Sunday, August 7, 2011

एकोप्यातून आत्मविश्वासाकडे...

बचत गट चळवळ केवळ पापड, लोणची आणि अशाच स्वरुपाच्या खरेदी विक्री व्यवहारापुरती मर्यादीत राहीलेली नाही. या चळवळीच्या माध्यमातून मिळालेल्या आत्मविश्वासाच्या बळावर बचत गटातील महिला सामाजिक कार्यातही उत्साहाने सहभागी होताना दिसतात. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावच्या महिलांनी तर गावात चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या कार्यात लक्ष घातले आहे. दहावीच्या परिक्षेत कॉपीमुक्त होण्यासाठी या महिलांच्या पथकांनी परिक्षाकेंद्राबाहेर देखरेख ठेवण्याचे कार्य केले.

'महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत बचत गटाची माहिती मिळाल्या नंतर महिलांमध्ये एकोपा रहावा म्हणून बचत गटाची सुरुवात केली' गटाच्या अध्यक्षा सविता कडवईकर आपल्या बचत गटाची वाटचाल सांगतांना उत्साहाने बोलतात. दहा हजार रुपयांच्या अंतर्गत भांडवलावर गटाने आपले आर्थिक कार्य सुरू केले. सदस्यांच्या कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी कर्ज देतानाच कुळीथ पीठ, बेसनाचे लाडू आदी घरीच बनविल्या जाणाऱ्या पदार्थांची विक्री या महिलांनी सुरू केली. हातात दोन पैसे आल्यावर या महिलांचा उत्साह वाढला आणि त्यातूनच नव्या व्यवसायाचा शोध सुरू झाला.

कडवई गाव विस्ताराला मोठे आहे. गावात बारा वाड्या असल्याने वरच्या वाडीतील महिलांना गरजेच्या वस्तू खरेदीसाठी खालच्या बाजूस यावे लागते. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन या गटाने किराणा दुकान सुरू करण्याचा निश्चय केला. सुतार वाडीतील कडवईकर यांच्या घराला लागूनच असलेल्या जागेत जुजबी वस्तुंनी दुकानाला सुरुवात झाली. दुकानाच्या यशाविषयी परिसरातील महिलांनी शंका व्यक्त केली. मात्र गटातील महिलांनी योग्य नियोजनाने हा व्यवसाय यशस्वीरित्या पुढे नेला.

संगमेश्वर येथील बाजारात जातांना गटातील सदस्या स्वत:च वस्तुंची खरेदी घाऊक दरात करतात. दुकानात रोजच्या गरजेच्या सर्व वस्तूंसह भाज्यांचीदेखील विक्री करण्यात येते. मंदिरात नागरिकांची ये-जा सुरुच असते. त्यामुळे दुकानाला ग्राहकमी मिळतात. परिसरातील चारपाच वाड्यातील ग्राहकांची या दुकानामुळे चांगली सोय झाली आहे. दुकानासाठी मिळालेले एक लाखाचे कर्ज फिटल्यावर दुकानाची व्याप्ती वाढविण्याचा मनोदय गटाच्या सचिव रेश्मा नांदस्कर यांनी बोलून दाखविला. कर्जाचा बोजा अधिक न होऊ देता एकेक पाऊल निश्चयाने पुढे टाकायचे हे धोरण जणू या गटातील महिलांनी स्विकारले आहे.

'आम्हाला बँक माहित नव्हती, कसे बोलायचं, हिशेब कसा करायचा, काहीच माहित नव्हतं. आता आम्ही दहावीच्या परिक्षेला मदत करतो' कडवईकर यांच्या बोलण्यातून त्यांचा आत्मविश्वास प्रकट झाला. या महिलांनी ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य विषयक संदेश घरोघरी पोहचविणे अशा सामाजिक कार्यातही आपले योगदान दिले आहे. म्हणूनच या गटाला २०१० चा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महिलांच्या एकोप्यासाठी तयार करण्यात आलेला हा बचत गट आता गावातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रेरक ठरतो आहे. गावात आणखी एका गटाने सुरू केलेला किराणा व्यवसाय याचेच उदाहरण आहे. आपण तयार केलेल्या वस्तू सुंदर पॅकमध्ये गावात जाव्यात याचं स्वप्न रंगवितांना त्यादिशेने या महिलांचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत या बचत गटाने मिळविलेले यश पाहता त्यांचे स्वप्न सत्यात लवकरच उतरेल असा विश्वास या महिलांशी संवाद साधतांना मनात निर्माण होतो.

No comments:

Post a Comment