Wednesday, August 3, 2011

रोहयोने दिली जगण्‍याची नवसंजीवनी

रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त राष्‍ट्रपती प्रतिभा पाटील यांच्‍या हस्‍ते नुकतेच वि. स. पागे यांच्‍या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्‍यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांच्‍या हाताला काम देऊन त्‍यांना जगण्‍याचा आधार देणा-या रोजगार हमी योजनेमुळे नागरिकांच्‍या जीवनात नवी पहाट उगवली आहे. मागेल त्‍याला काम आणि कामाचे दाम या हमीमुळे ग्रामीण भागात ही योजना उपजीविकेचे मुख्‍य साधन बनले आहे. सरकारनेसुध्‍दा या योजनेला प्राधान्‍य देत याअंतर्गत गरीब आणि गरजू कुटुंबांना विविध सवलती दिल्‍या आहेत. याच सवलतींचा आधार घेऊन सेलू तालुक्‍यातील झोडगाव येथील मुक्‍ताबाई घनवटे या महिलेच्‍या कुटुंबियाला नवसंजीवनी मिळाली आहे. 

पतीचा आधार हरवलेला असताना आपल्‍या तीन मुलांना सोबत घेवून मुक्‍ताबाईने संघर्षातून वाट शोधत कुटुंबाचा गाडा चालवायला सुरुवात केली. सामान्‍य कुटुंबातील मुक्‍ताबाईच्‍या पतीचे ४ वर्षांपूर्वी निधन झाले होते. अल्‍पभूधारक मुक्‍ताबाई आपल्‍या तुटपुंज्‍या कोरडवाहू शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्‍या. पती हयात असताना आपल्‍या जमिनीत पाण्‍याचा पाट वाहण्‍यासाठी पती-पत्‍नीची धडपड सुरू होती. त्‍यासाठी त्‍यांनी प्रयत्‍नही केले. मात्र कुटूंब चालवत असताना आर्थिक अडचणीमुळे त्‍यांचे बागायती जमीन करण्‍याचे स्‍वप्‍न अर्धवटच राहिले. मात्र तीच जिद्द उराशी बाळगून शासनाच्‍या रोजगार हमी योजने अंतर्गत मुक्‍ताबाईने आपल्‍या गावालगतच्‍या शेतात विहिर खोदली. खोदलेल्‍या विहिरीला मुबलक पाणी लागले. तुटपुंज्‍या जमिनीत विहिर आणि त्‍यात भरपूर पाणी लागल्‍यामुळे मुक्‍ताबाईच्‍या पतीचे स्‍वप्‍न तर पूर्ण झालेच. एवढेच नाही तर त्‍यांच्‍या जीवनातील उन्‍हाळा यामुळे कायमचा दूर झाला. 

शासनाच्‍या योजना प्रत्‍यक्ष गरजू लोकांपर्यंत पोहचल्‍या तर या योजना राबविण्‍याचा शासनाचा उद्देश सफल होतो. महाराष्‍ट्र राज्‍य ग्रामीण रोजगार हमी योजना त्‍यापैकी एक आहे. सध्‍या या योजनेला शासनाने प्राधान्‍य दिले असून शासन यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मजूरांच्‍या हाताला काम देत ग्रामीण विकासाचीही कामे करण्‍यासाठी या योजनेचा जन्‍म झाला आहे. अनेक ठिकाणी मजूर नसल्‍यामुळे या योजनेचा लाभ घेणे अडचणीचे ठरत असले तरी या योजनेमुळे ग्रामीण भागातील नागिरकांच्‍या जीवनात जगण्‍याची नवी उमेद निर्माण झाली आहे. या योजनेअंतर्गत सेलू तालुक्‍यात ३७ विहिंरीची कामे मंजूर झाली आहेत. त्‍यापैकी झोडगाव येथील मुक्‍ताबाई प्रभाकर घनवटे, गणपत महादेव उमरे, म्‍हाळसापुर येथील बाबासाहेब हारमुडे, राजाभाऊ औटे, मदनराव औटे, उध्‍दवराव औटे, किशनराव जाधव तर आडगाव दराडे येथील प्रल्‍हाद दराडे आदींनी या योजने अंतर्गत घेतलेल्‍या विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच त्‍यांच्‍या विहिरींना भरपूर पाणी लागले आहे. उर्वरित ठिकाणच्‍या विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे.

सुरुवातीला केवळ महाराष्‍ट्रापुरतीच मर्यादीत असलेली ही योजना आता केंद्रशासनाने राष्‍ट्रीय पातळीवर महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने राबवायला सुरुवात केली आहे. विशेष म्‍हणजे नागरिकांच्‍या हाताला काम देणारी ही योजना महाराष्‍ट्र राज्‍याची देण आहे. 

No comments:

Post a Comment