Saturday, June 16, 2012

आगोटची बेगमी

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळा जोरदार असतो. गतवर्षी चार हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. सह्याद्रीच्या रांगांमुळे पावसाच्या सरी अक्षरश: कोकणच्या डोंगरदऱ्यांमध्ये कोसळतात. अशावेळी दैनंदिन व्यवहाराला मर्यादा येते. जोरदार पावसात बाहेर फिरणे कठीण होत असल्याने शहरातील बाजारात येण्याचा विषय दूरचाच. म्हणूनच पावसाळ्याच्या चार महिन्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी संसाराला लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव उन्हाळ्याच्या शेवटी करतो. या जीवनावश्यक वस्तूंनाच कोकणातील ग्रामीण भागात 'आगोट' असे म्हणतात.

पावसाळ्यापूर्वी घराची कौले शाकारण्याचे काम सुरू होते. पावसाच्या सरी घरात येऊ नये म्हणून छताच्या पुढच्या बाजूस नारळीच्या पानापासून बनविलेली झापडे लावली जातात. पन्हाळी नीट केली जातात. पावसाळी सरपणासाठी परिसरातील झाडांपासून मिळणारे लाकूड वाळवून ठेवले जाते. घराच्या शेजारीच लाकडांकरिता गवत व पेंड्याने शाकारलेली छोटी खोपटी बांधली जाते आणि त्यामध्ये लाकडे व्यवस्थित रचून ठेवली जातात. मातीच्या चूली नीटपणे रचल्या जातात.

आगोटचा महत्वाचा भाग असतो वाळवण. कुर्डया, पापड आणि शेवयांसोबतच धान्य कडधान्ये वाळविली जातात. यात ज्वारी आणि नाचणीचा प्रामुख्याने समावेश असतो. अलिकडे त्यात गव्हाचीदेखील भर पडली आहे. अन्न साठविण्यासाठी स्वतंत्र कणगी असते. साठवण्याच्या ठिकाणी ओलावा राहणार नाही याची काळजी घेतली जाते.

सारभाताचा बेत कोकणातील घराघरात असतो. सारासाठी कोकमचा उपयोग करण्यात येतो. याशिवाय कोकमाचा वापर प्रामुख्याने मासळीचे पदार्थ बनविताना केला जातो. कोकम साठविण्यापूर्वी त्याला वाळविण्याची पद्धत काहीशी क्लिष्ट असते. कोकमाचे बी काढून उर्वरीत फळाचा रस काढला जातो. त्या रसात वरचे साल धुतले जाते. नंतर त्याला वाळवतात. अशी प्रक्रिया सहा ते सात वेळा करावी लागते. अन्यथा त्यास पावसाळ्यात कीड लागण्याची शक्यता असते. कोकम आणि साखर यांचे एकावर एक थर काचेच्या बरणीत रचतात. बरणीचे तोंड कापडाने बांधून ती उन्हात ठेवली जाते. त्यापासून तयार होणारा रस म्हणजे कोकम सरबत. साखरेचा उपयोग न करता केवळ उन्हात कापडावर कोकम वाळविण्याची पद्धतही उपयोगात आणली जाते.

या बेगमीतील महत्वाचा भाग असतो सुक्या मासोळीची खरेदी. बाजारात न विकली गेलेली ताजी मासोळी उन्हाळ्यात वाळवून ठेवली जाते. बंदराजवळच्या भागात गेल्यावर तोरणाच्या रूपात मासोळी वाळविण्यासाठी लावलेली आढळते. रस्त्याच्या कडेला खराब झालेल्या जाळ्यांच्या खालीदेखील मासोळी वाळविली जाते. जाळ्यांमुळे पक्ष्यांचा त्रास कमी होतो. ही मासोळी आठवडा बाजारात विक्रीसाठी येते. याशिवाय पापलेट, संरमय आदी मोठी मच्छी मीठात खारविली जाते आणि तीही बाजारात विक्रीसाठी येते. ही खारी मच्छी खरेदी करून शेतकरी भात पिकापासून मिळणाऱ्या पेंड्यात बाहेरीची हवा मच्छिला लागणार नाही अशा तऱ्हेने व्यवस्थित बांधून कौलारू घरात माळ्यावर अड्याच्या पोटसराला बांधून ठेवतात आणि गरज पडेल तसा पावसाळ्यात त्याचा जेवणात वापर केला जातो.

रत्नागिरीला शनिवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात वाळलेल्या मासोळीचे जवळा,आंबाडी, सोडे, बोंबिल, बले, दांडी, मांदेली, बांगडा, असे विविध प्रकार मिळतात. सुकी मासोळी खरेदी करण्यासाठी बाजारात मे महिन्यात गर्दी दिसते. १५० ते ८०० रुपये प्रति किलो अशी किंमत असली तरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी खरेदी करीत असतात. या पदार्थांना पाण्याचा थेंब लागला तरी ते खराब होण्याची शक्यता असल्याने त्याची साठवण व्यवस्थितरित्या केली जाते. हे गृहिणीवर्ग खुबीने करतात आणि गडीमाणूस पावसाळ्याच्या सरी कोसळल्यावर निश्चिंतपणे शेताकडे पेरणी, चिखलणी आदी कामांसाठी जातो. वस्तू खरेदीसाठी बाजारात जायची चिंता नसते, पावसाच्या सरीवर सरी कोसळत राहतात, घरत चुलीपाशी घरची लक्ष्मी स्वयंपाकात मग्न असते. दुपारी डोक्यावर डोक्यावर इरलं घेऊन पावसातून वाट काढीत आलेल्या कारभारणीने सोबत आणलेल्या गाठोड्यात मसालेदार कोळींबी आणि तांदळाची भाकरी असणारच याची गड्यालाही खात्री असते. आगोटची बेगमी त्याचसाठी तर असते...!

  • डॉ.किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
  • No comments:

    Post a Comment