झाडू, सुप असे अनेक साहित्य प्रदर्शनात लावण्यात आले आहे. यातून माडिया गोंड समाजाच्या उच्च संस्कृतीचे दर्शन घडते.

गडचिरोली जिल्हयाच्या दक्षिण भागात असलेल्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली स्थित भामरागड वनविभागातर्फे संग्रहालय सुरु केला. यामुळे या परिसरात पर्यटक ही मोठया संख्येने येतात. या पर्यटकांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन व्हावे. यासाठी सुरु केलेला संग्रहालय आपले एक वेगळेपण दाखवित आहे.

  • रामचंद्र गोटा , जिल्हा माहिती अधिकारी , गडचिरोली
  • No comments:

    Post a Comment