Friday, August 5, 2011

कोल्‍हावाडी येथील रोपवाटिकेत ८० हजार रोपांची निर्मिती

विकासाचा ध्‍यास, काम करण्‍याची जिद्द आणि सोबतीला शासनाचे पाठबळ मिळाले की मग सगळीकडे हिरवे-हिरवे पाहायला मिळते. या कामातून मग केवळ एकट्याचाच नाही तर संपूर्ण परिसराचा विकास साधला जातो. विशेष म्‍हणजे सामूहिक विकास आज गरजेची बाब बनली असून शासनानेसुध्‍दा यासाठी योजना आखल्‍या आहेत. त्‍यातच मग पर्यावरणाचे संरक्षण करण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची गरज असताना नवीन रोपटेसुध्‍दा निर्माण करावी लागणार, हे ओघाने आलेच. रोजगार हमी योजनेंतर्गत संधी मिळताच मानवत तालुक्‍यातील कोल्‍हावाडी ग्रामपंचायतीने ८० हजार रोपांची निर्मिती करून एक आदर्शच घालून दिला आहे. 

महाराष्‍ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना २०१०-२०११ या वर्षात कोल्‍हावाडी ग्रामपंचायतीला पंचायत समिती मानवतमार्फत ८० हजार विविध रोपे तयार करण्‍यासाठी रोपवाटिका मंजूर करण्‍यात आली होती. ऑक्‍टोबर २०१० मध्‍ये या रोपवाटिकेच्‍या कामास प्रारंभ झाल्‍यानंतर यामध्‍ये सिमनसाग रेंट्री, आवळा, चिंच, जट्रोफा, सीताफळ, गुलमोहर आदींची ८० हजार रोपे तयार करण्‍यात आली आहेत. सध्‍या या रोप वाटिकेतील रोपे चांगलीच बहरली असून राज्‍य शासनाने प्रत्‍येक ग्रामपंचायतींना रोपवाटिका सुरु करण्‍यासंदर्भात घेतलेला निर्णय ही रोपवाटिका पाहता सफल झाल्‍याचे दिसत आहे. विशेष म्‍हणजे ९ महिन्‍यात तब्‍बल ८० हजार रोपे म्‍हणजेच महिन्‍याकाठी जवळपास ९ हजार रोपे तयार करून कोल्‍हावाडी ग्रामपंचायतीने पर्यावरण संरक्षणाला प्राधान्‍य दिल्‍याचे निदर्शनास येते.

अलीकडच्‍या काही वर्षांत पृथ्‍वीचे तापमान वाढत असल्‍यामुळे जगाला ग्‍लोबल वॉर्मिंगचा धोका जाणवायला लागला आहे. त्‍यातच मोठमोठ्या उद्योग धंद्यांमुळे आजूबाजूचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर होत असून पर्यावरणाच्‍या संरक्षणासाठी वृक्ष लागवड व त्‍याचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. शासन स्‍तरावर वृक्षारोपण तसेच वृक्षदिंडीबाबत जनजागृती होत असून पर्यावरण हा विषय शासनाने शालेय अभ्‍यासक्रमात समाविष्‍ट केला आहे. तसेच नागरिकांनीही पर्यावरण संरक्षणाचे महत्‍व ओळखून वृक्षारोपण तसेच रोपांची निर्मिती करण्‍यावर भर दिला आहे. शासनस्‍तरावर यासाठी मदत उपलब्‍ध होत असून रोजगार हमी योजनेंतर्गत इतरही ग्रामपंचायतींनी जास्‍तीत जास्‍त रोप निर्मिती करून पर्यावरणाच्‍या संरक्षणाला हातभार लावणे गरजेचे आहे. 

No comments:

Post a Comment