Monday, August 29, 2011

शोभिवंत मासे

शोभिवंत माशांच्या टाक्यांचे सध्या सर्वत्र मोठे आकर्षण आहे. मोठमोठ्या हॉटेल, रेस्टॉरंटबरोबरच अनेक घराघरांमध्येही अशा टाक्या हमखास आढळतात. आपल्याकडच्या टाकीत रंगीबेरंगी, आकर्षक आणि अत्यंत दुर्मिळ मासे असावेत, असा अनेकांचा अट्टाहास असतो. त्यासाठी हजारो रूपये खर्च करण्याचीही अनेकांची तयारी असते. केवळ एकच गोल्डफिश असणाऱ्या मोहक बाऊल पासून वीस-तीस विविध प्रकारचे मासे सामावणाऱ्या चार-सहा फुटी काचेच्या पेटीपर्यंत अनेक प्रकार पाहायला मिळतात. मोठ्या हॉटेलात तर प्रचंड मोठ्या टाक्या असतात.

अशा या टाक्यांमध्ये सोडण्यासाठीचे शोभिवंत मासे चक्क परदेशातूनही आणले जातात. मात्र त्यांची निर्मिती करण्यासाठी जिल्ह्यातही आता प्राथमिक स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुळदे (ता. कुडाळ) येथील संशोधन केंद्रात शोभिवंत मासेनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. असे प्रकल्प जिल्ह्यात अनेक ठिकाणी अगदी परसदारातही उभारता येण्यासारखे आहेत. लाखो रूपयांचे उत्पन्न मिळविण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

मुळदे येथे बंदिस्त शेडमध्ये प्लास्टिक लायनिंगच्या तलावात शोभिवंत मत्स्यपालन प्रकल्प राबविण्यात येतो आहे. शोभिवंत मासे आकाराने छोटे असतात. त्यांचा पोहण्याचा वेगही कमी असतो. पाणकावळे, किंगफिशरसारखे पक्षी, बगळे, छोटे बेडूक, साप हे या माशांचे शत्रु असल्याने त्यांच्यापासून जपण्यासाठी बंदिस्त जागेतच हे मासे वाढविणे सोयीचे असते. पूर्वी एखाद्या इमारतीत वा पत्र्यांच्या शेडमध्ये काचेच्या, सिमेंट वा फायबर टाक्यांत या माशांचे प्रजनन घडवून आणून पिले वाढविली जात असत. मात्र त्यासाठीचा खर्च, पाण्याची अनुपलब्धता तसेच प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन काम करता येत नसल्याने अडचणीचे बनले होते.

या पार्श्वभूमीवर आता नव्या पध्दतीत जेमतेम पाच गुंठे जमिनीत दहा तळ्यांचे एक युनिट उभारून शोभिवंत मत्स्यपालन प्रकल्प राबविणे सहज शक्य बनले आहे. साधारणत: दहा मीटर लांब, दोन मीटर रुंद आणि सव्वा मीटर खोल असे दहा तलाव तयार करायचे. त्यात जाड प्लास्टिकचे कापड पसरून पाणी भरायचे. एका तळ्यात २० ते २२ हजार लिटर पाणी राहते. त्यात ४ ते ५ हजार शोभिवंत माशांची पैदास करता येते. गुरामी, गोल्डफिश, ब्लॅक मोली, स्वोर्ड टेल, प्लॅटी, एंजल आदी जातीच्या माशांची पाच-पाच हजार पिले यात जगतात. रेट्रा, डॅनोसारख्या जातींची दहा-दहा हजार पिल्ले यात वाढविता येतात.

या तलावांच्या सभोवती कुंपण करुन त्यावर शेडनेट लावावे लागते. या जाळीचा ७५ टक्के शेडिंग इफेक्ट असतो. अशा प्रकारच्या संरक्षणामुळे आतमध्ये पक्षी, बेडूक, साप येऊ शकत नाहीत आणि उन्हापासूनही माश्यांचे संरक्षण होते. या टाक्यांमध्ये पाण्याचा पुरेसा पुरवठा हवा. मत्स्यखाद्य दिवसातून दोन ते तीन वेळा द्यावे लागते.

या प्रकल्पात पहिल्याच वर्षी शेड उभारणीसह विविध कामांसाठी मोठा खर्च येत असला, तरी नंतरच्या काळात फक्त मत्स्यखाद्य आणि पाण्यासाठीचा खर्च करावा लागतो. एका तळ्यात पाच हजार मासे सोडले असल्यास त्यातील ऐंशी टक्के तरी जगतात. ४ ते ५ रूपये दराने या चार हजार माशांच्या विक्रितून तीन महिन्यांतच १५ ते २० हजार म्हणजे एका युनिटमधून दीड ते दोन लाखांचे उत्पन्न सहज मिळते. शिवाय किमान जागेत हा प्रकल्प राबविता येतो.

मुळदे येथे मत्स्य वैज्ञानिक डॉ. नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या हा प्रकल्प सुरु आहे. येथे जरी लाकडी रिपा, दांडे, बांबे यांचा वापर करुन शेड उभारण्यात आला असला तरी खासगी पातळीवर हा प्रकल्प राबवायचा झाल्यास पोलादी सळ्या, पाईप यांचा वापर करून शेडची उभारणी केल्यास ती अधिक टिकावू ठरेल.

या प्रकल्पातील पाणी अधूनमधून किमान चार-आठ दिवसांनी बदलावे लागते. वापरलेले पाणी वाया जात नाही. शेती-बागायतीसाठी ते पाणी उपयुक्त ठरते. शोभिवंत माशांसाठी कोकणला मुंबई, कोल्हापूर, पुणे, गोवा, बेळगाव, यासारख्या शहरात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment