Friday, June 15, 2012

पॉवर टिलरमुळे साधली प्रगती

शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन शेतीच्या माध्यमातून आर्थिक विकास साधण्याची किमया सातारा तालुक्यातील आरे या गावचे शेतकरी संतोष भिसे यांनी करून दाखविली आहे. त्यांनी वडिलोपार्जित तीन एकर शेतीचा शासन योजनांचा लाभ घेऊन खऱ्या अर्थाने विकास घडविला आहे. दोन वर्षांपूर्वी पडिक असणाऱ्या त्यांच्या शेतीमध्ये जवाहर योजनेअंतर्गत विहीर घेऊन पाण्याची सोय झाली. पाण्यापाठोपाठ त्यांनी शेती मशागतीसाठी सामाजिक न्याय विभागाकडून पॉवर टिलर मिळविले आणि खऱ्या अर्थाने आधुनिक शेतीचे नवे पर्व निर्माण झाले.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी अनेकविध योजना राबविल्या जात आहेत. यापैकी पॉवर टिलर ही योजना शंभर टक्के अनुदानातून राबविली जाते. सातारा जिल्ह्यात गतवर्षी १०४ लाभार्थींना लॉटरी पद्धतीने पॉवर टिलर देण्यात आले. बहुतांशी शेतकऱ्यांच्या जीवनात पॉवर टिलर योजनेमुळे आर्थिक परिवर्तनाचा नवा मार्ग सापडल्याचे दिसून येत आहे. याच योजनेचे आरे गावचे शेतकरी संतोष भिसे हे ही एक यशस्वी लाभार्थी आहेत.

भिसे यांनी आपल्या शेतीविषयक प्रगतीबाबत बोलताना सांगितले, वडिलोपार्जित तीन एकर जिरायत शेती होती. या शेतीमध्ये कोणतेही उत्पादन होत नव्हते, या जमिनीकडे केवळ पडिक जमीन म्हणून पाहिले जात असे. जमीन असून नसल्यासारखी अवस्था होती. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरीसाठी जावे लागत होते. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेती विकासाच्या शासन योजनांचा लाभ घेण्याचा संकल्प करून कृषी विभाग तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची मी मदत घेतली.

संतोष भिसे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी आपल्या शेतात जवाहर विहीर घेतली. या विहिरीस पाणीही चांगले लागले. शेतात पाणी उपलब्ध झाल्याने भिसे कुटुंबियांनी शेतीतून पैसे देणारी नगदी पिके घेण्यास प्रारंभ केला. मात्र पडिक जमीन असल्याने शेती मशागतीस त्यांना मर्यादा पडल्या. पडिक शेतीचा विकास करण्यासाठी त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेतून पॉवर टिलर घेतला. या पॉवर टिलरच्या माध्यमातून पडिक जमिनीचा विकास करून उत्तम प्रकारे मशागत केली. या पॉवर टिलरला भिसे यांनी १४ हजार रुपये खर्चून आधुनिक पेरणी यंत्र बसविले. पॉवर टिलरने मशागत केलेल्या शेतीत पेरणीसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत आवश्यक अवजारे तसेच बियाणे मिळविली.

स्वत:ची शेती विकसित करण्याबरोबरच इतरांच्या शेतांची मशागत आणि पेरणी करून आर्थिक उत्पन्नाचे मोठे साधन त्यांनी निर्माण केले आहे. पूर्वी इतरांच्या शेतावर मोलमजुरी करून दररोज सव्वाशे रुपये मिळविणारे भिसे पॉवर टिलरच्या साहाय्याने आधुनिक शेतीचा मंत्र जोपासून स्वत:सह इतरांच्या शेताची मशागत आणि पेरणी करीत आहेत. ते दिवसाला तीन एकर क्षेत्राची पेरणी करत असून त्यासाठी त्यांना मोबदलाही मिळत आहे.

पॉवर टिलरमुळे शेतीतील मशागत करणे सोयीचे झाले आहे. शासनाच्या योजनांमुळे आज संतोष भिसे यांच्या शेतात हायब्रिड ज्चारी, सोयाबीन, भुईमूग याबरोबरच भोपळा, मिरची आदी पिके जोमाने डौलत आहेत. शासनाची मदत लाभल्याने मग पत्नी छाया, आई ताराबाई आणि स्वत: संतोष यांनी शेतीच्या विकासासाठी जिद्दीने अपार कष्ट उचलले, आणि संधीचे सोने केले.

भिसे आणि त्यांच्या कुटुंबियांनी जिद्द आणि मेहनतीने पडिक असलेल्या जमिनीसाठीच्या शासनाच्या योजनेच्या माध्यमातून नगदी पिके घेऊन आर्थिक परिवर्तनाची नवी दिशा मिळविली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत गतवर्षी घेण्यात आलेल्या सोयाबीन पिकाच्या स्पर्धेमध्ये संतोष भिसे यांना सोयाबीन उत्पादनासाठीचे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. सेंद्रिय शेतीमध्येही त्यांनी क्रांती घडविली असून सेंद्रिय भोपाळ्याचे उत्पादन घेतले आहे. निसर्ग प्रदर्शनात त्यांनी उत्पादित केलेला १५ किलोचा भोपळा ठेवला, त्याचे कौतुक झाले.

एकंदरीत संतोष भिसे यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रगतशील शेतकरी बनण्याची चालविलेली धडपड खरोखरच कौतुकाची आणि प्रेरणादायी आहे.

No comments:

Post a Comment