Friday, June 15, 2012

सर्वशिक्षा अभियानाने दिली जगण्याची दिशा

घरात अठाराविश्व दारिद्र्य... त्यातच जन्मत: लाभलेले अपंगत्व... दोनही पाय व एक हात निकामी असल्यामुळे जीवनाविषयी आलेली नकारात्मकता... अशा परिस्थितीत जगत असलेल्या प्रकाशला सर्वशिक्षा अभियानातून जगण्याची नवी दिशा मिळाली. अभियानाचे पाठबळ तसेच त्याच्या परिश्रमाच्या जोडीने त्याने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत आपल्या जीवनाचा मार्ग अंधाराकडून प्रकाशाच्या दिशेने नेत जीवनाला नवी दिशा दिली.

यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील मुडाणापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या साधूनगर गावातील भिकू जाधव हे एक सर्वसामान्य नागरिक. ते आपल्या तीन मुली व मुलासह राहतात. सहा मुलांपैकी प्रकाश नावाचा मुलगा अपंगत्व घेऊन जन्माला आला. एक हात आणि दोनही पायाने अपंग असलेल्या प्रकाशचे बालपणच जणू हरविले. गरीब परिस्थितीवर मात करत प्रकाशने कसेबसे चौथीपर्यंत शिक्षण घेतले.

सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून पंचायत समिती स्तरावर अपंग समावेशित शिक्षण महागाव तालुक्यात सुरू आहे. तालुका समन्वयक रमेश वाढोणकर यांना प्रकाशबद्दल माहिती मिळाली. त्यांनी साधूनगर येथे जाऊन प्रकाशची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. प्रकाशला शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून सर्वशिक्षा अभियानातून सातवीच्या परिक्षेला बसविण्यात आले. सातवीच्या परिक्षेत तो उत्तीर्ण झाला. परंतु आठवीमध्ये प्रवेश देण्यास त्याला नकार मिळाला. रमेश वाढोणकर यांच्या विनंतीवरून निजधाम माध्यमिक आश्रमशाळा मुडाणा येथे प्रकाशला प्रवेश मिळाला.

घरापासून दोन किलोमीटर अंतरावर शाळा असल्याने सर्वशिक्षा अभियानातूनच तीनचाकी सायकल प्रकाशला देण्यात आली. शाळेत जाताना त्याचे मित्र दररोज त्याची सायकल ओढून त्याला शाळेत नेत होते. प्रकाशला अभ्यासाबद्दल हळूहळू गोडी निर्माण झाली. हलाखीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्याने तीनचाकी सायकलवर पेप्सी, आईसकांडी विकून पैसे मिळविले. शिक्षक कोंडोबा ठाकरे यांनी त्याला शिक्षणासाठी दत्तक घेतले. दहावीपर्यंतचा त्याचा सर्व खर्च त्यांनी केला.

मुडाणा येथील शाळेत दहावीचा वर्ग दुसऱ्या मजल्यावर भरत होता. २२ पायऱ्या चढण्याची कसरत प्रकाशला करावी लागत होती. प्रकाशची जिद्द पाहून शाळेच्या मुख्याध्यापकांनी वरच्या मजल्यावरील दहावीचा वर्ग तळमजल्यावरील खोलीत आणला. अभ्यासातील चुणूक पाहून शाळेतील शिक्षक भारत खंदारे, श्री.राठोड, श्री.दुधे यांनी त्याला वर्षभर मार्गदर्शन केले. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याची माहिती कळताच प्रकाशसह त्याला वेळोवेळी मदत करणाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

सर्वशिक्षा अभियानामुळे प्रकाशच्या जीवनाचा कायापालट झाला आहे. त्याच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी हास्य असते. अपंगत्वाचे दु:ख तो विसरला असून नव्या जोमाने पुढील शिक्षण घेण्यास तो तयार झाला आहे. प्रकाशच्या पुढील महाविद्यालयीन शिक्षणाची जबाबदारीही सर्वशिक्षा अभियानाचे तालुका समन्वयक रमेश वाढोणकर यांनी घेतली आहे.

जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास मनुष्य प्रतिकूल परिस्थितीवर सुद्धा मात करू शकतो, याचीच प्रचिती प्रकाश आणि त्यांना मदत करणाऱ्यांच्या या उदाहरणावरून दिसून येते. इतरांनाही ते नक्कीच प्रेरणादायी ठरतात यात शंका नाही.

  • जिमाअ, यवतमाळ
  • No comments:

    Post a Comment