Wednesday, August 3, 2011

आदर्श स्वस्त धान्य दुकान

ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांची आर्थिक स्थिती ही जेमतेम असते. दिवसभर राब-राब राबून कष्टाचे दोन पैसे मिळवून कुटुंबाला उदरनिर्वाहात हातभार लावणे व संसाराचा गाडा चालविणे एवढंच त्यांना कळतं. आता मात्र बचतगटामुळे कष्टकरी व असंघटित महिलांच्या जीवनात नवी क्रांतीची पहाट उगवली आहे. ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करण्यास बचतगट प्रभावी ठरले आहे.

भंडारा जिल्हयातील साकोली तालुक्‍यातील सिरेगाव टोला हे ८०० लोकसंख्येचं गांव. गावात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या रमाई सक्षमीकरण योजनेतून दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या २० अनुसूचित जाती जमातीच्या महिलांनी आदिवासी ग्रामविकास महिला बचतगटाची स्थापना केली. साकोली येथील माविमच्या सबला लोकसंचालीत साधन केंद्राच्या व्यवस्थापक सविता तिडके व सहयोगिनी संगीता डोंगरे यांच्या मार्गदर्शनातून व्यवसायाची कास धरण्याचा निश्चय केला. बचतगटाचा उद्योग करण्याचा निश्चय आणि परिश्रम करण्याची तयारी लक्षात घेता माविमने त्यांना उद्योग व्यवसायाबाबत प्रशिक्षण देण्याचे निश्‍चित केले. बचतगटाच्या सदस्यांनी सर्वानुमते अध्यक्षपदी सिंधुताई सपकाळ, सचिवपदी सविता पंधरे यांची निवड केली. 

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या एका शासन निर्णयाव्दारे बचतगटांना स्वस्त धान्य दुकान व केरोसीन परवाने देण्यात येणार असल्याची माहिती या बचतगटातील महिलांना झाली. त्यांनी तहसिल कार्यालय साकोली येथील अन्न पुरवठा विभागातील पुरवठा निरिक्षकाशी चर्चा करुन स्वस्त धान्य दुकान मिळण्यासाठी रितसर अर्ज केला. बचतगटाने आवश्यक ती कागदपत्रे अन्न व नागरी पुरवठा विभागाला सादर करुन स्वस्त धान्य विक्रीचा परवाना मिळविला. महिलांचा या व्यवसायात घेतलेला पुढाकार घेता सानगडी येथील भारतीय स्टेट बँक शाखेनं सन २००८ मध्ये ५० हजार रुपये कर्ज रेशन दुकानासाठी मंजूर केले. 

बचतगटाला रेशन दुकानातून धान्य पुरवठा वितरीत करण्याचे व्यावसायिक कार्याला शुभारंभ झाला. पुरवठा विभागाने रेशन दुकानातून किती कार्डधारकांना किती धान्य विकायचे हे निश्चित करुन दिले. कार्डधारकाला त्याचे धान्य नियमित व ठरवून दिलेल्या भावात नियमित मिळू लागले. बचतगटातील महिलांनी रेशन दुकानाला सुरुवात करुन कुटूंब प्रमुखाच्या अर्थोत्पादनात हातभार लावला.

No comments:

Post a Comment