Wednesday, September 14, 2011

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

कोकणातील नारळ-पोफळीच्या बागांमुळे कोकणवासियांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. समुद्र किनाऱ्यावर भटकंती करताना पर्यटकांची शहाळ्याला खास पसंती असते. नारळ-सुपारीच्या व्यवसायामुळे उत्पन्नही चांगले मिळते. पारंपरिक पद्धतीने नारळापासून असे लाभ घेतले जात असताना मात्र रत्नागिरी शहराला लागून असलेल्या भाट्ये गावातील परमानंद पिलणकर यांना मात्र नारळ हातात घेतल्यावर त्यात दडलेल्या विविध कलाकृती दिसतात. हातातला चाकू भरभर फिरू लागतो आणि त्या नारळावर सुंदर शिल्प कोरलं जातं. त्यांच्या याच कलाकौशल्यामुळे त्यांना केरळ राज्यातील कोच्ची येथील राष्ट्रीय नारळ विकास बोर्डामार्फत दिला जाणारा उत्कृष्ट हस्तशिल्पकाराचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून तो दिनांक २ सप्टेंबर रोजी त्यांना प्रदान करण्यात आला.


श्री. पिलणकर यांना वयाच्या दहाव्या वर्षापासून नारळावर शिल्प कोरण्याचा छंद जडला. त्यांचे वडील जनार्दन पिलणकर हे गणपतीच्या सुंदर मुर्त्या तयार करीत. त्यांनी दगडावर कोरलेली श्रीगणेशाची मुर्ती ही परमानंद यांची प्रेरणा. नारळाच्या झाडांनी वेढलेल्या भाट्ये गावात राहणाऱ्या परमानंद यांना दगडावरील कोरीवकाम पाहून नारळावर असे काम का होऊ शकत नाही, असा विचार सूचला. त्यांनी घरातच उपलब्ध वस्तूंच्या सहाय्याने नारळावर गणपतीचे शिल्प कोरले. पहिलाच प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाल्याने त्यांचा उत्साह वाढला. त्याचबरोबर बालपणीच्या या कलेला बाजारातही किंमत मिळाल्याने कलेने रोजगाराचे रूप केव्हा घेतले हे पिलणकर यांनाही कळले नाही. घरात शाडूची मुर्ती बनविण्याचे कार्य सुरू असताना पिलणकरांची बोटे मात्र नारळावर फिरायची आणि मागणीप्रमाणे शिल्प कोरले जायचे.


कलेच्या प्रेमापोटी त्यांना शिक्षण फारसे घेता आले नाही. 'सातवी नंतर शाळेला गोळी मारली' अत्यंत सौम्य स्वभावाचे असलेले श्री. पिलणकर स्मितहास्य करीत सांगतात. मात्र कलेतून मिळणारे समाधान पाहता या गोष्टीची खंत नसल्याची पुस्तीही ते जोडतात. मोठे झाल्यावर शिल्प कोरण्यासाठी साधने उपलब्ध झाल्याने त्यांची कला आणखी बहरली. भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रातून नारळ निवडून विकत घ्यायचे, सोबत दहा-बारा लहान हत्यारे घेऊन आपल्या कलेत रममाण व्हायचे, हाच त्यांचा दिनक्रम आणि व्यवसायही. गणपती, विठ्ठल, हनुमान, लक्ष्मी, अशी अनेक शिल्पे त्यांच्या कलेतून नारळावर साकार झाली आहेत.

'एका नारळावर गणपतीचे शिल्प कोरताना एक-दीड दिवस लागतो तर हनुमानाच्या शिल्पासाठी दहा दिवसही लागतात', कला जोपासताना आवश्यक एकाग्रता आणि धैर्याबाबत बोलताना पिलणकर सांगतात. त्यांच्याकडील एक शिल्प ४०० ते ५०० रुपयांना विकले जाते. वर्षाला साधारण या कलेपासून त्यांना ७० ते ८० हजार रुपये मिळतात. सिंगापूर आणि अमेरिकेला जाणाऱ्या शिल्पाचा आकार लहान ठेवावा लागत असल्याने त्या आकाराचा नारळ पिलणकर निवडतात. अनेक प्रदर्शनातून त्यांच्या कलाकृती मांडल्या गेल्या आहेत. स्वत:चे प्रदर्शन भरविण्याविषयी विचारल्यावर 'मोठमोठी माणसे कला पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी इथपर्यंत येतात मग प्रदर्शन कशाला हवे' त्यांचा प्रतिप्रश्न...

पिलणकरांनी अनेकांना ही कला शिकविण्याचे कामही नि:स्वार्थपणे केले आहे. त्यांनी नारळांच्या देठापासूनही उत्कृष्ट कलाकृती तयार केल्या आहेत. नारळाच्या ज्या बाजूला शिल्प कोरले जाते त्याबाजूचा कापलेला भाग उपयोगात आणित त्यापासूनही वेगळ्या कलाकृती बनविण्याचा प्रयत्न ते करतात. नारळापासून कमंडलू, कासव, नौका आदी कलाकृतीदेखील त्यांनी तेवढ्याच खुबीने बनविल्या आहेत.

त्यांची ही कला राष्ट्रीय स्तरावर पोहोचावी यासाठी नारळ संशोधन केंद्राचे ऍग्रोलॉजिस्ट डॉ.नागवेकर, नारळ संशोधन बोर्डाचे राजाभाऊ लिमये आणि पिलणकर यांचे बंधू गिरीधर यांनी विशेष प्रयत्न केले. कोची येथील नारळ विकास बोर्डातर्फे नारळाशी संबंधीत विविध गटात राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देण्यात येतात. त्यात उत्कृष्ट हस्तशिल्पकार म्हणून २ सप्टेंबर रोजी गुहाटी येथे होणाऱ्या कार्यक्रमात परमानंद पिलणकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. वडिलांनी दिलेला कलेचा वारसा समर्थपणे सांभाळताना कलेशी एकनिष्ठ राहून पिलणकरांनी मिळविलेला पुरस्कार कोकणातील युवा पिढीच्या कलाकारांना प्रेरक असाच आहे.

  • डॉ.किरण मोघे 
  • No comments:

    Post a Comment