Friday, June 15, 2012

नाल्यात कचरा कोण टाकतंय?

कावळे घरटी बांधण्यासाठी काटक्या गोळा करु लागले आहेत. संध्याकाळच्या वेळी तुफानी वारं सुटून पालापाचोळा आपल्याभोवती गिरक्या घेत फिरु लागला आहे आणि मधूनच उन्हाचा चटका कमी होऊन चक्क मळभ दाटून येतंय याचा अर्थ उघड आहे. नेमेचि येणारा पाउस आता तुमच्या आमच्या थेट दारात येऊन उभा राहिलाय. तो केरळात आला आहे. कर्नाटकाच्या दिशेनं तो पुढे सरकतोय आणि तिकडे दक्षिण महाराष्ट्रात त्यानं आपली चाहूल थोडी फार सडाशिंपण करुन दाखवलीय. तरी आपल्या मुंबापुरीत त्याचं तुफान अद्याप सुरु व्हायचंय. एकदा ते झालं की बघता बघता, घड्याळाच्या काट्यागत वागणारं हे महानगर अवचित गाफील पकडलं जाईल आणि पायाला चाकं लावल्यागत धावणारी मुंबापुरी मोसमात किमान एक दोनदा तरी पायात बेड्या घातल्याप्रमाणं जागच्या जागी ठाणबंद होऊन पडेल.

महाराष्ट्रात पाऊस आल्याची खात्रीही तेव्हाच उभ्या महाराष्ट्राला पटेल. पण त्या आधी म्हणजे पावसाचे पाणी वाहून अरबी समुद्रात नेणारे या महानगरातील नाले आज गाळ आणि कचरा यांनी दुथडी भरुन वाहत आहेत. पावसाचे चार थेंब जरी पडले, तरी ते वाहून जाऊ शकणार नाहीत, अशी आजची स्थिती आहे. कारण हे नाले आधीच तुडुंब भरलेले आहेत आणि एक भाग्याची गोष्ट अशी की हे नाले साफ करण्याची जबाबदारी असलेल्या मुंबई महापालिकेत आज युतीचं राज्य आहे. तर राजधानीच्या या शहरातून राज्य चालवण्याची जबाबदारी आघाडी सरकारवर आहे ! शिवाय, या राज्य सरकारच्याच अखत्यारीतल्या 'एमएमआरडीए'च्या अधिपत्याखालीही या महानगराचा बराच भाग आहे आणि तिथंही पाऊस पडतोच की मग तिथलं पाणी तरी थेट समुद्रापर्यंत वाहून जातं का? की तिथल्याही नाल्यांमध्ये गाळ साचलाय? -आणि हो! शिवाय या महानगराच्या खऱ्याखुऱ्या वाहिन्या असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेचं काय? तिथं तर जेमतेम घोट्याएवढं पाणी साठलं, तरी गाड्या बंद पडणार आणि ही तुफानी बोंबाबोंब होणार...

त्यामुळेच आज सावधगिरीचा उपाय म्हणून राज्यातल्या बहुतेक राजकीय पक्षांनी, मुंबईतल्या या विविध यंत्रणांनी आणि तिथल्या तिथल्या बड्या अधिकाऱ्यांनी मुंबईत यंदाही पाणी तुंबू शकतं... त्यास आम्ही कसे जबाबदार नाही... शिवाय या महानगराची भौगोलिक रचनाच अशी आहे की लालबाग - परळ आणि मीलन सब-वे इथं पाणी तुंबणारच... अशी डिफेन्सिव्ह बॅटिंग सुरु केलीय. शिवाय, मीडियानंही कचऱ्यानं ओथंबून वाहणाऱ्या नाल्यांची भली मोठी जंगी छायाचित्रं छापून आपली जबाबादारी चोख बजावलीय.

पण त्यामुळेच एका अत्यंत महत्त्वाच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे साऱ्यांचंच दुर्लक्ष झालंय. खरं तर त्याकडे जाणीवपूर्व कानाडोळा केला जातोय. मुंबईतल्या या नाल्यांमध्ये, मिठी नदीमध्ये आणि जुन्या मुंबईतल्या हाऊसगल्ल्यांमध्ये हा एवढा कचरा रोजच्या रोज जमा कसा होतोय ? तो तिथं काय मुख्यमंत्री आणून टाकताहेत की अन्य नेते ? आणि मग मध्य रेल्वेनं प्लास्टिक बंदी कठारेपणे अमलात आणण्याचा निर्णय घेतल्यावर त्याविरोधात प्रचंड आरडाओरड करणारे तरी कोण आहेत ?

या प्रश्नाचं उत्तर खरं तर सूर्यप्रकाशाएवढं स्पष्ट आहे. मुंबईतल्याच नव्हे तर राज्यभरातल्या नाल्यात आपल्या घरातला कचरा आणि नको असलेल्या अनेक बाबी आणून टाकणारे प्रकाश अकोलकर गल्लोगल्ली तयार होत आहेत. मुंबईतल्या रेल्वे लायनीवरही हेच प्रकाश अकोलकर, खुशाल पानपरागचे पाऊच, लेज आणि हळदीरामच्या पिशव्या बिनदिक्कत टाकतायेत. पिढ्यानपिढ्या हेच प्रकाश अकोलकर वांद्रे स्थानकातनं लोकल सुटली की आपल्या घरातलं निर्माल्य मिठी नदीत मोठ्या श्रध्देनं टाकताहेत. धारावीतल्या प्रकाश अकोलकरांनी टाकलेल्या उदंड कचऱ्याबरोबरच या घरोघरच्या निर्माल्यानं मिठी नदी भरुन गेलीय...
-
तेव्हा हे परमेश्वरा ! यंदाच्या पावसाळ्यात तूच आमचं रक्षण कर...

  • प्रकाश अकोलकर
    akolkar.prakash@gmail.com
  • No comments:

    Post a Comment