Saturday, September 10, 2011

आधार अपंगांच्या जिद्दीला

ज्यांना इतरांच्या आधाराशिवाय दररोजचं जगणं अवघड आहे अशा अपंगांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. याशिवाय समाजात खऱ्या अर्थाने नाही रे वर्गासाठी झटणारे हातही आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग हे काम अगदी निरालसपणे आणि आस्थेने करत आहे, ही निश्चतच आदर्शवत गोष्ट आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने तन, मन आणि धन खर्चून अपंगांची सेवा केली. शासन आपल्या दारी असा संदेश देत तालुकास्तरावर अपंगांचे मेळावे घेऊन एकाच छताखाली त्यांना विविध दाखले देण्याची सोय केली.

जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील आणि जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे यांच्या पुढाकाराने मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव हरिदास, समाजकल्याण अधिकारी सुनिल खमितकर, विवेक लिंगराज यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये अपंगांचे मेळावे घेऊन समाजकार्याचा एक आगळा-वेगळा ठसा उमटवला आहे. राजकीय, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी चांगल्या कामासाठी एकत्र आले तर समाजाचे कल्याण होऊ शकते हेच जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने दाखवून दिले आहे.

समाजातील उपेक्षित असलेल्या घटकांपैकी एक घटक म्हणजे अपंग होय. या अपंगांना होणारा त्रास कमी करण्यासाठी शासनाने अनेक योजना राबविणे सुरु केले आहे. या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्यांच्या जवळ अपंगत्वाचे प्राधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. परंतु हे प्रमाणपत्र मिळविणे काही वेळेस अवघड बनते. सर्व कागदपत्रे जमा करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे जेथे प्रमाणपत्रच मिळत नाही तेथे त्या योजनांचा लाभ घेणे काही वेळा कठीण होते.

या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून समाजकल्याण खात्याने जिल्ह्यातील अपंगांचा शोध घेतला. ग्रामीण भागातील २९ हजार ९२ अपंगांचे सर्वेक्षण केले. सर्व लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठीच तालुकानिहाय अपंगांचे मेळावे आयोजित केले. प्रत्येक मेळाव्याच्या ठिकाणी अपंग व्यक्तींना विविध शासकीय योजनांबाबत माहिती देणे, त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देणे, ओळखपत्र, एस.टी.चा सवलतीचा पास देणे, स्वयंरोजगारासाठी कर्ज मंजूर करणे, बचतगट आदी विविध उपक्रम राबवून अपंगांना जगण्याची नवी उमेद दिली आहे. 

No comments:

Post a Comment