Friday, September 2, 2011

नागपूर सुधार प्रन्यास करणार मेट्रो रिजनचे नियोजन

नागपूर सुधार प्रन्यास अर्थात ' एन.आय.टी. ' ही संस्था १ जानेवारी १९३७ ला स्थापन झाली. नागपूर शहराचा शिस्तबध्द विकास व्हावा ही प्रन्यासच्या स्थापनेमागील भूमिका होती. महाराष्ट्र शासनाने दिनांक ३१ ऑगस्ट २०१० च्या अधिसुचनेनुसार नागपूर महानगर पालिका हद्दीबाहेर नागपूर महानगर क्षेत्राचा (मेट्रोरिजन) सुसंबद्ध व नियोजनबद्ध विकास करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे.

नागपूर महानगर क्षेत्राच्या नियोजनासाठी हेल्को कन्सल्टींग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नासुप्रने नियुक्त केले आहे. यामध्ये ३५७७.१६ चौ. कि.मी.क्षेत्राचे नियोजनाचे काम येत्या २४ महिन्यात पुर्ण करण्यात येणार आहे. नागपूर शहरात हज यात्रेकरुसाठी गंजीपेठ येथे भव्य हज हाऊस बांधण्यात येत आहे. १५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पावर ११.७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.

नागपूर शहरात सुधार प्रन्यासच्या जागांवर सार्वजनिक खाजगी सहभाग या तत्वावर इंफोटेक पार्क, हॉस्पीटल, खेळाच्या मैदानाचा विकास, प्राथमिक, माध्यमिक तसेच केंद्रीय विद्यालय, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, पार्किंग प्लाझा, खाजगी बसस्टॉप, व्यायाम शाळा या उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे. याशिवाय वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पही राबविण्यात येत आहे.

नागपूर सुधार प्रन्यासची जेव्हा स्थापना झाली, तेव्हा नागपूर शहरात नगरपालिका अस्तित्वात होती. नागपूर शहर मध्यप्रांत, वऱ्हाड या राज्याची राजधानी होती. नागपूरमध्ये २ मार्च १९५१ मध्ये महानगरपालिका स्थापन झाली. नागपूर हे राजधानीचे शहर असल्यामुळे त्याचा विकास शिस्तबद्ध रितीने होण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने विशेष प्रयत्न केले. त्याचेच दृश्य परिणाम आपल्याला या शहरात दिसत आहे. शहरात नागपूर सुधार प्रन्यासने ६० उद्याने विकसित केली आहेत. यात महात्मा फुले उद्यान, संत ज्ञानेश्वर उद्यान, सुवर्ण जयंती उद्यान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय महाराष्ट्र भूषण स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर उद्यान, सक्करदरा तलाव उद्यानाचे काम पूर्ण झाल्याने शहराच्या सौंदर्यात भरच पडली आहे. याशिवाय शहरात वर्धा रोड व कामठी रोडवर लँड स्केपिंगची कामे करुन नागपूरकरांची प्रशंसा मिळविली आहे.

नागपूर शहराचे आरोग्य सुव्यवस्थित राहावे यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने ड्रेनेज अँड सेवरेज डिस्पोजल स्कीम १९४५-५० या दरम्यान तयार केली व ती कार्यान्वित सुध्दा केली. ती दोन भागात राबवून १९५३ ते १९६५ पर्यंत त्याचे दृश्य परिणामही नागरिकांना दिसले. भांडेवाडी येथे मलशुध्दीकरण योजना १९५० मध्ये सुरु करुन ती १९६५ पर्यंत पूर्ण केली. त्याद्वारे ५,००० एकर मध्ये शेतीला सांडपाण्याचा फायदा झाला. नागपूर सुधार प्रन्यासला नागपूर शहरासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ अंतर्गत नियोजन प्राधिकरण घोषित केले आहे. त्या अनुषंगाने नागपूर शहराची पहिली विकास योजना १९७१ मध्ये नागपूर सुधार प्रन्यासने तयार केली.

या योजनेस ३ जून १९७६ ला शासनाने मंजुरी दिली. ही विकास योजना नागपूर सुधार प्रन्यासच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी तयार केली होती, याचा जाणिवपूर्वक उल्लेख करावा लागेल. त्यानंतर १९९६ ला पुन: सुधारित विकास योजना शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली. शासनाने या योजनेस ७ जानेवारी २००० मध्ये मंजुरी दिली. त्यामुळे नागपूर शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली. त्यामुळे नागपुरात आंतरराष्ट्रीय एअर कार्गो कॉम्प्लेक्स व कन्टेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी आपली कामे सुरु केली.

नागपूर सुधार प्रन्यासने आपल्या स्वत:च्या निधीतून २.७३ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाची उभारणी केली. या कामावर ४ कोटी ५० लाख रुपये खर्च आला. याशिवाय बिनाखी हाऊसिंग स्किम अंतर्गत नवीन जलतरण तलावाचे बांधकामही हाती घेण्यात आले आहे. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियान अंतर्गत उर्वरित गुंठेवारी क्षेत्रांमधील अभिन्यासामध्ये पाणी पुरविण्यासाठी वाहिका टाकण्याकरिता ३०९ कोटी रुपयांचा प्रस्ताव केन्द्र शासनाकडे सादर केला होता. केन्द्राने हा प्रकल्प २९६ कोटी रुपयांचा मंजूर केला आहे. याच मिशनअंतर्गत नागपूर सुधार प्रन्यासने शहरात अनधिकृत अभिन्यासामध्ये विकास कामे पूर्ण करण्यासाठी ११२७ कोटी रुपयांचा प्रकल्प शासनाकडे सादर केला आहे.

  • अनिल ठाकरे

  • No comments:

    Post a Comment