Saturday, September 17, 2011

बचतगटांची धवलक्रांती

ग्रामीण भागात मुख्य व्यवसाय हा शेती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे अवलंबित्व हे शेती व शेतीपूरक व्यवसायावर आहे. शेतकरी आणि मजूर वर्ग हा ग्रामीण भागात मोठया प्रमाणात आहे. बचतगट ही चळवळ झाल्याचे चित्र ग्रामीण दिसून येते. यामध्ये महिला आणि पुरुषांचे बचतगट मोठया प्रमाणात तयार झाले आहे. प्रामुख्याने दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या बचतगटाचे प्रमाण जास्त आहे.

शेतीपूरक व्यवसाय असलेल्या दुग्धव्यवसायाला महिला व पुरुष बचतगटांनी सुरुवात मोठया प्रमाणात केली आहे. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आणि महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत विविध योजनेअंतर्गत बचतगटांची स्थापना करण्यात आली आहे. दुग्ध व्यवसायाला सुरुवात करुन धवलक्रांतीकडे वाटचाल करण्यास बचतगटांची पाऊले पडत आहेत.

भंडारा जिल्हयातील साकोली तालुक्यात १७७ बचतगटांनी दुग्धव्यवसाय सुरु केला आहे. दररोज या बचतगटांच्या ३ हजार ५४० गाई-म्हशी पासून २१ हजार २४० लिटर दूध मिळते. यानुसार दररोज ५ लाख ५६ हजार रुपये उत्पन्न प्राप्त होत आहे. बचतगटांच्या माध्यमातून साकोली तालुक्यातील गावांनी दूध उत्पादनात मोठी क्रांती केली आहे. दुधाच्या बाबतीत शहरातील नागरिक आता खेडयांवर अवलंबून आहे. पाकीट मधील बंद दुधाची चव घेण्यापेक्षा खेडयातील सकस दुधाची चव घेवू लागले आहे.

पूर्वी केवळ सधन शेतकऱ्यांकडे दूध उपलब्ध व्हायचे. आता मात्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून महिला व पुरुषांच्या बचतगटांनी दुग्ध व्यवसायात भक्कमपणे पाय रोवले आहे. बचतगटाच्या दुग्धव्यवसायामुळे बचतगटांचे सदस्य असलेल्या कुटुंबांकडे आर्थिक संपन्नता दिसून येत आहे. दुग्‍ध व्यवसायामुळे बचतगटाने धवलक्रांतीकडे वाटचाल सुरु केली आहे.

No comments:

Post a Comment