Thursday, August 11, 2011

प्लास्टिकवर मात...

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहर निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. शहर आणि परिसराला भेट देण्यासाठी वर्षभर पर्यटकांची वर्दळ सुरू असते. पर्यटनाच्यादृष्टीने शहराचे महत्त्व लक्षात घेता गतवर्षी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या रामदास कोकरे यांनी शहराला प्रदुषणमुक्त करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाचा विषय प्राधान्याने हाती घेतला. विविध शासकीय यंत्रणा आणि लोकसहभागातून त्यांनी शहर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांपासून मुक्त केले.

दापोली शहरातून एकत्र केल्या जाणाऱ्या घनकचऱ्यात प्लास्टिक, काच, लोखंड, लाकूड आणि इतर प्रकारचा जैविक घनकचरा असतो. दापोली शहरातदेखील अशा स्वरूपाचा ५ ते ६ टन घनकचरा दररोज एकत्रित केला जातो. त्यापैकी २ टन बायोगॅससाठी वापरण्यायोग्य घनकचरा आहे. मात्र या कचऱ्यात प्लास्टिक मिसळले असल्याने त्याचा योग्य उपयोग करणे शक्य होत नव्हते. तसेच कचऱ्यातील प्लास्टिक पावसाच्या पाण्याद्वारे शहरातील गटार आणि नाल्यांमध्ये अडकल्याने पाण्याच्या निचऱ्याची समस्या निर्माण होत असे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यलाही धोका होता. ही समस्या दूर करण्यासाठी दापोली नगर पंचायतीने शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला.

दापोली नगर पंचायतीच्या पुढाकाराने १५ ऑगस्ट २०१० रोजी नगराध्यक्षा, नगरसेवक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय योजनेचे समन्वयक आणि नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी दापोली शहरातून रॅलीच्या रूपात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन केले. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या नगर पंचायतीच्या ताब्यात देण्याचे आवाहन व्यापारी वर्गाला करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी सुमारे एक टन पिशव्या नगर पंचायतीने जमा केल्या.

स्वत: मुख्याधिकारी कोकरे आणि नगर पंचायतीच्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरिकांसमवेत जनजागृती आणि वातावरण निर्मिती करताना प्लास्टिक कचरा एकत्रित करण्यासाठी श्रमदान केले. तसेच पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात आली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणी उपक्रमाची माहिती नागरिकांना दिली. विविध स्पर्धा, रॅली आदींच्या माध्यमातूनही जनप्रबोधनावर भर देण्यात आला.

नागरिकांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याची सवय व्हावी म्हणून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. दोन व्यक्तिंना दंडही आकारण्यात आला. सर्व शाळा आणि महाविद्यालयातूनही प्लास्टिकमुक्ती अभियान सुरू करण्यात आले. अभियानाची व्याप्ती वाढविण्यासाठी उपविभागीय अधिकारी मंगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांची विशेष सभा घेण्यात आली. या सभेत प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराबाबत शासन निर्णयाची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर असा वापर आरोग्य आणि पर्यावरणाला कसा हानीकारक आहे हे नागरिकांना समजावून सांगण्यात आले. त्यासाठी चित्रफितीचा उपयोग करण्यात आला.

केवळ प्लास्टिकच्या वापरावर बंदी न आणता त्यासाठी नागरिकांना योग्य पर्याय म्हणून जुन्या साड्यांपासून बनविण्यात येणाऱ्या पिशव्यांबाबत माहिती देण्यात आली. महिला बचतगटांमार्फत अशा पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या. फिरते विक्रेते आणि भाजी-फळ विक्रेत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सातत्याने प्रबोधन करण्यात आले. या प्रयत्नांना चांगले यश आले. असे प्रयत्न करताना नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणे गरजेचे होते. म्हणून शहरात एकूण पिशव्यांच्या वापराबाबत माहिती एकत्रित करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात वराडकर-बेलोसे महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांच्या सहभागाने मुख्याधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले. त्यासाठी स्वतंत्र फॉर्म तयार करून त्यात विक्रेत्यांकडून माहिती भरून घेण्यात आली. सर्वेक्षणाअंती शहरात दररोज १ टन प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. एवढ्याच प्रमाणात पर्यायी कागदी व कापडी पिशव्या बनविण्यासाठी बचतगटांचे सहकार्य घेण्यात आले.

प्रारंभी या गटांना शासकीय कार्यालयातील जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी उपलब्ध करून देण्यात आली. महिलांना कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. नगर पंचायतीने इतरही प्रकारच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी हॉटेल व्यावसायिक व भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र घंटागाडी सुरू केली. त्यातील कचऱ्याचे बायोमिथीनेशन प्रकल्पात विघटन करून गॅस निर्मिती सुरु करण्यात आली.

नगर पंचायत प्रशासन आणि नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नाला यश येऊन संपूर्ण दापोली शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद झाला. प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीमुळे सांडपाण्याची समस्याही दूर झाली आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा वेगाने होण्यासही मदत होत आहे. प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी आणि कापडी पिशव्यांचा वापर सुरू झाल्याने बचतगटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. बचतगटांना दर दिवशी सुमारे ४००० रुपये उत्पन्न होत असून व्यापाऱ्यांच्या खरेदी खर्चातही १५० ते २०० रुपयांची बचत झाली आहे. कचऱ्यापासून गॅस बनविताना प्लास्टिक कचऱ्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. शहरातील प्रदूषणही कमी होण्यास मदत झाली असून गॅस प्रकल्पाजवळ सुगंधीत फुलांची झाडे लावण्यात आली आहेत. शहरात इतरत्रही वृक्षारोपण करण्यात येत आहे.

या उपक्रमात सातत्य ठेवताना इतर प्रकारच्या प्लास्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिक क्रशर यंत्र घेण्यात येणार आहे. बायोगॅस संयंत्राद्वारे निर्मित गॅसच्या आधारे वीजनिर्मिती करून त्यावर हे यंत्र चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. क्रश केलेल्या प्लास्टिकचे १ ते २ इंच लांबीचे तुकडे करून ते बाजारात विक्री करण्यात येणार आहेत. त्यापासून नगर पंचायतीच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. प्लास्टिक कचऱ्यांची समस्या शहरांना भेडसावत असताना दापोली नगर पंचायतीने नागरिकांना विश्वासात घेऊन यशस्वी केलेला हा उपक्रम इतरही शहरांना मार्गदर्शक असाच आहे.

No comments:

Post a Comment