Saturday, September 10, 2011

खामगाववाडी महिलांचा प्रक्रिया उद्योग

म्हसळा तालुक्यातील खामगाववाडी येथील वैभव बचत गटातील महिलांनी शेअर स्वयंसेवी संस्था गोरेगाव –रायगडच्या मदतीने सौर शुष्क यंत्राच्या (सोलर ड्रायर)सहाय्याने वाळवणी प्रक्रिया व्यवसाय सुरु केला आहे.

वैभव महिला बचतगट एक वर्षापासून आवळा कँडी प्रक्रीया उद्योग करीत आहे. आवळयापासून कॅन्डी तयार होण्यासाठी ५-६ दिवस कालावधी लागतो. गेल्या एक वर्षामध्ये त्यांनी १००० किलो पेक्षा जास्त आवळा कॅन्डी तयार करुन दोन लाखापेक्षा अधिक उलाढाल केली आहे. त्यातून निव्वल नफा एक लाखापेक्षा जास्त मिळवला आहे. बचतगटाची ही चिकाटी पाहून शेअर संस्थेने त्यांना (सोलर ड्रायर) सौर शुष्क यंत्राची उपलब्धता करुन दिली. नुकतेच त्यांनी त्या सौर शुष्क यंत्राच्या सहाय्याने कोकणामधील दुर्लक्षीत फळ करवंदे या पासून कोकणचा मेवा, हिरवी मिरची पावडर, गवती चहा पावडर तसेच कडीपत्ता पावडर उद्योग सुरु केला आहे.

सदर सौर शुष्क उपलब्ध करुन देण्यासाठी संस्थेच्या संचालिका निकोला मॉन्टेरो प्रकल्प अधिकारी तुषार इनामदार यांनी विशेष प्रयत्न केले. सदर सौरशुष्क यंत्र १५ किलो क्षमतेचे असून ब्रिटो एनर्जी इंजिनिअर्स विरार यांनी खास शेअर संस्थेसाठी बनविले आहे.

या सौरशुष्क यंत्रामुळे महिलांचा पदार्थ साळवणेसाठी लागणारा ५० टक्के वेळ वाचला आहे. तसेच पदार्थाच्या गुणवत्तेमध्येही वाढ झाली. वैभव बचत गटातील नेत्रा नवघरे, रंजना गोसावी चंद्रकला मुंडेकर, विजया मेस्त्री, रेश्मा मिस्त्री, जानवी नवघरे,पार्वती शिगवण,गंगा नवघरे, सविता नवघरे, शेवंती गोसावी, वासंती गोसावी या सर्व महिलांना एकत्रित येवून शेअर संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील, गणेश मुरगुडे व कृषी कार्यकर्ते नाथाजी कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेचे अनेक पदार्थ बनवून आर्थिक उन्नती केली आहे.

शेअरच्या संचालिका निकोला मॉन्टेरो प्रकल्प अधिकारी तुषार इनामदार व कृषी अधिकारी बाबासाहेब चव्हाण यांनी सौर शुष्क यंत्र महिलांना वापरण्याविषयी प्रोत्साहीत करुन सौरशुष्क यंत्र उपलब्ध करुन दिले. 

No comments:

Post a Comment