Monday, June 25, 2012

सेंद्रीय शेतीची नवलाई… कमी खर्च मोठी कमाई !

आपल्या शेतात व परिसरात कचरा म्हणून जे-जे फेकले जाते त्या कचऱ्यातून खत निर्मिती करता येते. या सेंद्रीय खताद्वारे शेतीला नवसंजीवनी देता येते हे सिद्ध केले आहे बीड जिल्ह्यातील लोळदगावचे तरुण, जिद्दी शेतकरी शिवराम घोडके यांनी. या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाने 'कृषी भूषण सेंद्रीय शेती' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यानिमित्त त्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

श्री.घोडके यांना 'कृषी भूषण सेंद्रीय शेती' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रथमत: त्यांचे अभिनंदन करुन त्यांना अगदी साधा प्रश्न केला, आपलं कुटुंब व शिक्षणाविषयी काय सांगाल ?

आमचे कुटुंब तसे एकत्र पद्धतीने गुण्या-गोविंदाने नांदणारे. मी बीएसस्सी ॲग्रीची पदवी घेतल्यानंतर मला न्युझीलंडच्या एका नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची संधी प्राप्त झाली होती. परंतु ती मी नाकारली. कारण मला इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करुन दाखविण्याची इच्छा होती. वाढता खर्च, कमी उत्पादनामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत आहे. त्यामुळे या गरीब शेतकऱ्यांची सेवा करावी हीच माझी इच्छा असून या सर्व शेतकरी बांधवांना मी माझे कुटुंबीय मानतो.

नोकरी न करता या क्षेत्राकडे का वळलात ? असा प्रश्न विचारला असता क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, रासायनिक खताचे जमिनीवर होणारे दुष्परिणाम आणि मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते दिलेल्या धान्यापासून मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची मला माहिती होत गेली. त्याच वेळी शेतीत होणारे बदल सूक्ष्मपणे टिपण्याची मला सवय लागली. गेल्या १५-२० वर्षात आपली शेती किती बदलली हे पाहत असताना, शेतजमिनीचे झालेले नुकसान लक्षात आले. रासायनिक शेतजमिनीच्या पोतावरच परिणाम झाला असे नाही तर, जमिनीचा कस दिवसेंदिवस कमी होत असल्याचे लक्षात आले. ट्रायकोडर्मासारखे बॅक्टेरिया शेतीतून हद्दपार होत आहेत आणि कीटकनाशकांमुळे मित्रकिड देखील संपुष्टात येत असल्याचे भीषण चित्र पाहून मला विचार करावयास भाग पडले. खऱ्या अर्थाने शेतीमध्ये बदल करावयाचे असतील तर सेंद्रीय व जैविक शेतीशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आले. त्यातून पहिला प्रयोग २००३-०४ या वर्षात मी स्वत:च्या शेतात कापूस, गहू व उसासाठी केला.

२००५ मध्ये मी ही पिके १०० टक्के सेंद्रीय खतावर घेणे सुरू केले. याचा परिणाम उत्साह वाढविण्यात झाला. उत्पादनाचा खर्च कमी होत असताना शेतीचे उत्पन्न वाढले. म्हणजेच 'कमी खर्च व मोठी कमाई, हीच सेंद्रीय शेतीची नवलाई' असे म्हणावे लागेल आणि सेंद्रीय शेतीचा हा विषय आपल्याबरोबरच साऱ्या परिसरात रुजला पाहिजे यासाठी काम सुरू केले. बायोडायनॅमीक डेपो तयार करण्यासाठी लागणारे सीपीपी (कामधेनु-सिद्धी ३) हे मी स्वत: तयार करुन बळीराजा कृषी विज्ञान मंडळामार्फत शेतकऱ्यांना पुरवितो. याची माहिती आता राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील शेतकऱ्यांनाही झाली आहे. गेल्या ५-६ वर्षात परिसरात व राज्यात तब्बल २०-२५ हजार बायोडायनामिक डेपो उभारले गेले आहेत व त्याचा फायदाही चांगला होत आहे. त्यामुळे मी नोकरी न करण्याचा निर्णय पक्का केला.

या सेंद्रीय खत प्रकल्पाबाबत आपला भविष्यातील कार्यक्रम काय असेल? या प्रश्नावर आपल्या शेतावर नजर टाकून ते परत बोलावयास लागले. आमच्या या सेंद्रीय खत डेपोला दररोज विविध भागातील किमान ५० ते १०० लोक भेट देतात. यामध्ये सामान्य शेतकऱ्यापासून अनेक मान्यवरांचाही समावेश आहे. आजपर्यंत जवळपास दीड लाख शेतकऱ्यांनी सेंद्रीय खत बनविण्याचे मार्गदर्शन घेतले आहे.

न्युझिलंड, स्वित्झर्लंड, जर्मनी येथील अनेक संशोधक येथे येऊन गेले आहेत. भविष्यात कृषी डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी देऊन दरमहा २० हजार रुपये पगार देण्याचा संकल्प करून ते म्हणाले, हे खत मिळविण्यासाठी कोठे रांगा लावाव्या लागत नाहीत. सेंद्रीय खत म्हणजे काळ्या आईचं निरसं दूध. आपल्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या डोलणाऱ्या पिकाला ताकद देणारे. त्यामुळे सेंद्रीय शेतीला भविष्यकाळ उज्ज्वल आहे. परंतु त्यासाठी गरज आहे ती या कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार होण्याची...

  • राजू धोत्रे, प्र. जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, बीड
  • No comments:

    Post a Comment