Friday, August 5, 2011

बकरी पालन व्यवसायामुळे आली आर्थिक सुबत्ता

ग्रामीण क्षेत्रात व्यवसायाचे पुरेसे साधन नसल्यामुळे त्या ठिकाणाची अर्थव्यवस्था दुबळी होत असते. रोठा या गावी दुबळी झालेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे कार्य राणी दुर्गावती महिला बचत गटांनी मोठ्या प्रयासाने हाती घेतले असून, बकरी पालन व्यवसायातून त्यांना आर्थिक सुबत्ता लाभत आहे.

वर्धेपासून ११ किलोमीटर अंतरावर रोठा हे गाव आहे. या गावामध्ये दहा महिला एकत्रित येऊन राणी दुर्गावती महिला बचत गटाच्या नावाने १ ऑक्टोबर २०११ रोजी बचत गट स्थापन केला. सदरहू बचत गटात आदिवासी महिलांचा समावेश असून कार्यरत या गटाच्या अध्यक्षा गिरजा कन्नाके व सचिव मंजूळाबाई घोडाम या त्यांच्या पदावर आहेत.

बचत गटाच्या प्रगती विषयी माहिती देताना अध्यक्ष गिरजाबाई कन्नाके म्हणाल्या की, आम्ही शेतात मोलमजूरी करणा-या महिला आहोत. सामाजिक व आर्थिक 
परि‍स्थिती आमची बेताचीच तरीपण संसार सांभाळताना आम्हाला तारेवरची कसरत करावी लागते. 

बचत गट स्थापन करण्याविषयीची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत विस्तार अधिका-याकडून विस्तृतपणे मिळाली होती. त्यानुसार आम्ही १० महिला एकत्रीत येऊन राणी दुर्गावती महिला बचत गटाची स्थापना १ ऑक्टोबर २००१ रोजी केली.तत्पूर्वी २५ सप्टेंबर २००१ रोजी माझ्या घरीच बैठक घेऊन बचत गटाच्या नावाबाबत तसेच मासिक वर्गणी किती असावी याबाबत निर्णय झाला. प्रथमत: मासिक रु. २५ प्रमाणे १० महिला सदस्याची रक्कम रु. २५० प्रमाणे जमा झाली. आम्ही बचत गटाचे खाते वर्धा येथील जिलहा सहकारी बँकेत १० ऑक्टोबर २००१ रोजी उघडले. त्यामध्ये प्रत्येक महिण्याला ही रक्कम जमा करण्यात येत होती.

वर्षभराची रक्कम रु. ३ हजार जमा झाली. ही रक्कम गटातील महिलांना अंतर्गत कर्ज म्हणून देण्यात आले. कर्जाची परतफेडे गटातील सदसय दोन टक्के व्याजदरावर करीत होते. परतफेडीमुळे बँकेतील रक्कम उत्तरोत्तर वाढत गेली. त्याचप्रमाणे जिल्हा सहकारी बँकेमध्ये बचतगटाची पत सुध्दा वाढली. आमचा गट जुना असल्यामुळे पहिली प्रतवारी १० मार्च २००२ ला होऊनही खेळत्या भांडवलापासून आम्ही वं‍चित ठरलो. मात्र दुसरी प्रतवारी १६ मे २००४ रोजी झाली. बँकेकडे बकरी पालन व्यवसायासाठी अडीच लाख रुपयाचा प्रस्ताव सादर केला. गटाची पत पाहून व कार्य पाहून तो प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यता आला. हा बचत गट दारिद्र रेषेखाली असल्यामुळे व पुरेशे ज्ञान नसलयाने आमच्या गटाला मिळणा-या कर्जावरील सबसिडी पासून वंचित राहावे लागले. तसेच गटातील महिला अशिक्षित असल्यामुळे अडीअडचणीचा सामना करावा लागला.

मंजूर झालेल्या कर्जातून बँकेत पहिला हप्ता ६० हजाराचा दिला त्यामध्ये दहा हजाराचे बक-यासाठी शेड उभारले. बाहेर गावावरुन बक-याची खरेदी केल्यामुळे बक-यांच्या वाहतूकीसाठी ६ हजार रुपयाचा खर्च आला.बक-यांचा विमा व अनुषंगीक खर्चासाठी ४ हजार रुपये खर्च झाला. २० बक-या व १ बोकड ४० हजारामध्ये खरेदी केल्या. प्रत्येक महिलेला २ बक-याचे वितरण करण्यात आल्या. त्या दोन बक-याचा विस्तार आतापर्यंत १८ बक-यापर्यंत झाला. अनेकांनी गेल्या सात वर्षामध्ये बकरी विक्री व्यवसायापासून किमान १० बक-यापासून ५० हजार रुपयाचे उत्पन्न घेतले आहे. तर गटातील सदस्यांकडे आता ८ किंवा ९ बक-या शिल्लक आहे. त्याची सुध्दा आता बाजारभावाने ५ हजार प्रमाणे ४० हजाराच्या बक-याचा गट प्रतयेक महिलेकडे शिल्लक आहे. ही त्यांची स्थावर मालमत्ता आहे.

गटाने घेतलेल्या ६० हजार रुपये कर्जाची परतफेड सहकारी बँकेला १५ जुलै २०१० रोजी करण्यात आली आहे. निकडीच्या घरगुती कामासाठी ,औषधोपचारासाठी अंतर्गत कर्ज गटातील सदस्यांना वाटप सुरु असून १ जानेवारी २०१० पासून २५ रुपयापासून मासिक सदसय वर्गणी रु. ५० केली आहे. गटाच्या नावाने बँकेत २६२५ रुपये शिललक असून बक-या विकून आलेली रक्कम गटातील महिलांनी त्यांच्या कुटूंबियाच्या खर्चासाठी उपयोगी आणली आहे.

बकरी पालन व्यवसायाची निवड का केली ? असा थेट प्रश्न केला असता श्रीमती कन्नाके म्हणाल्या की बक-या हया निरुपद्रव पाळीव प्राणी आहे. गावाकुसाबाहेर आमचे घर असल्यामुळे व घराला लागूनच जंगलाचा भाग असल्यामुळे बक-यांना चराईसाठी व पोषक खाद्य मिळण्यासाठी अडचण जात नाही. तसेच बक-या मोठ्या झाल्यावर त्यांची किंमत अधिक असते. त्यामुळे बकरी व्यवसायाला आम्ही प्राधान्य दिले आहे. 

बक-याचा मोठा गट बचत गटाच्या सदस्याकडे शिल्लक असल्यामुळे येणा-या अडीअडचणीवरही आतापर्यंत मात करता आली. एकूण या बकरी पालन व्यवसायामुळे आमची आर्थिक परिस्थिती समृध्द झाली असून, आर्थिक सुबत्ता आली आहे. गेल्या तीन वर्षापासून महिला संघटिका सविता इंगळे यांचे पदोपदी मदत मिळत असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अथक परिश्रम घेत आहेत. बचत गटामुळे कुटूंबावरील दारिद्र्याचे सावट दूर झाले असून आर्थिक सुबत्ता निर्माण झाली एवढे मात्र निश्चित.


  • मिलींद आवळे
  • No comments:

    Post a Comment