Tuesday, September 20, 2011

आंतरपिकाने फुलविला शेतमळा

शेतीला लळा लावल्याशिवाय शेतमळा पिकत नाही असे म्हणतात. ही बाब सत्यात उतरवून दाखविली आहे यवतमाळ जिल्ह्यातील मुळावा येथील प्रयोगशील शेतकरी अमोल विजय डुब्बेवार यांनी. जिद्द आणि चिकाटीला श्रमाची जोड देऊन डुब्बेवार यांनी उसात बटाट्याचे आंतरपिक घेउन तीन महिन्यात एकरी ६२ हजार रुपयांचा नफा मिळविला आहे. त्यांच्याकडे ११ एकर जमीन आहे. माळरानाजवळ असलेली त्यांची जमीन प्रथम त्यांनी सपाटीकरण केली व त्यानंतर पाण्याची व्यवस्था करुन घेतली. या शेतीमध्ये ते दरवर्षी वेगवेगळी पिके घेतात.

यावर्षी त्यांनी एक एकर शेतात उसाची लागवड केली. तीन फुटाचा सरा पाडून ऊस लागवड केल्यानंतर दुसऱ्या महिन्यात उसात आंतरपिक म्हणून बटाट्याची लागवड केली. या भागात कुणी बटाट्याचे पिक घेत नाही. परंतु त्यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर येथून पाच क्विंटल बटाट्याचे बियाणे आणले. वरंब्यावर ४ ते ६ इंच अंतरावर लागवड केली. लागवडीपूर्वी सूपर फॉस्फेट पाच पोते, म्यूरेट ऑफ पोटॅश दोन पोते व डीएपी दोन पोते खत दिले. त्याचप्रमाणे शॅनाकार या तणनाशकाची फवारणी केली. लागवड करताना अविष्कार (टॉनिक) व बावीस्टीनच्या द्रावणात बूडवून बिजप्रक्रिया केली. या पिकावर थ्रिप्स व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे ॲसीशमाप्रीड, लम्डा, सायक्लेत्रीन या किटकनाशकांसोबत रोको, एम ४५, अविष्कार याच्या आलटून पालटून फवारण्या केल्या.

डुब्बेवार यांनी ५०० मेट्रिक क्षमतेचे वेअर हाऊस बांधले आहे. उत्पादन क्षमतेसोबतच योग्य भाव मिळण्यासाठी वेअर हाऊसची गरज असल्याचे ते सांगतात. बटाट्याचे आंतरपीक घेण्यासाठी वसंत बायोटेकचे प्रा. गोविंद फुके यांचे मार्गदर्शन त्यांनी घेतले. १ एकर क्षेत्रातून त्यांना ११० क्विंटल बटाट्याचे उत्पादन मिळाले. साधारणत: ७ रुपये किलो भावाप्रमाणे ७७ हजार रुपयाचे उत्पादन त्यांना मिळाले. यासाठी १५ हजार रुपये खर्च झाला. खर्च वजा जाता एकूण ६२ हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. त्यांच्या या प्रयोगाचे व मिळालेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

No comments:

Post a Comment