Saturday, June 16, 2012

अपंगत्वावर मात करीत निर्माण केला जीवनात प्रकाश

वयाच्या तिसऱ्या वर्षी पोलिओच्या आजाराने दोन्ही पाय हिरावून घेतले आणि अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर मधील सत्यनारायणची जीवनाशी झुंज सुरू झाली. केवळ पायावरच नव्हे तर काही दिवसात त्यांच्या उर्वरित शरीरावरसुद्धा अपंगत्व आले. असे असले तरी नियतीने मात्र त्यांचे दोन्ही हात शाबूत ठेवले होते. या दोन्ही हाताच्या भरवशावर त्यांनी जीवनाचा द्रोणागिरी उचलला. आपल्या अपंगत्वाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघून संघर्ष सुरू ठेवला. आज सत्यनारायण संगणक चालक म्हणून यशस्वी भूमिका बजावत आहे.

सत्यनारायण प्रेमनारायण दीक्षित या ३३ वर्षाच्या युवकाचे अचलपूर शहरातील बुंदेलपूर भागात वास्तव्य आहे. सत्यनारायण यांचे वडील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत.

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अपंगत्व आल्यानंतर सत्यनारायण यांनी जीवनातील खडतरता अनुभवली. सुखापेक्षा दु:खाचेच क्षण वाट्याला जास्त आले. अपंगत्वामुळे शिक्षणामध्ये अडसर येऊ लागला, परंतु इतर मुलांच्या हातातली पाटी लेखन सत्यनारायण यांनाही स्वस्थ बसू देत नसे. आपणही शिकलेच पाहिजे, अशी जिद्द त्यांच्या मनात बालपणातच निर्माण झाली. बालपणी आई-वडील किंवा बहिणींच्या कडेवर जाऊन सत्यनारायणने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. दहावी पर्यंत त्यांच्या वडिलांनी १०० रुपये प्रति महिना याप्रमाणे एका इसमाला कामावर ठेवले आणि त्याच्यावर सत्यनारायणच्या शाळेची जबाबदारी सोपविली. ११ वी १२ वी मध्ये असताना त्याच्या लहान भावाने सायकलच्या आधारे त्याची प्रवासाची अडचण दूर केली. १२ वी पास झाल्यानंतर सत्यनारायण यांनी जगदंब महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि अशाच पद्धतीने ५४ टक्के गुण घेऊन बीएची पदवी प्राप्त केली. दरम्यानच्या काळात त्यांनी संगणकाची एमएससीआयटी ही परीक्षाही पास केली.

सत्यनारायण यांच्या जिद्द, झुंज आणि चिकाटीमुळे त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत संगणक चालक म्हणून कार्य करण्यास संधी मिळाली. संचालक व्यास यांनी आपल्या संस्थेत सत्यनारायणला संधी देण्याबाबत प्रस्ताव ठेवला. कुठलेही आढेवेढे न घेता सत्यनारायण यांनी प्रस्तावाला होकार दिला. आज सत्यनारायण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संगणक चालक म्हणून उत्कृष्ट काम करीत असून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभारही लावत आहे.

अपंगांनीच नव्हे तर बेरोजगारीचे तुणतुणे वाजविणाऱ्यांनी सत्यनारायण यांच्यापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे.

  • अनिल गडेकर
  • No comments:

    Post a Comment