Wednesday, June 27, 2012

शिस्त व संयमाचे दर्शन

मुंबईतील मंत्रालय म्हणजे महाराष्ट्राचे सत्ता केंद्र.. तसेच देशाची आर्थिक राजधानी... पण मंत्रालयात गुरुवारी आगीची मोठी दुर्घटना घडली अन् साऱ्या जगाचे लक्ष त्याकडे लागले. परंतु मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या धैर्य, संयम आणि समयसुचकता व एकमेकांना सांभाळून घेण्याच्या वृत्तीने या आगीमध्ये कोणतीही मोठी जीवित हानी झाली नाही. मंत्रालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातून हे वारंवार जाणवत तर होतेच.. त्याचबरोबर या संकटातून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेण्याची जिद्दही दिसून आली.

आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महान्यूज टीमने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळेस पोलीसांनी दाखविलेल्या समयसूचकतेचे कौतुक आणि सहकाऱ्यांच्या शिस्तीचे दर्शन घडल्याचे प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवले.

पोलीसांच्या समयसूचकतेला सॅल्यूट


आगीच्या वेळेस मंत्रालयातील पोलीसांनी केलेल्या कामाला माझा सॅल्यूट असे सांगून मंत्रालयात विद्युत विभागात काम करणारे शाखा अभियंता महेंद्रकुमार नेमा म्हणाले की, मंत्रालयात आग लागल्यानंतर सर्वप्रथम पोलीसांनीच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वांना बाहेर काढण्याचे काम केले. वरच्या तीनही मजल्यावर पोलीस उपस्थित होते. त्यांच्यामुळेच अनेकजण सुखरुपपणे बाहेर पडले. आग लागल्याचे कळाल्यानंतर मी तातडीने आजूबाजूला पाहिले व प्रथम धावत जावून विजेचे कनेक्शन बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळसही पोलीसांनी तातडीने मला मदत करून स्विच बंद केले. खरे तर त्यांच्यामुळेच मोठी हानी टळली असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

या घटनेबद्दल सांगताना मुख्य सचिवांच्या पाचव्या मजल्यावरील कार्यालयात काम करणारे चोपदार दत्तात्रय गवळी व शिपाई विलास खाडे यांच्या डोळ्यासमोर ती घटना तरळून गेली. ते म्हणाले की, पावणे तीनच्या सुमारास खालच्या चौथ्या मजल्यावरून धूर येणास सुरूवात झाली. आम्ही कार्यालयातच होतो. स्वत: मुख्य सचिवसाहेबही कार्यालयात उपस्थित होते. धूर येत असल्याचे बघून आम्ही कार्यालयातील इतरांनाही त्याबद्दल सांगितले अन् धुराच्या दुसऱ्या विरुद्ध दिशेने धावू लागलो. या दरम्यान मुख्य सचिव साहेबांना दुर्घटनेची जाणीव झाली व तेही कार्यालयातून बाहेर पडले अन् आजूबाजूच्या कार्यालयातील लोकांना स्वतः बाहेर पडण्यास सांगत होते. आम्हीही लोकांना बाहेर पडण्यास सांगितले. वेळेवर सगळ्यांना सांगितल्याने त्या मजल्यावरील बहुतेकजण आग वाढण्याच्या आधीच मंत्रालयाच्या बाहेर पडले होते.

मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गृहनिर्माण विभागातील कक्ष अधिकारी मोहन आरसेवाड हे त्या वेळेस पाचव्या मजल्यावर एका कामानिमित्त गेले होते. त्यांनाही तेथील पोलीसांनी `अरे आग लागली आहे इथे का बसलात बाहेर पडा` असे रागावून त्यांना बाहेर काढले. श्री. आरसेवाड म्हणाले की, पोलीसांनी एकदा सांगितल्यावर आम्ही दुर्लक्ष केले. परंतु जेव्हा त्यांनी रागावून बाहेर काढले अन् आम्ही समोरचे दृष्य बघितल्यावर मनोमन त्या पोलीसांचे आभार मानले. त्यांनी जर बाहेर काढले नसते तर काय झाले असते ते सांगता येत नाही.

तिसऱ्या मजल्यावर विधी व न्याय विभागातील अवर सचिव वसुधा पत्की याही कामात व्यस्त होत्या. त्यावेळेस त्यांना त्यांचे सहकारी विवेक कांबळे यांनी मंत्रालयाला आग लागल्याचे सांगून बाहेर पडण्यास सांगितले. त्या म्हणाल्या की, आग लागल्याचे समजल्यावर काय झाले ते बघण्यासाठी कक्षातून बाहेर पडले तर बाजूच्या जिन्यातून धूर येत होता. जवळ जाऊन पाहावे म्हणून गेले तर तेथील पोलीसांनी लगेच तेथून खाली जाण्यास सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही बाहेर पडलो तर त्या मजल्यावर इतरही सहकारी गडबडीने बाहेर पडत होते. संपूर्ण तिसरा मजला रिकामा झाला तरी तेथील पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य नीट बजावित होते. सर्वजण बाहेर पडल्यानंतर ते पोलीस खाली आले.

यंत्रणा असूनही प्रचंड धुरामुळे मालमत्तेचे नुकसान वाचवू शकलो नाही अशी खंत सार्वजनिक बांधकाम विभागातील मेशन भारत पालवी यांनी व्यक्त केली. मालमत्ता वाचवू शकलो नाही तरी लोकांना तातडीने बाहेर पडण्यास सांगून मोठ्या प्रमाणात होणारी जिवित हानी कमी करू शकलो याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

आठशे खिडक्या... नऊशे दारे...


खरे तर मंत्रालयाला मोठ्या प्रमाणात आग लागली. त्या आगीत पाच जण मृत्युमुखी पडले, हे वाईटच झाले. तरी केवळ मंत्रालयाच्या रचनेमुळे मोठ्या प्रमाणात होणारी जिवित हानी टळल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मंत्रालयाच्या इमारतीला सर्व बाजूनी मोठ्या आकारातील जिने आहेत. तसेच दरवाजे व खिडक्याही मोठ्या प्रमाणात आहेत. आग लागल्यानंतर मुख्य इमारतीतील सहाही मजल्यावरील सुमारे चार ते पाच हजार लोक हे वेगवेगळ्या जिन्यांनी एकाच वेळेस बाहेर पडत होते. जिने रुंद असल्यामुळे कोणतीही चेंगरा चेंगरी न होता एवढ्या प्रमाणात लोकांना बाहेर पडता आले. जुन्या इमारतीच्या या रचनेमुळे आगीत अथवा धुरामध्ये लोक अडकण्याचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण अनेक कर्मचाऱ्यांनी आवर्जून नोंदविले. मंत्रालयाच्या या रचनेमुळे येथील कर्मचारी नेहमी मंत्रालयाचा उल्लेख आठशे खिडक्या.. नऊशे दारे.. असा करतात. हे विश्लेषण सार्थ असल्याचे या दुर्घटनेतून दिसून आले.

जिन्याच्या रुंदपणामुळेच अनेकांची सुटका झाल्याचे नमूद करून पाचव्या मजल्यावरील पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागातील सहायक रजनी रेणुसे म्हणाल्या, आग लागल्यानंतर सर्वच मजल्यावरील कर्मचारी एकाच वेळेस जिन्याने बाहेर पडत होते. कोणतीही धक्काबुक्की अथवा गर्दी न होता लोक एकमेकांना सहकार्य करत बाहेर पडत होते. त्या सर्वांना पोलीसांनी मार्गदर्शन केले. जिने रुंद असल्यामुळे एकाच वेळेस सर्वांना बाहेर पडता आले. या घटनेबद्दल सांगताना श्रीमती रेणुसे म्हणाल्या की, दुपारी काम सुरू असतानाच आमच्या कक्षाबाजूकडील फायर अलार्म वाजू लागला. काय झाले ते पहायला बाहेर आले तर धूर येत असल्याचे दिसले. त्याच वेळेस सामान्य प्रशासन विभागातील एक महिला कर्मचारी धुराच्या दिशेकडून धावत आमच्या दिशेने आल्या अन् आमच्या समोर येऊन बेशुद्ध झाल्या. त्यांना तात्काळ पाणी देऊन शुद्धीवर आणले आणि या घटनेचे गांभीर्य लक्षात येताच त्यांच्यासह कार्यालयातील सर्वजणांना सांगून लगेच बाहेर पडलो.

आग लागल्यानंतर मंत्रालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी धैर्य दाखवून पोलीसांना सहकार्य केल्यामुळे कोणतीही चेंगरा चेंगरी झाली नाही. अशा प्रसंगी चेंगराचेंगरी होऊ शकते. पण कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या संयमामुळे पोलीसांचे काम सोपे झाले व सर्व लोकांना बाहेर काढण्यास मदत झाली, अशी प्रतिक्रिया मंत्रालयातील महिला पोलीस शिपायांनी दिली.

पुन्हा नव्या जोमाने सुरूवात..


मंत्रालय ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. या दुर्घटनेमुळे संकट आले असले तरी आम्ही परत नव्या जोमाने अवघ्या तीन दिवसात कामाला सुरूवात केली आहे. कसलेही संकट आले तरी डगमगून न जाता आम्ही काम सुरू केले आहे. अडचणी आहेतच, परंतु त्यातूनही आम्ही मार्ग काढत आहोत. परत पहिल्याप्रमाणे काम सुरू होईल असा दुर्दम्य विश्वास श्रीमती पत्की आणि श्रीमती रेणुसे यांनी व्यक्त केला.

सर्वच कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातून या दुर्घटनेचे शल्य असले तरी या संकटाला तोंड देण्याचा आत्मविश्वास व्यक्त होत होता. त्यांच्या कामातूनही ते दिसून येत होते. कर्मचाऱ्यांच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि त्यांच्यातील शिस्त, संयमाला सलाम...

  • शब्दांकन - नंदकुमार वाघमारे

  • No comments:

    Post a Comment