Sunday, June 3, 2012

शेतीतून समृद्धी

शेती व्यवसाय हा पुरूषांपुरता मर्यादित राहिलेला नसून महिलांनीदेखील मातीतून मोती पिकविल्याची अनेक उदाहरणे आहेत. जमिनीची मशागत करण्यापासून कृषी उत्पादनांच्या प्रक्रिया उद्योगापर्यंत महिलांनी झेप घेतली आहे. ग्रामीण भागात रूजलेल्या बचत गट चळवळीच्या माध्यमातून या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील जागृती महिला बचत गटाने शेती क्षेत्रातील यशस्वी महिलांकडून प्रेरणा घेऊन भाजीपाला उत्पादनात चांगली प्रगती केली आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने २००४ मध्ये एकत्र येऊन या बचत गटाची स्थापना करण्यात आली. प्राथमिक स्वरुपाची बचत करून महिलांनी गटाच्या कार्याला सुरुवात केली. महिलांनी पारंपरिक व्यवसाय न करता कृषी कार्यावर आधारित भाजीपाला व्यवसाय सुरू करण्याचे निश्चित केले. प्रारंभी परसबागेच्या स्वरुपात या कामाची सुरुवात झाली. नंतरच्या काळात गटाच्या अध्यक्षा दिप्ती उसरे यांनी दिलेल्या एक गुंठा जागेत भाजीपाल्याची लागवड करणे सोईचे झाले. महिलांना २००५ मध्ये शेतीकामासाठी २५ हजारांचे कर्ज मिळाले. त्यातून शेतीची काही साधने खरेदी करण्यात आली.

भातशेतीचा हंगाम संपल्यावर घरकाम सांभाळून या महिला भाजीपाला लागवडीला सुरुवात करीत. कृषी विभागाचे अधिकारी महाडीक यांनी शेतीशाळेच्या माध्यमातून महिलांना लागवडीबाबत चांगले मार्गदर्शन केले. भाजीपाला आल्यावर गावात जाऊन त्याची विक्री केली जाई. दरवर्षी मिळालेल्या कर्जाची परतफेड करताना शेतीच्या प्रगतीसाठी काही रक्कम काढून ठेवली जाई. शेतीसाठी भाड्याने यंत्र आणले जात असे. मात्र पुढे बँकेमार्फत ३ लाख ४० हजारांचे कर्ज मंजूर झाल्यावर स्वत:च्या मालकीची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली. त्यामुळे शेतीवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत झाली.

भातशेतीसाठी शेतात काम करायला जाणाऱ्या या महिलांच्या शेतीकामासाठी गडी म्हणून घरातील पुरुष माणसांना काम देण्यात येऊ लागले. गटाच्या माध्यमातून शेतातून भेंडी, गवार, मका, सूर्यफूल, पालक आदी भाज्यांचे उत्पादन करण्यात येत आहे. प्रत्येक महिला दररोज ५०० रुपयांच्या भाजीची विक्री करते. उत्पादन वाढल्याने घाऊक स्वरुपातही भाजीची विक्री होऊ लागली आहे. ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडूनही वेळोवळी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत असल्याने गटाची प्रगती वेगाने होत असल्याचे सुभाषिनी शिबे यांनी सांगितले.

बचत गटाने बियाणे विक्री व्यवसायदेखील सुरू केला असून इतर गटांना हे बियाणे विक्री केले जाते. भाजीपाला विक्रीचे तंत्र आत्मसात करताना शेतीचे चांगले नियोजन करून या महिलांनी आपणही या क्षेत्रात मागे नसल्याचे सिद्ध केले आहे. भविष्यात स्वत:ची जमीन घेऊन शेतीकार्य वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे सपना उसरे यांनी सांगितले.

बचत गटाच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन गटाला तालुका स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारापासून प्रेरणा घेत शेतीतून समृद्धी मिळविण्यासाठी या महिला प्रयत्न करतील हे त्यांच्याशी चर्चा केल्यावर चटकन लक्षात येते.

No comments:

Post a Comment