Thursday, September 29, 2011

सांस्कृतिक दुवा

सुंदर समुद्र किनारे, हिरवीगार वने, ऐतिहासिक इमारती, धार्मिक स्थळे, यात्रा, महोत्सव यांना केवळ पर्यटनाच्या निमित्ताने भेट देण्याइतपतच महत्त्व नसतं तर भिन्न संस्कृतीना एका सुत्रात बांधण्याचं कार्य यानिमित्ताने शक्य होतं. भिन्न देश आणि प्रदेशातील सांस्कृतिक घटकांचे आदानप्रदान पर्यटनाच्या माध्यमातून होते. पर्यटनाचं हेच महत्त्व लक्षात घेऊन यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य 'पर्यटन-सांस्कृतिक दुवा (Tourism-Linking Cultures)' असे ठेवण्यात आले आहे. जागतिक पर्यटनाच्या निमित्ताने हे महत्त्व लोकांसमोर मांडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने पर्यटन दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक पर्यटन संघटनेची स्थापना २७ सप्टेंबर १९७० मध्ये झाली. त्यामुळेच १९८० पासून हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संघटनेने तुर्की येथील इस्तंबूल येथे १९९७ मध्ये झालेल्या अधिवेशनात दरवर्षी एका देशाने पर्यटन दिनाचे आयोजन करावे असा ठराव केला. ऑक्टोबर २००३ मध्ये चीनमधील बिजींग येथे झालेल्या १५ व्यास अधिवेशनात २००६ पासून प्रत्येक खंडातील एका देशात क्रमश: पर्यटन दिन साजरा करण्याचे ठरले. दरवर्षी स्वतंत्र घोषवाक्य निश्चित करण्यात येऊन त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. २००८ मध्ये भारतात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हवामानातील बदल आणि तापमान वाढीला पर्यटन व्यवसाचा प्रतिसाद' असे घोषवाक्य ठेवण्यात आले होते. २००१ पासून निश्चित केलेल्या विविध घोषवाक्यातून महिलांचा सहभाग, सामाजिक संतुलन, पर्यावरण, शांती आणि संवाद, जैवविविधता अशा अनेक पैलूंचा पर्यटनाशी असणारा संबंध स्पष्ट करण्यात आला. यंदाचे वर्ष सांस्कृतिक दुवा वर्ष म्हणून देखील आयोजित करण्यात येत आहे...

...गणपतीपुळेच्या निळाशार समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाचा आंनद लुटण्यासाठी विविध प्रांतातून आणि देशातून पर्यटक येतात. त्यामुळे जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ते योग्य ठिकाणच होते. निसर्गाची किमया आणि अद्भूत सौंदर्य याचा सुरेख संगम गणपतीपुळे येथे झाला आहे. श्रीगणेशाच्या मंदिरासमोरील समुद्र किनारा अनेक पर्यटकांचे आकर्षण स्थान तर आहेच पण त्याच बरोबर रस्त्यावरील खारे-वारे येथील स्वच्छ किनाराही पर्यटकांना भुरळ घालतो. सुरू आणि ताड-माडाची वने या सौंदर्यात भर घालतात. पावसाळ्यानंतर विविधरंगी रानफुलांचे सौंदर्यही रस्त्याच्या दोन्ही बाजूस न्याहाळता येते. एमटीडीसीच्या निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये होणारा समुद्राच्या सन्निध्यातील निवास ही तर पर्यटकांसाठी पर्वणीच असते. पर्यटन हाच ग्रामस्थांचा प्रमुख उत्पन्न स्त्रोत असल्याने 'पर्यटन दिंडी'त गावातील नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक सहभागी झाले होते.

ढोल-ताशे, घोडा, उंट सोबतीला घेऊन सकाळी नऊ वाजता दिंडीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून जातांना 'पर्यटनाचा विकास, हाच आमचा ध्यास', ' पर्यटनाचा मूलमंत्र-अतिथी देवो भव', 'चला पर्यटनाला, आपल्या गणपतीपुळ्याला' अशा विविध घोषणा सुरू होत्या. एमटीडीसी रिसॉर्टचा सुंदर परिसर विकसीत करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या निवृत्त विभागीय व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरु झाल्याची माहिती व्यवस्थापक गजानन गवळी यांनी दिली. दिंडीचे रस्त्यातील प्रत्येक नागरिक हसतमुखाने स्वागत करीत होता. पलिकडच्या टोकाला असलेल्या 'प्राचीन कोकण' दालनापर्यंत दिंडी गेल्यानंतर त्याठिकाणी सर्वांना अस्सल कोकणी चवीचे पन्हे देण्यात आले. दालनाचे प्रमुख वैभव सरदेसाई यांनी सर्वांचे स्वागत करतांना या कोकणी संस्कृतीच्या विविध अविष्काराने समृद्ध दालनात समुद्र किनाऱ्यावरच्या प्रतिकृतींची आणखी भर पडणार असल्याचे सांगितले.

दिंडी गावातून फेरी मारून पुन्हा एमटीडीसीच्या रिसॉर्टजवळ विसर्जीत झाली. कोकणात पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने अनेकविध योजना आणि उपक्रम आतापर्यंत राबविले आहेत. याची सुरुवात १९७५ मध्ये झाली. आज गणपतीपुळ्यात विविध प्रकारच्या एकूण १२० सुट्स तसेच वेळणेश्वर येथे १५ कोकणी हाऊस पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. गणपतीपुळे येथे बोटींगची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक जनतेचा पर्यटनात सहभाग वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या निवास-न्याहरी योजनेचा १४१ घरमालकांनी लाभ घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून अस्सल कोकणी संस्कृती आणि पाककलेचा आस्वाद पर्यटकांना घेता येतो. महाभ्रमण योजने अंतर्गत दोन ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रत्नागिरीच्या निसर्गरम्य वातावरणात पर्यटनाचा आनंद घेतांना पर्यटकांना इथल्या समृद्ध संस्कृतीचा परिचयही होतो. गणेशोत्सव आणि होळी उत्सवाची परंपरा असो वा हापूस आणि सोलकढीची चव पर्यटक पुढच्यावर्षी पुन्हा असाच आनंद लुटण्याच्या निश्चयाने इथून परततात. परतण्यापूर्वी त्यांच्या संस्कृतीच्या काही पैलूंचादेखील कोकणवासीयांना परिचय करून देतात. या आदानप्रदानातून इथल्या नागरिकांचं पर्यटकांशी एक प्रकारचं नातं जुळतं आणि 'येवा कोकण आपलाच असा' म्हणत पुढील वर्षी पुन्हा ते पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असतात. हा अनोख्या संबंधांचा सांस्कृतिक दुवा जपण्याचा विचार या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने करायचा आहे. पर्यटन दिंडीच्या माध्यमातून हाच निश्चय करण्यात आला.

No comments:

Post a Comment