Tuesday, August 30, 2011

यशस्वी उद्योजिका

एकदा मला माझ्या घरच्या कामाकरिता तीन हजार रुपयाची गरज पडली. तेव्हा वार्डातील एका महिलेकडे गेले, तेव्हा तिने मला पैसे दिले पण पाच टक्के व्याजानी, तिच्या जवळील पैसे बचत गटाचे होते तेव्हा कुठे माझ्या लक्षात आल की, बचत गट तयार केला तर आपल्याला बरेच फायदे मिळू शकतात. मी बचत गट तयार करावा हा विचार घेऊन, वार्डातील काही महिलांकडे गेले आणि माझ्या मनामध्ये येणारा विचार त्यांना सांगितला .सर्वांच्यामते आपण सुध्दा आपल्या वार्डात महिला बचत गट तयार करायचा निर्णय घेतला.

आम्ही माविम सहयोगीनींनी वर्षाताईची भेट घेतली. त्यांनी आम्हाला बचत गटाचे फायदे आणि महिला आर्थिक विकास महामंडळ याचे कार्य सांगितले व पटवून दिले. आम्ही महिलांनी त्याच दिवशी म्हणजे १ ऑगस्ट २००८ ला बचत गटाची स्थापना केली, आणि इतर गटाची चौकशी केली. तेव्हा असे लक्षात आले की, महिला फक्त आपसात कर्ज व्यवहार करतात पण बँकेकडून जे कर्ज मिळते त्याचा वेगळा काही फायदा घेत नाही. आम्ही टी.व्ही रेडीओ वरील कार्यक्रम बघायचो, तेव्हा खेड्यातील महिला बचत गटाची शेती, दूध व्यवसाय, पोल्ट्रीफार्म, शेळी व्यवसाय अशी कितीतरी कामे करतात आणि संसाराला मदत करतात.

आम्ही दर महिन्याच्या दोन तारखेला बचत गटाची मिटींग घेत असतो.एका बैठकीच्या वेळी कोणता व्यवसाय सुरु करावा याविषयी आम्हा सदस्यांची चर्चा चालू होती. तेवढ्यात वर्षा या महिलेचा फोन आला त्यांनी आम्हाला सांगितले की, तुमच्या वार्डात उद्योजकता आणि उद्योग कसे करायचे याचे ४ दिवसाचे प्रशिक्षण आहे. तुम्हाला प्रशिक्षणाला यायचे आहे.

आमच्या गटातील ६ महिला प्रशिक्षणाला गेल्या, आम्हाला उद्योग उभारणीतील विविध टप्पे, उद्योगाची निवड, बाजारपेठ पाहणी, शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच महिलांची व्याख्या सांगितली. त्यात म म्हणजे महत्वाची, हि म्हणजे हिम्मतवाली, ला म्हणजे न लाजता सामोर जाणारी ही संपूर्ण माहिती वर्षा आणि धवने यांनी चार दिवसाच्या प्रशिक्षणातुन दिली आणि प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवसापासून आमचा नविन जन्म झाला.

बचतगटाच्या माध्यमातून आपण खुप काही करु शकतो आणि त्याच आठवड्यात आम्ही तीन ते चार महिलांनी मिळून साबुदाना पापड, आलू पापड, मुंग पापड, गव्हाचे पापड, ज्वारीचे पापड अशा प्रकारचे पापड तयार केले. पुन्हा आम्ही वर्षाताईला भेटलो. त्यांनी विक्रीची माहिती दिली. आम्ही आफिस मध्ये गेलो. तिथे राठोड सर, देशमुख मॅडम, कांबळे मॅडम यांनी सुध्दा आम्हास प्रोत्साहन दिले. तयार केलेला माल घरोघरी, दुकानात, कार्यालयात जाऊन विक्री केली. तयार केलेला माल अगदी १५ दिवसात संपला. आम्हाला फार आनंद झाला. पाच हजार रुपये लावून तयार केलेला माल अगदी आठ हजार रुपयाला विकला. त्यातुन गटाला तीन हजार रुपयाचा नफा झाला. आम्हाला खुप आनंद झाला. जो माल ज्या ग्राहकांना दिला ते ग्राहकसुध्दा खुपच आनंदीत झाले.

राठोड सरांनी आम्हाला फोन करुन कळविले की, पुलगांव येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. म्हणून पापडांचा माल तयार करा व प्रदर्शनात विक्रीस ठेवा. अगदी पाच दिवसात आम्ही शंभर किलो पापडांचा माल तयार केला. ६ दिवसांच्या प्रदर्शनामध्ये पंधरा हजार रुपयाचा माल विकला गेला. तिथे आम्हास सात हजार रुपयाचा नफा मिळाला.

सरांनी फोन करुन कळविले की, आता तीन-चार ठिकाणी प्रदर्शन आहेत. त्या करिता तुम्ही तयारीत रहा. माल तयार करण्याकरीता आम्ही बाहेरच्या महिला कामाला लावल्या व सगळया प्रदर्शनांमध्ये सहभागी झालो प्रत्येक व्यक्तींनी मालाची प्रशंसा केली आणि मालाची विक्री वाढली. आम्हाला बँकेकडून ५०,००० रुपयाचे कर्ज मिळाले.

आता आम्ही मशिन घेऊन कामाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला नागपूर वरुन मशिन आणली मशिन व्दारे दाळ, तीखट, मसाले, धनिया, हल्दी, सोजी सगळे साहित्य करु लागलो.

या वर्षी आम्ही पालक वडी, मेथी वडी, लौकी वडी, मसाला वडी, मुंग वडी, उडद वडी, आणखी बरेच पदार्थ तयार करुन दिल्लीला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याच्या प्रदर्शनात सहभागी झालो. तिथे तर मला खरोखरच स्वर्ग बघायला मिळाला. भारतातील सर्व राज्यातील महिला आपआपल्या वस्तुची विक्री करत होत्या. त्यामध्ये माल विकायचा कसा ? त्यांनी बनविलेला मालाचा दर्जा, पॅकिंग इत्यादी त्यांच्या मधील कौशल्य पाहून मन अगदी प्रसन्न झाले.

त्यांच्याशी प्रत्यक्षात चर्चा केली. त्यांनी तयार केलेला मालाचा दर्जा, विक्री कौशल्य, ग्राहकांशी प्रेमाने हसुन अगदी आत्मविश्वासपूर्पक माल कसा विकायचा सगळे शिकायला मिळाले. पुर्ण भारताचे दर्शन त्या ठिकाणी झाले.

पहिल्यांदाच इतका लांबचा प्रवास केला होता. १५ दिवसात दिल्लीला राहिल्यानंतर आम्ही तीन दिवस आगरा, मथुरा, वृंदावन, ताजमहल, संपूर्ण दिल्ली दर्शन केले. घराबाहेर पडल्यानंतर खरी माणसाची किंमत माहिती होते. आणि जगण्याचा नवीन मार्ग सापडतो. दिल्लीला पंचेचाळीस हजार रुपयाचा माल विकला गेला. फक्त ६ दिवसात नंतरचे दिवस मी बाकी महिलांचा माल विकुन दिला. आम्ही महिला घराच्या कधी बाहेर निघू शकलो नाही ते आज सर्व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यामुळे घडू शकले.

दर्शना महिला बचत गटामुळे १५ ते २० महिलांना काम मिळाले. प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिलेला ३ ते ४ हजार रुपयाचा नफा मिळतो आहे. त्यामुळे घरात आणि समाजात सुध्दा मानसन्मान मिळाला आहे.

No comments:

Post a Comment