Thursday, September 29, 2011

संस्थागत बाळंतपणाच्या उपक्रमात 'गोंदिया राज्यात अव्वल'

'सुरक्षित बाळंतपण' ही माता होऊ घातलेल्या स्‍त्रीसाठी मूलभूत आणि महत्वाची गोष्ट असते. शहरातील अद्ययावत दवाखान्यात अशी बाळंतपणे सहजगत्या होत असतात. पण खरी अडचण होते ती ग्रामीण भागातील गरोदर महिलांना त्यांना अनेकदा हवे ते मार्गदर्शन, आवश्यक ती मदत मिळतेच असे नाही. त्याला अनेक कारणं असतील. पण ग्रामीण भागात सुरक्षित बाळंतपणाचं प्रमाण खालावलय.अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला.

जिल्हयातील ३९ प्राथमिक स्वास्थ केंद्रे, २३८ आरोग्य उपकेंद्रे, तसेच ४२ आयुर्वेदिक दवाखाने आणि ३ ग्रामीण रुग्णालये जिल्हयातील ग्रामीणांच्या सेवेत अहोरात्र सेवारत असतात. त्यांच्या मार्फत जिल्हयातील सर्व प्राथमिक स्वास्थ केंद्रात आणि उपकेंद्रात जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने प्राथम्याने अद्ययावत प्रसूति कक्षाची सोय उपलब्ध करुन दिली. सर्व प्राथमिक स्वास्थ केंद्रात व उपकेंद्रात अद्ययावत अशा प्रसूती कक्षाची सोय करणारी गोंदिया जिल्हा परिषद राज्यातील प्रथम जिल्हा परिषद ठरली आहे.

पूर्वी जिल्हयातील आदिवासी बहुल भागात गरोदर महिलांची प्रसूती मोठया प्रमाणात घरच्या घरीच होत असे. त्यामुळे बाळंतपणात नवजात बालकांसोबत महिलांच्याही मृत्यूचेही प्रमाण वाढले होते. हे प्रमाण थांबविण्यासाठी व प्रसूती कक्ष उघडण्यासाठी, 'राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ मिशन' च्या मदतीने प्रत्येक स्वास्थ केंद्रात व उपकेंद्रात प्रसूती कक्ष उघडण्यात आले. तसेच गरोदर आदिवासी महिलांनी आणि ग्रामीण महिलांनी आरोग्य सेवेअंतर्गत प्रसूती कक्षाच्या सेवाचा लाभ घ्यावा हयासाठी जनजागृती करण्यात आली. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यासाठी सर्व ठिकाणच्या आरोग्य केंद्रात २४ तास वीज पुरवठा व्हावा म्हणून ठिकठिकाणी ईनव्हर्टरची व्यवस्था करण्यात आली. सोबत पिण्याचे शुध्द पाणी पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली. तसेच सर्व स्वास्थ केंद्रात सुरक्षा व्यवस्थेसाठी ऊंच भिंती उभारण्यात येत आहे. त्यामुळे हया प्राथमिक आरोग्य केंद्राची व स्वास्थ उपकेंद्राची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत २३२ स्वास्थ उपकेंद्राना स्वतंत्र इमारती आहेत. त्या इमारतीमध्ये आधुनिक सोई सुविधांनी परीपूर्ण असे प्रसूती कक्ष तयार करण्यात आले आहे. हया सोबत कान्होली, आलेवाडा, सावरी, लांबाटोला, देवरी आणि अर्जुनी मोरगाव जेथे स्वतंत्र उपकेंद्रे नाहीत अशा ३९ ठिकाणी एन.आर.एच.एम.अंतर्गत स्वास्थ उपकेंद्राच्या स्वतंत्र इमारती बांधण्याचा निर्धार करुन आतापर्यंत ३९ पैकी ३७ ठिकाणी केंद्राच्या स्वतंत्र इमारती पूर्ण होत आल्या आहेत. केवळ धाबेपवनी आणि कवलेवाडा या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध होऊ न शकल्यामुळे येथे स्वास्थ केंद्राच्या स्वतंत्र इमारती बांधण्यात येऊ शकल्या नाही.

हया 'मॉडेल वर्क'च्या आदर्श कामकाजामुळे नक्षलग्रस्त भागातील तसेच संवेदनशील अशा आदिवासी क्षेत्रातील स्वास्थ केंद्रात उघडलेल्या प्रसूती कक्षामुळे ही आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे अनेक गरोदर भगिनींच्या होऊ घातलेल्या मातांच्या दुव्याचे आश्रयस्थान झाले आहे. अलिकडेच घेतलेल्या आढाव्यानुसार जिल्हयात आरोग्य संस्थामधून बाळंतपण करण्याचे प्रमाण ८९ टक्कयांच्या आसपास पोहोचले आहे. हे प्रमाण वाढण्यास आरोग्य सेवेमार्फत पुरविली जाणारी प्रभावी ॲम्बुलन्‍स सेवा हे देखील महत्वाचे एक कारण आहे. या कामी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती विनोद अग्रवाल यांचाही पुढाकार लक्षणीय असाच आहे.

No comments:

Post a Comment