Sunday, August 28, 2011

मानव विकास मिशन

निकृष्‍ट राहणीमान, मुलभूत सोयींचा अभाव, कुपोषण व निरक्षरता ही दारिद्रयाची प्रमुख लक्षणे आहेत. दारिद्रय निर्मूलन हे नियोजनबद्ध विकासाचे ध्‍येय ठरवून राज्‍य शासन आणि केंद्र सरकारची वाटचाल चालू आहे. मानवाच्‍या तीन सर्वात महत्‍त्‍वाच्‍या आकांक्षा आहेत. दीर्घ व आरोग्‍यपूर्ण जीवन जगणे, ज्ञान प्राप्‍त करणे आणि चांगल्‍या प्रतीचे राहणीमान उपभोगणे या तीन आकांक्षाची परिपूर्ती करण्‍याची प्रक्रिया म्‍हणजे मानव विकास म्‍हणता येईल. मानव विकास निर्देशांक ठरवतांना या तीन बाबींचा विचार केला जातो.

सर्वसाधारणपणे दीर्घायुष्‍य हे जन्‍मवेळच्‍या आयुर्मानात मोजले जाते. शिक्षण हे प्रौढ साक्षरता प्रमाण (१५ वर्षे व त्‍यापेक्षा जास्‍त वयाच्‍या व्‍यक्‍तींचे साक्षरतेचे प्रमाण) व पटावरील एकत्रित नोंदणीची गुणोत्‍तरे यावरुन ठरवतात आणि चांगल्‍या प्रतीचे राहणीमान हे दरडोई स्‍थूल देशांतर्गत उत्‍पन्‍नाच्‍या आधारे मोजण्‍यात येते.

राज्‍यातील १२ अतिमागास जिल्‍ह्यांचा मानव विकास निर्देशांक उंचावण्‍याकरिता सन २००६ मध्‍ये महाराष्‍ट्र मानव विकास मिशनची स्‍थापना करण्‍यात आली होती. सर्वात कमी मानव विकास निर्देशांक असलेल्‍या १२ जिल्ह्यातील २५ तालुक्‍यांत मानव विकास कार्यक्रम राबविण्‍यात आला. लोकांच्‍या शिक्षण, आरोग्‍य, उत्‍पन्‍न वाढ यांत सुधारणा करण्‍यासाठी स्‍थानिक गरजेनुसार एकात्‍मिक प्रयत्‍न या कार्यक्रमाद्वारे करण्‍यात आले. गेल्‍या ४ वर्षात राज्‍य शासनाकडून या कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून २३५ कोटी रुपये खर्च करण्‍यात आले. मानव विकास कार्यक्रमाचे चांगले परिणाम दिसून आल्‍यामुळे मानव विकास ही संकल्‍पना 'जिल्‍हा' या घटकाऐवजी 'तालुका' हा घटक समजून राबविण्‍यात येणार आहे. मानव विकास कार्यक्रमाची व्‍याप्‍ती वाढविल्‍यामुळे राज्‍याच्‍या २२ जिल्‍हयातील १२५ तालुक्‍यांमध्‍ये लाभ पोहोचणार आहे.

मानव विकास कार्यक्रमामधून शिक्षण, आरोग्‍य व बालकल्‍याण आणि उत्‍पन्‍नवाढीच्‍या योजना असा त्रिसूत्री कार्यक्रम ठरविण्‍यात आला आहे.

शिक्षण- 
१)इयत्‍ता १० वी आणि १२ वी मध्‍ये अनुत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांकरिता विशेष शिकवणी वर्ग सुरु करणे २)मोठ्या गावातील माध्‍यमिक शाळात अभ्‍यासिका सुरु करण्‍यासाठी सोलार लाईट व फर्निचर/पुस्‍तके पुरविणे ३)ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इयत्‍ता १२ वी पर्यंत शिक्षण घेणे शक्‍य व्‍हावे या करिता गाव ते शाळा या दरम्‍यान वाहतुकीची सुविधा उपलब्‍ध करुन देणे ४)माध्‍यमिक/उच्‍च माध्‍यमिक शासकीय/अनुदानीत शाळांमध्‍ये प्रयोगशाळांकरिता साहित्‍य पुरविणे ५)तालुक्‍याच्‍या ठिकाणी बालभवन-विज्ञान केंद्र स्‍थापन करणे ६)कस्‍तुरबा गांधी बालिका योजनेची व्‍याप्‍ती इयत्‍ता १० वी पर्यत वाढविणे.

आरोग्‍य व बालकल्‍याण- 
१)तज्ञ महिला डॉक्‍टरकडून गर्भवती महिलांची आरोग्‍य तपासणी करणे तसेच शून्‍य ते ६ महिने वयोगटातील बालकांची व मातांची तपासणी करणे आणि औषधोपचार करणे २)किशोरवयीन मुलींना आरोग्‍यविषयक बाबी व व्‍यवसाय कौशल्‍य विकसित करण्‍याबाबत प्रशिक्षण देणे ३)अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रय रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजूरी देणे.

उत्‍पन्‍नवाढीच्‍या योजना-
१)रेशीम कोष विकसित करण्‍याकरिता किटक संगोपन गृह बांधणे २)फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा सुरु करणे ३)ग्रामीण भागातील युवकांना स्‍वयंरोजगाराकरिता व्‍यवसाय कौशल्‍याचे प्रशिक्षण देणे ४)स्‍वयंसहायता बचत गटाच्‍या माध्‍यमातून परसबाग/किचन गार्डन योजना राबविणे आदींचा समावेश आहे.

मानव विकास कार्यक्रमामध्‍ये ठाणे जिल्‍ह्यातील जव्‍हार, विक्रमगड, तलासरी, डहाणू, मोखाडा, वाडा, मुरबाड, शहापूर, रायगड जिल्‍ह्यातील सुधागड, सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील वैभववाडी, नाशिक जिल्‍ह्यातील सुरगणा, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, इगतपुरी, कळवण, दिंडोरी, बागलाण, नांदगाव, धुळे जिल्‍ह्यातील शिरपूर, साक्री, धुळे, सिंदखेडा, नंदूरबार जिल्‍ह्यातील अक्‍कलकुआ, अक्राणी, तळोदा, नवापूर, नंदूरबार, शहादा, जळगाव जिल्‍ह्यातील चाळीसगाव, चोपडा, जामनेर, बोदवड, मुक्‍ताईनगर, अंमळनेर, एरंडोल, जालना जिल्‍ह्यातील परतूर, बदनापूर, जालना, घनसावंगी, अंबड, भोकरदन, मंठा, जाफ्राबाद, परभणी जिल्‍हयातील मानवत, सेलू, पाथरी, जिंतूर, परभणी, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, पालम, हिंगोली जिल्‍ह्यातील हिंगोली, सेनगाव, औंढा-नागनाथ, बीड जिल्‍हयातील वडवणी, नांदेड जिल्‍ह्यातील उमरी, धर्माबाद, हिमायतनगर, बिलोली, मुदखेड, किनवट, देगलूर, लोहा, भोकर, बुलढाणा जिल्‍ह्यातील लोणार, सिंदखेडराजा, जळगाव जामोद, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, संग्रामपूर, अकोला जिल्‍ह्यातील पातूर, वाशिम जिल्‍ह्यातील मालेगाव, रिसोड, मानोरा, वाशिम, अमरावती जिल्‍ह्यातील चिखलदरा, धारणी, यवतमाळ जिल्‍ह्यातील पुसद, झरी जामणी, उमरखेड, आर्णी, महागाव, घाटंजी, केळापूर, मारेगाव, कळंब, नागपूर जिल्‍ह्यातील काटोल, रामटेक, भंडारा जिल्‍ह्यातील लाखांदूर, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, गोंदिया जिल्‍ह्यातील सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी, गोरेगाव, गोंदिया, अर्जुनी-मोरगाव, तिरोडा, आमगाव, चंद्रपूर जिल्‍ह्यातील जिवती, सावली, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, मूल, नागभीड, शिंदेवाही, वरोरा, ब्रम्‍हपुरी, चिमूर, राजूरा, गडचिरोली जिल्‍ह्यातील भामरागड, सिरोंचा, अहेरी, गडचिरोली, कोरची, धानोरा, कुरखेडा, एटापल्‍ली, मूलचेरा, चामोर्शी व आरमोरी या तालुक्‍यांची निवड करण्‍यात आली आहे.

या तालुक्‍यांची निवड करताना सन २००१ च्‍या जनगणनेनुसार तालुक्‍यातील स्‍त्री साक्षरतेचे प्रमाण व सन २००२ च्‍या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबाचे प्रमाण हे दोन निकष विचारात घेण्‍यात आले. निवडण्‍यात आलेल्‍या तालुक्‍यांची निवड एका वर्षाकरिता आहे.

मानव विकास कार्यक्रमाच्‍या अंमलबजावणीनंतर मानव विकास निर्देशांकाची निश्‍चिती यशवतंराव चव्‍हाण विकास प्रशासन प्रबोधनी म्‍हणजेच यशदा या संस्‍थेकडून करण्‍यात येईल. या संस्‍थेचा अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर तालुक्‍यांच्‍या निवडीत यथेचित सुधारणा करण्‍यात येईल.

मानव विकास मिशन कार्यक्रमाचे 'कार्याध्‍यक्ष' या पदनामास 'आयुक्‍त, मानव विकास' असे संबोधण्‍यात येईल. सध्‍याच्‍या मानव विकास कार्यालयातील पदांची पुनर्रचना करण्‍यात आली आहे.

मानव विकास निर्देशांकाची उद्दिष्‍टे साध्‍य करण्‍यासाठी शासनाने निश्‍चित केलेल्‍या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्‍यासाठी सनियंत्रण करणे, राष्‍ट्रीय तसेच आंतर्राष्‍ट्रीय पातळीवर काम करणा-या संस्‍थांच्‍या सहकार्याने मानव विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे, मानव विकास निर्देशांकाशी निगडित सर्व प्रकारच्‍या केंद्र व राज्‍य शासनाच्‍या कार्यक्रमाची अंमलबजावणी मानव विकास निर्देशांक सुधारण्‍यासाठी निवडण्‍यात आलेल्‍या तालुक्‍यात प्राथम्‍याने करणे व अशा प्रकारची अंमलबजावणी केली जात नसेल तर संबंधित विभागास निर्देश देणे याबाबत आयुक्‍त, मानव विकास यांना अधिकार देण्‍यात आले आहेत.

मानव विकास मुख्‍यालयाचा पत्‍ता पुढीलप्रमाणे आहे- 
आयुक्‍त, मानव विकास आयुक्‍तालय, विकास भवन, पहिला मजला, अदालत रोड, बाबा पेट्रोल पंपाजवळ, औरंगाबाद- ४३१००१, दूरध्‍वनी (०२४०) २३५६११२, फॅक्‍स- २३५६११३

जिल्‍हा प्रशासन- 
कार्यक्रमाची अंमलबजावणी व सनियंत्रण करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी हे 'नियंत्रक' अधिकारी म्‍हणून काम पाहतील.

कामाची अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी जिल्‍हास्‍तरीय पुढीलप्रमाणे राहील-
जिल्‍हाधिकारी-अध्‍यक्ष, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद- सह अध्‍यक्ष, संबंधित विभागांचे जिल्‍हा प्रमुख- सदस्‍य, जिल्‍हा परिषदे अंतर्गत जिल्‍हा परिषदेने नामनियुक्‍त केलेला एक सभापती-सदस्‍य, एक अशासकीय सेवाभावी संस्‍था-सदस्‍य, अग्रणी बँकेचे अधिकारी- सदस्‍य तर जिल्‍हा नियोजन अधिकारी हे सदस्‍य सचिव असतील.

तालुका प्रशासन- 
तालुका स्‍तरावर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील.

कार्यक्रमाची अंमलबजावणी व संनियत्रणासाठी तालुकास्‍तरीय समिती पुढीलप्रमाणे राहील- गट विकास अधिकारी-अध्‍यक्ष, तहसिलदार किंवा तहसिलदारांनी नामनिर्देशित केलेला नायब तहसिलदार- निमंत्रित सदस्‍य, बालविकास प्रकल्‍प अधिकारी-सदस्‍य, गट शिक्षणाधिकारी-सदस्‍य, तालुका आरोग्‍य अधिकारी- सदस्‍य, एक अशासकीय सेवाभावी संस्‍था- सदस्‍य, पंचायत समितीने नामनियुक्‍त केलेला एक सभासद- सदस्‍य तर विस्‍तार अधिकारी (पंचायत) हे सदस्‍य सचिव असतील.

गट विकास अधिकारी स्‍तरावर कार्यक्रमाची अंमलबजावणी व सनियंत्रण करण्‍याकरिता व्‍यवसायिक तज्ञांची आवश्‍यकता विचारात घेता, मागास क्षेत्र अनुदान निधीच्‍या धर्तीवर कंत्राटी पध्‍दतीने, वैयक्‍तिक निवडीद्वारे अथवा व्‍यवसायिक संस्‍थांमार्फत आऊटसोर्सिंग पध्‍दतीने सेवा उपलब्‍ध करुन घेता येतील.

मानव विकास कार्यक्रमाची योग्‍य पध्‍दतीने आणि काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्‍यास तालुक्‍यांचा मानव निर्देशांक निश्‍चितपणे सुधारेल, अशी आशा आहे.

No comments:

Post a Comment