Thursday, September 29, 2011

बिछायत व्यवसायाच्या माध्यमातून शिवाणी महिला बचत गटाची भरारी

ग्रामीण व शहरी लोकांकडे होणा-या समारंभात किंवा किरकोळ स्वरुपाच्या कार्यक्रमांचे आकर्षण बिछायतीच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. गरीब असो की श्रीमंत असो प्रत्येकाच्या कार्यक्रमात बिछायतीचे साहित्य महत्वाची भूमिका पार पडत असते. शिवाणी महिला बचत गटाने चालविलेले बिछायत केंद्र परिसरात उत्तम सेवा देणारी ठरत असून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

देवळी तालुक्यातील पुलगाव शहरालगत गुंजखेडा येथील वल्लभनगर येथे शिवाणी महिला बचत गट १ फेब्रुवारी २००८ रोजी स्थापन झाला. या बचतगटाने परिश्रमपूर्वक उत्तम कामगिरी केल्यामुळे पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामीण विकास यंत्रणेने दखल घेवून बिछायतीचे साहित्य खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला.त्यासाठी या महिला बचत गटाला १ लाख २० रुपयांच्या प्रस्तावाला मंजूरी प्रदान केली.

या बचत गटाविषयी माहिती जाणून घेतांना शिवाणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती सुशिला कडू म्हणाल्या की, गावातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये बचतगटाविषयी मार्गदर्शन तत्कालीन ग्रामसेवक यांनी दिली. या बैठकीला मी आणि गटातील महिला आग्रहपूर्वक उपस्थित होतो. शंका कुशंका दूर झाल्यानंतर आम्ही महिला ३० जानेवारी २००८ रोजी माझ्याच घरी बैठकीचे आयोजन केले. त्या बैठकीमध्ये बचतगटाचे नाव बचतीसाठी रकमेचे निर्धारण आणि भविष्यात करावयाचा व्यवसाय याविषयी चर्चा करुन बचत गटाला शिवाणी असे नाव देण्याचे ठरविण्यात आले. मासिक ३० रुपये बचत करुन बिछायतीचा व्यवसाय सर्वानुमते निवडण्यात आला.

बचत गटातील प्रत्येक महिलेने ३० रुपये बचत करुन १२ महिलेची एकत्रीत रक्कम गोळा केल्यानंतर लगेच तिस-या महिन्यात बँक ऑफ महाराष्ट्र पुलगाव येथे बचत गटाचे खाते उघडण्यात आले. प्रत्येक महिन्याला ३६० रुपये प्रामाणिकपणे भरण्यात येत होते. वर्षाला ४ हजार ३२० रुपये बँकेत जमा झाले. दुस-या वर्षाला मागील रकमेची जमा मिळून बचत गटाच्या खात्यावर ८ हजार ६४० रुपये जमा झाले. बचत गटातील महिला गरीब असल्यामुळे पदोपदी त्यांचे कुटूंबामध्ये पैशाची गरज भासत असते. ही गरज गटात जमा झालेल्या रकमेतून करण्यात येत असते. या बचतीच्या रकमेतून काही महिलांना आपला स्वत:चा वेगळा व्यवसाय उभारला तर काही महिलांनी कुटुंबातील सदस्याच्या पाठ्य पुस्तकासाठी तसेच औषधोपचारासाठी खर्च केला आहे.

बचत गटातील सदस्य अनुसया गवळी यांनी फेब्रुवारी २०१० रोजी ६ हजार रुपये अंतर्गत कर्ज २ टक्के व्याजाने जुन्या ऑटोच्या रिपेअरींगसाठी घेतले. सदर्हू ऑटो त्याचे पती चालवित असून ऑटो पासून सर्व खर्च वजा जाता २०० रुपये प्रत्येक दिवसाला कमाई होते. आता पर्यंत ४ हजाराची परतफेड केली असून व्याज सुध्दा त्यांनी भरले आहे.

वनिता चुबलवार या सदस्या महिलेने गटातून ८ हजाराचे अंतर्गत कर्ज डिसेंबर २००९ रोजी धान्य व्यवसायासाठी घेतले होते. बचत गटातील प्रत्येक महिला त्यांच्या धान्य दुकानातून धान्य व इतर वस्तू खरेदी करतात तसेच हा व्यवसाय सुध्दा चांगल्या प्रकारे चालत असल्यामुळे त्यांचे कुटूंब या व्यवसायावर उपजिवीका चालवित आहे. उचल रकमेची सर्व रक्कम परतफेड केली असून अजून दुकानामध्ये ५१ हजाराचा धान्य साठा उपलब्ध आहे.

सुशिला कडू या गटातील महिला सदस्यांनी ५ हजाराचे अंतर्गत कर्ज घेतले होते. त्यांनी महिला व पुरुषासाठी ब्युटीपार्लरचे दुकान उघडले. हे दुकान चांगले चालत असून त्यांचा मुलगा व मुलगी हे दुकान सांभाळतात. खर्च वजा जाता त्यांना ४ हजार रुपये सरासरी रक्कम प्राप्त होते. त्यांनी बचत गटाकडून घेतलेली कर्जाऊ संपूर्ण रक्कम दोन टक्के व्याजासह परत केली आहे.

वर्षा सालंकार यांनी जून ११ मध्ये शेतीसाठी व साधना धांगडे यांनी दोन मुलांच्या शिक्षणासाठी ३ हजार रुपये कर्ज घेतले आहे. व्याजासह अद्यापही परतफेड सुरु आहे. बचतगटाच्या सदस्यांची अंतर्गत उलाढाल अद्यापही सुरु आहे.

शिवाणी महिला बचत गटाने आगस्ट २०१० मध्ये बिछायत केंद्र उघडण्याचा प्रस्ताव बँक ऑफ महाराष्ट्र पुलगांव येथे सादर केला. बँकेनी जानेवारी २०११ ला १ लाख १० हजाराचे कर्ज दिले. लग्न समारंभ, वाढदिवस किंवा अन्य समारंभासाठी बिछायात केंद्रातील साहित्याचा उपयोग होत असल्यामुळे या व्यवसायाला परीसरात झळाळी प्राप्त झाली त्यामुळे आतापर्यंत ३३ हजार ६०० रुपयाची परतफेड बँकेला केलेली आहे. तसेच बँकेच्या खात्यामध्ये महिला बचतगटाचे १६ हजार रुपये शिल्लक असून परतफेडीमुळे बँकेत बचत गटाचा लौकीक वाढलेला आहे. अद्याप १ लाखाचे कर्ज बँकेकडून मिळावयाचे असून सदर्हू व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्याचा मानस अध्यक्ष सुशिला कडू व सचिव अनुसया गवळी यांनी बोलून दाखविला.

या बचत गटाला प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहयोगीका शेख बहिदा यांचा मोलाचा वाटा असून उन्नतीच्या पथावर चालून शिवाणी महिला बचत गटाने उंच भरारी मारली आहे एवढे मात्र निश्चितच.


  • मिलींद आवळे

  • No comments:

    Post a Comment