Friday, August 19, 2011

निदान शौचालय तरी बांधा !

निदान शौचालय तरी बांधा! हा अमुल्य संदेश यवतमाळ जिल्ह्यात लोकांना अत्यंत वेगळ्या पध्दतीने दिला जात आहे. दिल्लीला एक बादशहा होता. त्याचे त्याच्या पत्नीवर अमाप प्रेम होते. इतके प्रेम होते की, तिच्या मृत्यूनंतर बादशहाने एक भव्य इमारत बांधली. जगातले सर्व पर्यटक ही इमारत बघायला येतात. ही इमारत म्हणजेच 'ताजमहाल' होय. जगात सर्वाधिक प्रसिध्द असलेला हा ताजमहाल बादशहाने त्याच्या बायकोसाठी बांधला. मला सांगा तुमचे तुमच्या बायकोवर प्रेम आहे की नाही.....? असे विचारत ग्रामीण जनतेच्या लाजऱ्या मनाला हळूवार स्पर्श केला जातो.

पुढे वाक्य ऐकायला येते. आहे ना तुमचेही तुमच्या पत्नीवर प्रेम. मला माहित आहे. बादशहासारखा ताजमहाल तुम्ही बांधू शकत नाही पण प्रेमाखातर घरात 'निदान शौचालय तरी बांधा!' बांधू शकता ना..? या वाक्याने सारे कान टवकारुन बसलेल्या नागरिकांत प्रचंड हशा होतो.

एकमेकांकडे पाहत... पटले बुवा, असे कौतुकाने म्हटले जाते. दिग्रस भागातील हा किस्सा तालुक्यात गाजत आहे. अत्यंत खुमासदार शैलीत हा किस्सा सांगितल्यानंतर बायका पोरं रत्यावर गेली तरी चालतील, पण सरकारच्या अनुदानाशीवाय घरात शौचालय बांधणार नाही, ही मानसिकता बदला असे आवाहन याव्दारे ग्रामीण जनतेला केले जात आहे. निर्मल स्वराज्य मोहिमेअंतर्गत दिग्रस तालुक्यात जनजागृतीसाठी मधुकरराव खोडे, आर्णि येथील दाभडीचे पटवारी आणि स्वत: गटविकास अधिकारी गावकऱ्यांच्या सभा घेऊन लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत आहेत.

पटवारी श्याम रणनवरे आपल्या भाषणातून सांगतात की, पैसा नाही, जागा नाही या अडचणी नसून शौचालय बांधून त्याचा वापर करण्याची मानसिकता तयार व्हायला पाहिजे. रणनवरे यांच्या कलगाव डेहणी, रामनगर, वाई मेंढी, वाई लिंगी, चिंचोली येथे सभा झाल्या आहेत. तर मधुकरराव खोडे विविध उदाहरणे देऊन स्वच्छता ठेवण्याचे कळकळीचे आवाहन करीत आहेत. श्री. खोडे यांच्या इसापूर, साखरा व तुपटाकळी येथे सभा झाल्या आहेत.

गटविकास अधिकारी यांच्या इसापूर, साखरा व वाई लिंगी येथे सभा झाल्या आहेत. सभेतून लोकांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले असून इसापूर येथे ६, कलगाव येथे १४, वाई मेंढी १२, साखरा येथे ६, वाई लिंगी येथे ४, चिंचोली ४, रामनगर ८, तुपटाकळी येथे ४ शौचालयांचे भूमीपूजन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींच्या हस्ते करण्यात आले. या जनजागृती सभांच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवक व नागरिक पुढाकार घेत आहेत. या सभांना ग्रामीण भागातून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

No comments:

Post a Comment