Wednesday, June 6, 2012

द्राक्ष बागेत टोमॅटो आंतरपिकाचे भरीव उत्पादन

पारंपरिक शेती करताना त्यास माहिती तंत्रज्ञान व नवीन कृषी तंत्राची जोड दिल्यास शेतीतून भरीव उत्पादन घेणे शक्य होते. यासाठी कृषी विभागाकडून अनेकविध नवीन तंत्रज्ञानाची आणि नवीन प्रयोगांची माहिती शेतकरी बंधुना देण्यात येते. नवनवीन करण्याची उर्मी असलेल्या निफाड तालुक्याच्या उगाव येथील मधुकर मापारी यांनी द्राक्ष बागेत टोमॅटोचे आंतरपिक घेऊन भरीव उत्पादन घेतले आहे. हे मापारी यांचे हे पाऊल इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शकच आहे.

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उत्पादन खर्चामुळे शेती व्यवसाय करणे जिकरीचे झाले आहे. अत्यल्प पाणी आणि कामाचे यशस्वी नियोजन करून द्राक्ष बागेत टोमॅटोचे आंतरपीक घेऊन भरीव उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग मापारी यांनी केला आहे.

मधुकर मापारी यांची उगांव शिवारात ६५ आर शेत जमीन आहे. शेतातच वस्ती करून मापारी कुटुंब राहत आहे. त्या क्षेत्रात मार्च एप्रिल २०११ मध्ये डांग्रीज जातीच्या द्राक्षहुंडीची, थॉमसन जातीची द्राक्षकाडी कलम भरली. त्यास ठिंबक सिंचन, आधारासाठी बांबू, अँगल, तार इत्यादी कामासाठी ६ लाख ३० हजार रुपये एवढा खर्च केला. द्राक्षवेलीची वाढ जोमाने होण्यासाठी सेंद्रीय, रासायनिक खतांची योग्य मात्रा वेळोवळी दिली. द्राक्षबागेची लागवड करताना एकाच वरंब्यावर दोन्ही बाजूने एकमेकांशी तिरप्या पद्धतीत लागवड करुन २१ ओळीद्वारे सुमारे २४५० हुंडी लागवड केली.

द्राक्षवेलीच्या वाढीची प्रक्रिया सुरू असताना जून २०११ मध्ये दोन ओळींमध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेत टोमॅटोची आंतरपीक म्हणून लागवड केली. त्यांची योग्य मशागत करून पुरेसे पाणी खत देऊन वाढ केली. टोमॅटो पिकाचा पोत दृष्ट लागण्याइतपत सुधारला. त्या पिकासाठी आधार म्हणून द्राक्ष बागेलाच आधारासाठी लावलेल्या तारीचा आणि सुतळीचा वापर केला. टोमॅटो पिकाच्या देखभालीवर सुमारे ४५ हजार रुपयांचा खर्च केला.

आज टोमॅटोचे भरघोस उत्पादन निघत असून प्रती कॅरेटचे बाजारभाव २५० ते ५०० रूपये मिळू लागले आहेत. टोमॅटो पिकाची द्राक्ष बागेत झालेली वाढ विशेष लक्षवेधी ठरत आहे. टोमॅटो पिकाकडे मापरी परिवाराने लक्ष पुरविले असले तरी द्राक्षवेलीची देखील त्याच नेटाने काळजी घेतली आहे. द्राक्षवेल देखील आता परिपूर्ण वाढली असून कोणत्याही स्वरूपात रोगराई होणार नाही याची काळजी मापारी कुटुंबाने घेतली आहे. शेती-पाण्याचे नियोजन यशस्वी करून मधुकर मापारी यांनी सुनील व बाबासाहेब या दोन मुलांच्या साथीने द्राक्षांमध्ये टोमॅटो पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. उगांव आणि परिसरातील गावांमधून तज्ज्ञ व अनुभवी शेतकरी मापारी परिवारांचे यशस्वी नियोजन व उत्पादन बघत असून त्याप्रमाणे आपल्या शेतातही असाच प्रयोग करण्याचा मानस मापारी यांच्याकडे बोलून दाखवित आहेत.

श्री.मापारी यांनी केलेला प्रयोग यशस्वी झालेला असून सर्वच शेतकरी बंधुनी कृषी विभागाने पुरविलेल्या विविध योजनांचा व नवनवीत तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेती परवडणारीच आहे, असे मत मधुकर मापारी यांनी व्यक्त केले आहे.

  • देवेंद्र पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक
  • No comments:

    Post a Comment